प्रकाश पर्वतावरील ईश्वरी संकेत

पवित्र पर्वत हिरा हा मुहंमदांचा आवडता पर्वत. या पर्वतांतील एका गुहेंत मुहंमद प्रार्थना करीत, ध्यान करीत बसत. हा पर्वत उघडबोडका आहे. आजूबाजूला द-या आहेत. त्या वाळवंटांत एकटा तो पर्वत उभा आहे. जणुं पंचाग्निसाधन करित आहे. ना झाडमाड, ना तिळभर छाया. नाहीं जवळ झरा, ना विहीर. वाळवंटांतील प्रखर सूर्यतापांत पेटल्यासारखा हा पहाड होई. आणि मुहंमद त्या गुहेंत असत. कधीं कधीं कुटूंबासह मुहंमद तेथें प्रार्थनेस जात. बहुधा रमझान महिन्यांत ते जात. ते उपवास करीत. ध्यानमग्न असत. मुहंमदांची प्रकृति जरा नाजूक होती. अति भावनाप्रधान होती. फार संस्कारी स्वभाव होता. लहानपणीं त्यांना कधीं कधीं एकदम मूर्च्छा यायची. भावनांचा भर सहन होत नसे. या गुहेंतील एकान्त, ती भीषण शांति, ते उपवास, तें चिंतन व ध्यान यांचा एक विलक्षण परिणाम त्यांच्यावर होई. अनेक वर्षांचे संशय, अनेक वर्षांचें चिंतन यांनीं त्यांचा स्वभाव फार हळवा केला होता. कांही तरी सत्य सांपडावें अशी धडपड होती. या सत्याच्या मांडीवर विश्वासाने डोकें-संतप्त डोंकें ठेवण्याची त्यांना इच्छा होती.

हा हिरा पहाडास हल्लीं प्रकाशपर्वत हें नांव आहे. वाळवंटांतील प्रखर सूर्यतापांत मी उभा आहें त्याप्रमाणें तुलाहि पुढें जनता आगीत घालील, त्या आगींत असें अचलपणें उभें रहावें लागेल, असें जणुं तो पहाड सुचवीत होता ! मुहंमदांना आतां कांही सुचत नसे. त्यांना एकान्ताचें वेड लागलें. ती गुहा त्यांचें घर बनली. तेथेंच ते ध्यानमग्न रहात. सर्वव्यापी परमेश्वराशीं एकरुप होत. मधून मधून त्यांना आवाज ऐकूं येत. भव्य दर्शनें घडत. आदेश, संदेश मिळत. आजूबाजूच्या सा-या निर्जीव वस्तु सहस्त्र जिभांनी जणुं बोलत आहेत असें त्यांना वाटे. 'जा, ईश्वरी कार्य पुरें कर.' असें जणुं तेथील ते दगडधोंडे, तेथील अणुरेणु, तेथील वारे त्यांना सांगत. सारी सृष्टि त्यांना पुकारीत होती. आत्म्याचें अमर काव्य होतें तें. अत्युच्च अद्वितीय महाकाव्य ! जगांतील महान् विभूतींना असें हें आत्मगान ऐकायला मिळतें. चराचराशीं एकरुप झालेल्या आत्म्याचें गान ! मुहंमदांस देवदूत दिसत. जणुं हळूहळू सत्याच्या दिव्य प्रकाशाचें तें आविष्करण होत होतें. ज्या सत्यानें पुढें मुहंमदांनी सा-या जगाला न संपणारी प्रेरणा दिली तें सत्य हळूहळू प्रकट होत होतें. पर्वताच्या एकान्तानें महापुरुषांना सदैव प्रकाश दिला आहे. ते महापुरुष पूर्वेकडचे असोत वा पश्चिमेकडचे.

रात्रींच्या प्रशान्त वेळीं; पहांटेच्या मंगल उष:कालीं; गंभीर नि:स्तब्ध एकान्ती, आसपास कोणीहि नाहीं अशा वेळेस पहांटेच्या वा-याच्या मंद झुळुकांबरोबर मुहंमदांस आवाज ऐकूं येई, 'तूंच तो मनुष्य. तूं देवाचा पैगंबर आहेस.' कधीं कधीं प्रचंड लाटेसारखा घों करीत आवाज येई व त्यांना कंपायमान व रोमांचित करी. 'तुझ्या प्रभूच्या नांवानें हांक मार, पुकार, घोषणा कर.'

मुहंमद अगतिक होऊन म्हणत, 'कसली करूं घोषणा ?'
"त्या ईश्वराच्या नांवानें घोषणा कर, ज्यानें तुला निर्मिलें. ज्यानें मानवाला निर्मिलें. हांक मार. ईश्वर दयाळू आहे. अत्यन्त दयाळू आहे. मनुष्याला जें अज्ञात आहें तें तो ज्ञात करतो. तोच ज्ञानदाता आहे. तो तुला शिकवील. ऊठ. कर घोषणा.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel