दिव्यभव्य जीवन

त्यांच्या बायकांच्या लहान लहान झोपडया अलग अलग अशा एका ओळीनें होत्या. या झोंपडया साध्या, ताडपत्र्यांनीं आच्छादिलेल्या चिखलामातीच्या अशा होत्या. मुहंमद स्वत: घर झाडीत. कधीं पाहुणे आले तर त्यांना आधीं जेवण देत. कोणी गरीब आला तर त्याला बरोबर जेवायला बसवीत. ज्यांना घरदार नसे ते मुहंमदाच्या घराबाहेर एक बांक असे त्यावर बसलेले असावयाचे. किंवा जवळच्या मशिदींत असत. मुहंमदांच्या औदार्यावर ते जगत. त्या लोकांना 'बाकावरचे लोक' असें म्हणत. त्यांतील कांहींना सायंकाळीं आपल्याबरोबर जें असेल तें खायला बोलावीत. कांहींना आपल्या शिष्यांकडे पाठवीत. मोठे पाहुणे आले तर त्यांची सुखी व सधन शिष्यांकडे सोय करीत. मुहंमदांचा मुख्य आहार खजूर व पाणी हा असे. मिळाली तर बार्लीची भाकरी. त्यांची चैन म्हणजे दूध व मध. परंतु त्यांतहि संयम राखीत. अबु हुरेरा सांगतो कीं पुष्कळ वेळां पैगंबरांस उपाशी रहावें लागे. कधीं कधीं कित्येक दिवस घरांत चूल पेटलेली दिसत नसे. अशा वेळेस खजूर व पाणी यावरच रहात. मुस्लिम इतिहासकार लिहितात, 'ईश्वरानें जगांतील खजिन्यांची किल्ली मुहंमदांसमोर ठेविली, परंतु त्यांनीं ती नाकारली.'

विरक्त त्यागमय जीवन. गरिबींत आनंद मानणारें जीवन. दारिद्र हा माझा अभिमान आहे असें ते म्हणत. 'देवा, मला गरीब ठेव.' अशी प्रार्थना करीत. 'मला गरीब राहूं दे, गरीब मरुं दे, गरीबींत वाढूं दे' म्हणत. एकदां एक मनुष्य पैगंबरास म्हणाला, 'देवाची शपथ, माझें तुमच्यावर फार प्रेम आहे.' पैगंबर म्हणाले, 'जर माझ्यावर तुझें खरें प्रेम असेल, तर मग दारिद्रयाचे चिलखत तयार कर. दारिद्रयानें नट. नदी समुद्राकडे धांवत जाते. तिच्यापेक्षांहि अधिक जलदीनें गरिबी त्याच्याकडे धांवत जाते जो माझ्यावर प्रेम करतो. गरीबांना तुझ्याकडे येऊं दे, म्हणजे तुला ईश्वराजवळ जातां येईल. तूं गरिबांना जवळ घेशील तर ईश्वर तुला जवळ घेईल.' गरिबीनें रहावें, साधेपणानें रहावें अशीं त्यांचीं शेंकडों वचनें आहेत. 'तुम्हीं गरीबांना व गरजवंतांना समाधान द्याल त्यांत माझें समाधान आलें. ऐषआरामापासून, सुखासीन जीवनापासून दूर रहा. ईश्वराचे जे खास सेवक आहेत, जे खुदाई खिदमतगार आहेत त्यांना ऐषआरामी राहून सच्ची पूजा करतां येणार नाहीं.' असें ते सांगत. एकदां पैगंबरांकडे पाहुणा आला तर त्यांना पीठ उसनें आणावें लागलें ! गरिबीचें व्रत त्यांनीं अक्षरश: पाळलें. ते गरिबांशीं एकरुप झाले. ते मेले तेव्हां कांहीं हत्यारें, एक उंट व लहानशी जागा हीच काय ती त्यांची धनदौलत मागें होती. त्यांचें चिलखतहि एका सावकाराकडे गहाण होतें. तें सोडवायला पैसे नव्हते ! मुहंमदांची मुलगी हझरत फतिमा हिला स्वत: दळावें लागे. हातांना तिच्या फोड येत. एकदां ती पैगंबरांना म्हणाली, 'मला मदतीला एक गुलाम द्या.' प्रेमळ पिता म्हणाला, 'नोकरापेक्षां अल्लाचें नांव घेत जा तें अधिक बरें !' जनाबाईला दळतांना देवच मदत करी. जणुं दंडांत शक्ति येई.

स्तुति त्यांना आवडत नसे. 'मी परमेश्वराचा सेवक आहें, त्याचा दूत आहें. मीहि एक साधा मनुष्यच आहें.' असें ते म्हणत. एकदां आयेषानें विचारलें, 'प्रभूच्या कृपेशिवाय स्वर्गात कोणालाच जातां येत नाहीं का ?'
"नाहीं, नाहीं, नाहीं.' त्रिवार म्हणो.

"तुमच्या गुणांमुळें तुम्हांलाहि प्रवेश नाहीं का मिळणार ?'

"नाहीं ईश्वराची कृपा झाल्याशिवाय माझाहि स्वर्गात प्रवेश नाहीं. तो मला कृपावस्त्रानें झांकील तरच मी स्वर्गात जाऊं शकेन.'

प्रार्थना हें त्यांचें जीवन होतें. ते म्हणत, 'मी मर्त्य मनुष्य आहें. किती चुका झाल्या असतील ! रोज हजार वेळां मला प्रार्थना करूं दे. प्रभूची क्षमा मागूं दे.'

अशी निस्सीम निरहंकारता त्यांच्या ठायीं होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel