मुहंमदांचे पहिले अनुयायी

मुहंमद एका ईश्वराचे पैगंबर म्हणून प्रचार करुं लागले. चाळिशी नुकतीच संपली होती. आणि आयुष्याचा उरलेला भाग आतां ईश्वरदत्त महान् कार्यासाठीं ते अर्पण करुं लागले. आणि त्यांच्यावर प्रथम विश्वास कोणी ठेवला ? त्यांच्याजवळच्या मंडळींनी. पैगंबरांच्या उत्कट तळमळीची व सत्याची याहून दुसरी कोणती निशाणी ? जवळची मंडळी त्यांचा नवधर्म घेती झाली. त्यांना शंका वाटली नाहीं. हा ईश्वरी पुरुष आहे असें त्यांना वाटलें. त्यांतहि सर्वांत आधीं खदिजा. ती पहिली अनुयायी, पैगंबरांस ईश्वरी ज्ञान झालें आहे ! असें जर कोणीं पहिल्यानें विश्वासपूर्वक मानलें असेल तर ते खदिजेनें. मूर्तिपूजा सोडून, त्या परम कारुणिक प्रभूची. मुहंमदांबरोबर प्रथम जर कोणी प्रार्थना म्हटली असेल तर ती खदिजेनें, मुहंमदांच्या दैवी जीवनकार्यावर तिनेंच प्रथम श्रध्दा ठेविली, इतकेंच नव्हे तर पुढील झगडयांत तिनें त्यांना सदैव धीर दिला. जेव्हां तो कावराबावरा होऊन त्या रात्रीं तिच्याकडे आला व 'खदिजे, खदिजे; पांघरुण घाल माझ्यावर, कपडयांत लपेट मला.' असें म्हणाला त्या वेळेस ईश्वरानें खदिजेच्या रुपानेंच जणुं त्याला धीर दिला. शांति दिली. तीच त्याला म्हणाली, 'ऊठ.' तिनेंच त्याचा बोजा हलका केला. माझी तुझ्यावर श्रध्दा आहे म्हणाली. लोकांना वाटेल तें बडबडूं दे. लक्ष नको देऊं, असें म्हणाली. परमेश्वरानें ज्ञान दिलें, खदिजेनें शांति व विश्वास दिला.

पहिल्या पहिल्यानें ज्यांचें महंमदांवर प्रेम होतें त्यांच्याशींच ते आपला आत्मा प्रकट करीत. आपला नवसंदेश देत. पूर्वजांच्या विकृत व अशुध्द आचारांपासून परावृत्त व्हा म्हणत. अब्राहामचा शुध्द धर्म मी पुन्हां आणला आहे म्हणत. खदिजेनंतर अली त्यांचे अनुयायी झाले. पैगंबर मक्केच्या सभोंवतालच्या एकान्तमय वाळवंटांत जात. तेथें खदिजा व अलि यांच्यासह ते प्रार्थना करीत. तिघांची कृतज्ञतापूर्वक एकत्र प्रार्थना. पहिली सामुदायिक प्रार्थना. एकदां तीं तिघे अशीं प्रार्थना करीत असतां चुलते अबु तालिब यांनीं पाहिलें. ते मुहंमदांस म्हणाले, 'बेटा, हा कोणता धर्म तूं आचरीत आहेस ?' मुहंमद म्हणाले, 'ईश्वराचा. त्याच्या देवदूतांचा. त्याच्या पैगंबरांचा. आपल्या प्राचीन अब्राहामचा हा धर्म. लोकांना सत्यमार्गाकडे आणावें म्हणून परमेश्वरानें मला पाठविलें आहे. आणि काका, तुम्हीहि ईश्वराचे अति थोर सेवक आहांत. तुम्हांला ईश्वराचा सेवक म्हणून मी हांक मारावी हें उचित आहे. तुम्हीहि या सत्याचा स्वीकार करा. या सत्याच्या प्रसारासाठीं साहाय्य करा.' चुलते म्हणाले, 'पूर्वजांचा धर्म मी सोडूं शकत नाहीं. परंतु त्या परमश्रेष्ठ परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतों कीं, जोंपर्यंत मी जिवंत आहें तोंपर्यंत कोणीहि तुला अपाय करणार नाहीं.' नंतर तो वृध्द पुरुष आपल्या मुलाला विचारता झाला, 'बेटा, तुझा धर्म कोणता ?' अली म्हणाले, 'तात, त्या एका ईश्वरावर व त्यांच्या या पैगंबरावर विश्वास ठेवतों. मी पैगंबरांबरोबर जातों.' अबु तालिब म्हणाले, 'मुहंमद योग्य तेंच तुला सांगेल. जा बाळ, त्याच्या बरोबर जा. तो वाइटाकडे तुला कधींहि नेणार नाहीं. त्याच्याशीं एकनिष्ठ राहण्याचें तुला स्वातंत्र्य आहे.'

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel