क्षमामूर्ति मुहंमद

अशा रीतीनें ही महान् जीवनयात्रा संपली. आरंभापासून अंतापर्यंत मानवाच्या व ईश्वराच्या सेवेसाठीं वाहिलेलें असें तें जीवन होतें. किती कसोटीचे प्रसंग, किती मोह ! परंतु या सर्व दिव्यांतून निष्कलंक नि अधिकच सतेज असे ते बाहेर पडले. अग्नींत घातलेल्या सुवर्णाप्रमाणें अधिकच झगझगीत दिसूं लागले. तो नम्र साधा धर्मोपदेशक अरबस्थानचा सर्व सत्ताधीश झाला. राष्ट्राच्या दैवाचा नियन्ता झाला. शुश्रु व सीझर अशांच्या तोलाचा झाला. परंतु अशी सत्ता हातीं आल्यावरहि तीच पूर्वीची नम्रता, तोच पूर्वीचा साधेपणा. तीच आत्म्याची उदात्तता, तीच हृदयाची विशुध्दता; तीच वर्तनांतील विरक्ति, तीच भावनांची कोमलता व सुसंस्कृतता. कर्तव्याविषयींच्या प्रखर दक्षतेमुळें त्यांना अल-अमीन पदवी मिळालेली होती. ते नेहमीं कठोर आत्मपरीक्षण करायचे. एकदां मक्केंतील कांहीं श्रीमंत व वजनदार गृहस्थांजवळ ते धार्मिक चर्चा करीत होते. त्यांना नवधर्म समजून देत होते. आणि त्याच वेळेस सत्याचे संशोधन करणा-या एका गरीब आंधळयाजवळ न बोलतां ते तसेच निघून गेले. तो गरीब मनुष्य मुद्दाम मुहंमदांकडे आला होता. परंतु मुहंमद त्या मातबरांजवळच्या चर्चेनें प्रक्षुब्ध होऊन म्हणा तसेच तडक गेले ! परंतु त्यांना त्या गोष्टीचा मागून पश्चात्ताप झाला. त्या गोष्टीचा पुन:पुन्हां ते उल्लेख करीत. माझें ते कृत्य ईश्वराला आवडलें नसेल असें म्हणत. कुराणांत या गोष्टीचा उल्लेख आहे. त्या सु-याला 'पैगंबर रागावले' असें नांव आहे. त्या सु-यांत पुढील भाग आहे :

"पैगंबरांनीं कपाळास आंठया पाडल्या व ते निघून गेले. परंतु तो आंधळा गरीब आला होता. आपल्या पापांपासून तो मुक्त झाला नसता, धुतला गेला नसता, असें का तुला वाटलें ? तुला काय माहीत तो झाला असता कीं नाहीं विशुध्दात्मा. दोन शब्द त्याच्याजवळ बोलतास तर त्याचें कल्याण झालें असतें. जो श्रीमंत होता त्याचें तूं उदारपणें स्वागत केलेंस. तो शुध्द आहे कीं नाहीं, त्यानें आपलें पाप धुतलें आहे कीं नाहीं तें तूं पाहिलें नाहींस. परंतु जो मनुष्य स्वत:च्या उध्दारासाठीं धडपडत आला, तुझ्यापुढें थरथरत उभा राहिला, त्या गरिबाची मात्र तूं उपेक्षा केलीस. अत:पर कधींहि तूं असें करतां कामा नये.'

असें हें कठोर आत्मपरीक्षण सदैव चाले. अबुबकरांची मुलगी आयेषा व उमरची मुलगी हफ्सा या मुहंमदांच्या भार्या होत्या. परंतु झैनब नांवाची आणखी एक पत्नी होती. ती मुहंमदांस नेहमीं मध द्यायची. पैगंबरांस मध फार आवडे. लहानपणीं शेळया मेंढया उंट चारतांना मुहंमद द-याखो-यांतून, टेकडयांवर हिंडत. रानावनांतील मध खाण्याची त्यांना संवय लागली होती. झैनब प्रेमानें मध देई. आयेषा व हफ्सा यांना ईर्षा वाटे.

"तुम्ही फार मध खातां. इतका काय मेला मध खावा ! अत:पर मध खाणें सोडून द्या.' असें त्या दोन्ही म्हणत. एके दिवशी त्रासून मुहंमद म्हणाले, 'आजपासून मधास बोट लावणार नाहीं !'

परंतु मागून आपण चूक केली असें त्यांना वाटलें. मधासारखी सुंदर व हितकर वस्तु मी कां सोडावी ? केवळ बायकांच्या आपसांतील स्पर्धेमुळें का मी हें करावें ? ईश्वरानें दिलेल्या गोड देणगीचा त्याग करावा ? त्यांच्या मनास हें बरें वाटेना. कुराणांत त्या गोष्टीचा ते उल्लेख करतात व म्हणतात, 'पैगंबर, जें देवानें खायला योग्य म्हणून दिलें त्याचा तूं आपल्या बायकांना केवळ खूष करण्यासाठीं का त्याग करावा ? ती वस्तु का निषिध्द मानावीस, वर्ज्य करावीस ?'

त्यांनीं असत्याशीं कधीं तडजोड केली नाहीं. ईश्वर एक आहे या तत्त्वाशीं ते कसलीहि तडजोड करायला तयार नसत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel