अरबस्थानच्या आसपास साम्राज्यें व राष्ट्रें धुळीस मिळत होतीं. सर्वत्र विनाश होत होता. खरा धर्म कोठेंच नव्हता. सर्वत्र चोथा व साली ! धर्माचा गाभा कोठेंहि नव्हता. कोणी तरी तारक येणार, देवाचा संदेशवाहक येणार, अशी चारी दिशांतून उत्कट भावना हवेंत खेळून राहिली होती. वरका मुहंमदांस रस्त्यांत भेटले व म्हणाले, 'माझें जीवन ज्याच्या हातीं त्याची शपथ घेऊन तुला सांगतों कीं ईश्वरानें तुला या लोकांचा पैगंबर म्हणून पसंत केलें आहे. त्यानें तुला संदेश दिला आहे. लोक तुला खोटें बोलणारा म्हणून म्हणतील. ते तुला छळतील. तुला हद्दपार करतील. तुझ्यावर शस्त्र धरतील. मी जर जगलों तर तुझ्यासाठी लढेन.'
आणि त्या वृध्दाला अधिक बोलवेना. मुहंमदांच्या मस्तकाचें, भालप्रदेशाचें त्यानें अवघ्राण केलें, चुंबन घेतलें. आणि तो गेला. त्या शब्दांनी मुहंमदांच्या प्रक्षुब्ध हृदयास धीर आला. शांति आली. पुन्हां तो आवाज कानीं येईपर्यंत थांबण्याचे त्यानें ठरविलें. पुन्हा ती दैवी प्रेरणा मिळावी म्हणून तो थांबला. केवढें मानसिक युध्द चाललें असेल ! महान् अंतरात्म्याच्या कुरुक्षेत्रावरची श्रध्दा संशय यांची लढाई. आशा, शंका, झगडे, गैरसमज. स्वत:चें दैवी कार्य निश्चितपणें पटेपर्यंत किती मानसिक यातना !
आणि पुन्हां ती वाणी घों करूंन आली. आशेची नि:शंक वाणी ! 'जा सारें जग तुझ्या धर्मांत येईल. जा. ऊठ विश्वास धर.' अशी ती नभोवाणी पुन्हां मिळाली. तें प्रभूचें पुनराश्वासन मिळाल्यावर वाळवंटांतून लगबगीनें तो घरीं आला. त्याचें शरीर थकलें होतें. मन झगडून दमलें होतें. तो खदिजेजवळ आला. सर्वत्र त्याला प्रभूचें विराट अस्तित्व भासत होतें. तो थरथरत होता. गांगरला होता. तो खदिजेला म्हणाला, 'खदिजे, खदिजे, सांभाळ मला. धीर दे. वांचव !' मुहंमदाची तपस्या जगासाठीं होती. ईश्वराशीं एकरुपता या जगाला वांचवण्यासाठीं त्यांना हवी होती. स्वत:साठीं केवळ नको होती.
"ऊठ, जगाला सत्याची सूचना दे. प्रभूचें गौरवगान गा. त्याचें वैभव गा.' असा स्पष्ट आदेश मिळाला. अत:पर शंका संभ्रम नाहीं. मुहंमद आतां उभे राहिले. अचल श्रध्देनें व अपार विश्वासानें उभे राहिले. सारे छळ, यातना, हालअपेष्टा यांना न जुमानतां उभे राहिले. सत्यासाठीं उभा राहिलेला हा महापुरुष असत्यासमोर अत:पर नमला नाही.
हा सारा मनाचा खेळ होता का ? मुहंमदांस जे देखावे दिसत, जे शब्द ऐकूं येत, जे देवदूत दिसत ही सारी का प्रक्षुब्ध मनाची निर्मिती होती ? हीं का केवळ स्वत:ची स्वप्नें ? सांगतां येणार नाही. मानसशास्त्राचा अभ्यास अर्वाचीन शास्त्रज्ञांना अद्याप करावयाचा आहे. इंद्रियातील अशीहि एक ज्ञानप्राप्तीची शक्ति मनुष्याला आहें. तें ज्ञान खोटें असें कोण म्हणेल ? ते अनुभव खोटे असें कोण म्हणेल ? महापुरुष सांगतात की, आम्हांला असे असे अनुभव आले. ते प्रत्यक्षाच्याच गोष्टी बोलतात, करतात. तुम्हांआम्हांला जें प्रत्यक्ष नसतें तें त्यांना असतें. त्यांना तें पाहण्याचे डोळे असतात. जणुं निराळींच इंद्रियें मनाला फुटतात ! कांही असो, ती आत्मवंचना खास नव्हती. 'तो मी परमेश्वराचा दूत गॅब्रिअल. मी तुला परमेश्वराचा मंगल संदेश घेऊन आलों आहें. ऊठ. ईश्वराचा महिमा गा. उत्साही हो. पवित्र हो. शुध्द हो. प्रत्युपकाराची, फळाची अपेक्षा ठेवून उपकार करुं नको. तूं भलें कर. सर्वांचें मंगल कर. तुझ्या मंगल कार्याला फळ येईल. वाट पहा. ईश्वरावर श्रध्दा ठेवून धीरानें, उतावीळ न होतां वाट पहा.' असे शब्द त्यांना ऐकूं येत. जणुं समोर दिसत. आणि संशय झडझडून टाकून आत्मविश्वासानें एका परमेश्वराचें, त्या अद्वितीयाचें महागान गावयास ते उभे राहिले.