आशानिराशांचे झोके
मुहंमद जरा कष्टी होते. मक्का सोडून अन्यत्र जावें असेंहि त्यांच्या मनांत येऊं लागलें. मक्केने माझा त्याग केला तरी इतरत्र का कोठें माझें स्वागत होणार नाहीं ? एके दिवशीं झेदला बरोबर घेऊन ते ताइफ या शहरीं गेले. त्यांनी तेथील लोकांस नवधर्म सांगितला. परंतु ते लोक हा नवधर्म ऐकून संतापले. 'परंपरेच्या विरुध्द सांगणारा हा कोण आला, हांकला त्याला. मारा दगड.' अशा गर्जना झाल्या. त्यांनीं झैद व मुहंमद यांना गांवाबाहेर घालवलें. दुष्ट लोक तर संध्याकाळ होईपर्यंत त्यांच्या पाठोपाठ दगड मारीत जात होते. मुहंमद घायाळ झाले होते. रक्तबंबाळ झाले होते. ते थकले, गळून गेले, एका झाडाखालीं बसून प्रार्थना करूं लागले. आकाशाकडे हात पसरुन ते म्हणाले, 'प्रभो, मी दुबळा आहें म्हणून तक्रार करीत आहें. माझ्या इच्छांच्या पोकळपणामुळें मी प्रार्थना करीत आहें. लोकांच्या दृष्टीनें मी तुच्छ आहें. हे परम दयाळा, हे दुर्बलांच्या बळा, तूं माझा प्रभु, तूं आधार. तूं नको हो मला सोडूं. मला परकीयांचें भक्ष्य नको करूं. माझ्या शत्रूंच्या तावडींत मला नको हो देऊं. तुझा माझ्यावर जर राग नसेल तर मी सुरक्षित आहें. तुझ्या मुखचंद्राचा प्रकाश हाच माझा आधार. तुझ्या मुखप्रकाशानें माझा सारा अंधार नष्ट होतो. या जगीं व परलोकीं शांति मिळते. तुझा क्रोध माझ्यावर न उतरो. देवा, माझ्या अडचणी सोडव. तुझी इच्छा असेल त्याप्रमाणें या अडचणी निस्तर. तूंच माझी शक्ति. तूंच आधार. तुझ्याशिवाय ना आधार, ना बळ.'
प्रार्थनेनें शांति आली व ते उठले. मक्केस परत आले. वाटेंतील एका बागवानानें थोडीं द्राक्षें दिलीं. वाटेंत एके ठिकाणी झोंपले असतां त्यांना एक स्वप्न पडलें. 'लोकांनीं सोडलें आहे. भुतें दिसत आहेत. परंतु सारीं भुतें ईश्वराच्या पायां पडत आहेत.' असें तें स्वप्न पडलें. भुतें पळतील असें त्यांना वाटलें. त्यांना धैर्य आलें. उत्साह आला. झैद म्हणाला 'पुन्हां मक्केंत कशाला जायचें ? त्या शत्रूंच्या हातांत पुन्हा कशाला ?' मुहंमद म्हणाले, 'ईश्वर आपल्या धर्माचें व पैगंबराचें रक्षण करील !'
यात्रेच्या वेळेस जे लोक येतील त्यांच्यांत मुहंमद प्रचार करीत. ते गावांगांवचे यात्रेकरु आपला संदेश दूरवर नेतील असें त्यांस वाटे. एकदां मुहंमद कांहीं लोकांना नवधर्म सांगत होते तों पलिकडे यसरिब शहरचे सहा इसम आपसांत कांहीं बोलत आहेत असें मुहंमदांस दिसलें. मुहंमद त्यांनाहि म्हणाले, 'या. बसा, ऐका.' ते बसले.
"कोण तुम्ही ? कोठले ?'
"यसरिबचे. खजरज जमातीचे.'
"ज्यूंचे मित्र ?'
"हो.'
"जरा बसाल ? मी बोलेन.'
ते बसले. मुहंमदांचा नवधर्म त्यांनींहि ऐकला. ती तळमळ, भावनोत्कटता, ती सत्यमय वाणी ऐकून त्या सहांवर मोठा परिणाम झाला.
"आम्ही तुमच्या धर्माचे होतों. आणि यसरिबमध्यें सारखी भांडणे असतात. तुम्ही या आमच्यांत व सारे एक करा.'
"तुमच्याबरोबर येऊं ?'
"आधीं नका येऊं. आम्ही व बनू औस आधीं एक होऊं. मग तुम्ही या.'
आणि ते मुहंमदांचे अनुयायी व भक्त होऊन परत गेले. हे सहा लोक यसरिबला परत गेल्यावर नवधर्माची वार्ता फैलावूं लागले. त्यांनीं आणलेली बातमी विजेसारखी पसरली. 'अरबांत पैगंबर जन्मला आहे. तो नवधर्म देत आहे. एका ईश्वराकडे बोलावीत आहे. शेंकडों वर्षे चाललेल्या भांडणांस तो आळा घालील. तो अरबांचें अभंग ऐक्य निर्मील.' अशी भाषा सर्वत्र झाली.