या वेळेस मदिनेंतील तो चिर असंतुष्ट मुनाफिकीनांचा पक्ष त्यानेंहि असंतोष पसरविण्यास कमी केलें नाहीं. परंतु जे निष्ठावंत होते ते निघाले. त्यांच्यामुळें इतरांसहि स्फूर्ति आली. भ्याडहि झुंजार होऊन उठले. मोहिमेच्या खर्चासाठीं देणग्याहि देऊं लागले. अबुबकर यांनीं जवळचें सारें दिलें. उस्माननें स्वत:च्या खर्चानें एक मोठी तुकडी तयार केली. दुसरेहि प्रमुख लोक असें करूं लागले. स्त्रियांनीं जडजवाहीर दिलें. दागदागिने दिले. 'देशासाठी. घ्या हें सारें.' त्या म्हणाल्या. सैन्य निघालें. बरोबर स्वत: पैगंबर होते. या सैन्याला 'जैश-उल-उस्त्र' म्हणजे दु:खीकष्टी सैन्य असें नांव आहे. आपद्ग्रस्त सैन्य ! मदिनेचा कारभार पैगंबरांनीं अलींवर सोंपविला होता. मुहंमदांबरोबर अबदुल्ला इब्न उबय हाहि मुनाफिकीनांसह निघाला होता. परंतु वाटेंतून तो निमूटपणें मदिनेस परत आला. मदिनेंत त्यानें अशा कंडया पिकविल्या कीं 'पैगंबर पहा कसे आहेत ते. ही मोहीम धोक्याची होती. म्हणून त्यांनीं अलींना मात्र बरोबर नेलें नाहीं.' अलींना यामुळें वाईट वाटलें. ते सशस्त्र होऊन निघाले व पैगंबरांस गांठते झाले. पैगंबर त्याला म्हणाले, 'म्हणणारे कांहीं म्हणोत. तो नीच आरोप आहे. मी तुला खलिफा नेमलें आहे. माझ्या ऐवजीं नेमलें आहे. जा. आपल्या जागीं जा. माझ्या व तुझ्या लोकांवर माझा प्रतिनिधि म्हणून रहा. अली मूसाला जसा हारुन तसा तूं मला हो. जा.' आणि अली परत गेले. आपल्या पाठीमागून अलीनीं खलिफा व्हावें असें पैगंबरांचें मत होतें असें शिया जें म्हणतात तें याच प्रसंगावरुन.

सैन्य जात होतें. मदिना व दमास्कस यांच्या मध्यावर पोंचलें होतें. तों कळलें कीं शत्रु येत नाहीं. तें ग्रीकसम्राटांचें केवळ स्वप्न होतें. मुहंमदांनीं सैन्यास परतण्याचा हुकूम दिला. तबूक येथें वीस दिवस त्यांनीं मुक्काम केला. तेथें दाणापाणी भरपूर होतें. मुहंमद येतात तों तायफ येथील शिष्टमंडळ आलें. नऊ वर्षांपूर्वी त्यांनीं पैगंबरांस दगडधोंडे मारुन घालविलें होतें. त्यांच्या प्रमुखाचें नांव औरबा. पैगंबरांच्या उपदेशाचा त्याच्या मनावर फार परिणाम      झाला होता. हुदैबियाच्या करारानंतर तीन दिवस मुहंमद मक्केंत आले होते त्या वेळेस तायेफ येथील जमातींचा कुरेशांकडे तो वकील होता. तो तायेफमधील लोकांना मूर्तिपूजेविरुध्द सांगूं लागला. नवीन धर्माचा आशीर्वाद घेण्यास चला म्हणूं लागला. उपाध्यायांनीं व पुजा-यांनीं त्याला दगड मारले. आणि तो मरणोन्मुख होऊन पडला. मरतां मरतां म्हणाला, 'पैगंबरांसाठीं मी माझें रक्त दिलें. जनतेच्या कल्याणासाठीं मी माझें रक्त ईश्वराला देत आहें. बलिदान करण्याचा मान मला ईश्वरानें दिला म्हणून त्याचे आभार !' शेवटीं म्हणाला, 'हुनैनच्या घळींत लढतांना जे मुसलमान मेले, त्यांच्या कबरांजवळच मलाहि पुरा.'

औरवाच्या जिवंतपणींच्या प्रवचनांचा परिणाम झाला नाहीं, परंतु या आसन्न-मरण प्रवचनाचा त्याच्या लोकांवर परिणाम झाला. त्यांनीं मुहंमदांकडे शिष्टमंडळ पाठविलें. वाळवंटांतील कधीं न संपणा-या युध्दांचा त्यांनाहि कंटाळा आला असेल. शिष्टमंडळ आलें व पैगंबरांस म्हणालें, 'आम्हांस क्षमा करा व इस्लामच्या गोटांत घ्या.' पुन्हां म्हणाले, 'आमच्या मूर्ति मात्र कांहीं दिवस राहूं देत.' प्रथम म्हणाले, 'दोन वर्षें.' नंतर म्हणाले, 'एक वर्ष.' पुन्हां म्हणाले, 'सहा महिने, निदान एक महिना तरी.'

परंतु मुहंमद या गोष्टीवर कधींच तडजोड करायला तयार नसत. ते म्हणाले, 'इस्लाम व या मूर्ति एक क्षणभरहि एकत्र राहूं शकणार नाहींत.'

मग ते म्हणाले, 'आम्हांला रोजच्या प्रार्थनेची तरी सक्ति नका करुं.'

पैगंबर म्हणाले, 'प्रार्थनेशिवाय धर्म म्हणजे शून्य !'

शेवटीं त्यांनीं सारें कबूल केलें. फक्त स्वत:च्या हातांनीं मूर्ति फोडणें त्यांनीं नाकारलें. अबु सुफियान व मुघीरा यांना तें काम देण्यांत आलें. तायेफमधील मायाबाया हायहाय म्हणत होत्या व मूर्ति फुटत होत्या !

या वर्षी यमन, महर, ओमान, बहरैन, यमामा वगैरे ठिकाणचींहि शिष्टमंडळें आलीं. एक ताई नांवाची जमात अद्याप त्रास देत होती. प्रख्यात हातिमताईचा मुलगा 'अदि' तो त्यांचा पुढारी होता. अली त्यांच्यावर सैन्य घेऊन गेले. अदि सीरियांत पळाला. इतरांना कैद करण्यांत आलें. त्यांत अदीची बहीणहि होती. सर्वांना सन्मानानें मदिना येथें आणण्यांत आलें. पैगंबरांनीं सर्वांना स्वतंत्र केलें. त्यांना देणग्या दिल्या. अदीची बहीण सीरियांत त्याच्याकडे पाठविण्यांत आली. तिनें आपल्या भावास मुहंमदांच्या उदात्त वर्तनाविषयीं सांगितलें. अदीचें हृदय कृतज्ञतेनें भरुन आलें. तो मुहंमदांच्या चरणांशीं आला व इस्लामचा स्वीकार करता झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel