अशाच कोटींतील मुहंमद होते. किती उदाहरणें द्यावीं ? एकदां वाळवंटांतील एक बेदुइन अरब कैदी मुहंमदांकडे आणण्यांत आला. पैगंबराच्या दयाळूपणाचा त्याच्यावर अत्यन्त परिणाम झाला. तो शत्रुत्व विसरुन अत्यंत निष्ठावंत अनुयायी झाला. मुहंमदाचा भक्त होऊन तो गेला. तो मग आपल्या प्रान्तांतून मक्कावाल्यांस धान्य वगैरे पाठविनासा झाला. मक्केंत धान्य मिळेना. मक्कावाल्यांची मोठी करुणस्थिति झाली. शेवटीं त्यांनीं मुहंमदांकडे अर्ज पाठविला. आणि मुहंमद द्रवले. जे मक्कावाले त्यांना पुन:पुन्हा मारण्यासाठीं उठत होते. त्यांना जगविण्यासाठीं मुहंमद उभे राहिले. त्यांनीं त्या निष्ठावंत अरबाला, थुमामला सांगितलें कीं, मक्कावाल्यांस लागेल तें देत जा. अपकारांची फेड ते प्रेमानें व क्षमेनें करते झाले. मुहंमदांनीं पुढें जेव्हा मक्का घेतली त्या वेळेस हब्रार नांवाचा एक खुनी मुहंमदांसमोर आणण्यांत आला. एकदा मुहंमदांची एक मुलगी मक्केहून निसटून जात होती. ती उंटावर बसणार इतक्यांत हा कुरेश हब्रार तेथें आला. त्यानें त्या मुलीच्या अंगांत भाला खुपसला ! ती गरोदर होती. ती जमिनीवर पडली व लगेच मेली. स्वत:च्या गरोदर मुलीचा निर्दय खून करणारा तो हब्रार विजयी मुहंमदांसमोर उभा करण्यांत आला. पैगंबरांस त्या प्रिय कन्येचें स्मरण झालें. हब्रार मुहंमदांच्या पाया पडला व क्षमा मागता झाला. मुहंमदांना तो पश्चात्ताप खरा वाटला. त्यांनीं क्षमा केली. कारण तो अपराध त्यांच्या वैयक्तिक बाबतींतला होता. त्या अपराधाचा शासनसंस्थेशीं संबंध नव्हता. पैगंबर स्वत:च्या बाबतींतले सारे अपराध क्षमा करीत. शासनसंस्थेचा संबंध येई तेथें ते कठोर बनत. ते कठोर कर्तव्य त्यांना करावें लागे. एका ज्यू स्त्रीनें मुहंमदांस मारण्याचा प्रयत्न केला. तिलाहि त्यांनीं क्षमा केली. अबु जहलचा मुलगा अक्रमा यानेंहि हाडवैर मुहंमदांजवळ केलें. परंतु तरीहि त्याला क्षमा केली गेली. पैगंबरांचे महानुभावित्व असीम होतें. पैगंबर या नात्यानें त्यांनीं सदैव क्षमाच केली; परंतु शास्ते या नात्यानें त्यांना तत्कालीन परिस्थितीमुळें कठोर व्हावें लागलें. ज्यूंनींहि पुन:पुन्हा त्यांना सतावलें, फसवलें, दगलबाजी केली. नाहीं तर मुहंमद किती सौजन्यानें वागूं पहात होते ! तोंडहि प्रार्थनेच्या वेळेस जेरुसलेमकडे करीत !

कांही ख्रिश्चनधर्मी बेदुइनहि मदिनेस त्रास देऊं लागले. लुटालूट व रस्तेमार करीत. त्यांच्या बंदोबस्तासाठीं मुहंमदांनीं जी तुकडी पाठविली, तिच्या प्रमुखास ते म्हणाले, 'कोणाला फसवूं नका. दगलबाजी कोणाशीं करूं नका. दिला शब्द पाळा. लहान मुलांना तर तुम्ही हात नाहींच लावतां कामा.' मुहंमदांची ही सुंदर आज्ञा, परंतु ज्यूंच्या धर्मस्थापकानें काय सांगितलें होतें ? 'जा आणि अमलकांवर हल्ला करा. सारे नष्ट करा. स्त्रिया, पुरुष, लहान अंगावरचें मूल, कोणी ठेवूं नका. सारीं मारा. गुरेंढोरें मारा. वृध्द, तरुण सारे मारा.' मुहंमदांची उदारता खरोखरच अपार व अपूर्व होती. कधींहि तुकडी पाठवायची झाली तर ते सांगत, 'दुबळयांना धक्का नका लावूं. घरांतील निरपराधी लोकांस मारुं नका. स्त्रियांना वांचवा. अंगावर पिणारीं मुलें त्यांची हत्त्या नका करूं. प्रतिकार न करणा-यांचीं घरेंदारें पाडूं नका. त्यांच्या उपजीविकेचीं साधनें नष्ट नका करुं. फळझाडें तोडूं नका. ताडांची झाडें, तींहि नका तोडूं.'

पैगंबरांची ही शिकवण पुढील खलिफांसमोरहि असे. अबुबकर जो पुढें पहिला खलिफा झाला, त्यानें यझीद बीन अबु सुफीयन याला जेव्हां बायझंटाइनांवर स्वारी करायला पाठविलें तेव्हां पुढील शिकवण दिली :

"यझीद, स्वत:च्या लोकांना असंतुष्ट व अशान्त करूं नको. त्यांच्यावर कोणताहि जुलूम नको करूं. त्यांचाहि सल्ला घेत जा व योग्य तें करीत जा. मीं सांगतों आहे याविरुध्द जे वागतील त्यांना यश येणार नाहीं. शत्रूंशी गांठ पडल्यावर मर्दांसारखे वागा. पाठ नका दाखवूं. आणि विजयी झालेत तर स्त्रिया, वृध्द व मुलें यांना मारुं नका. फळझाडे, ताडाचीं झाडें तोडूं नका. शेतें जाळूं नका. गुरेढोरें मारुं नका. पोटासाठीं जरुर पडली तरच तीं मारा. शत्रूशीं करार कराल तर तो पाळा. दिल्या शब्दाप्रमाणें वागा. धर्मप्रवृत्तीचे लोक मठांतून वगैरे असतात. एकान्तांत ईश्वराची सेवा, पूजा करतात. त्यांना त्रास देऊं नका. मारुं नका. मठ उध्वस्त करूं नका.'

किती संयमी हें आज्ञापत्र ! शांतीचा संदेश देणा-या ख्रिस्ताच्या अनुयायांच्या लीला व ख्रिस्ती शासकांचीं आदेशपत्रें-आगलाबीं आदेशपत्रें वाचलीं म्हणजे पैगंबर व त्यांचे अनुयायी यांचीं हीं त्या काळांतील शासनें किती उदात्त वाटतात ! चीनमध्यें एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत सुधारलेले म्हणवणा-या ख्रिश्चन राष्ट्रांनीं कशा कत्तली केल्या, ग्रंथालयें, कलालयें कशीं जाळलीं तें वाचा आणि मग मुहंमदांकडे पहा. त्यांनीं शिकवलेल्या उदार धर्माकडे पहा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel