मुहंमद म्हणाला, 'त्या प्रभूचा जयजयकार असो. त्या प्रभूनें या आपल्या बंद्या सेवकाला त्या रात्रीं पृथ्वीच्या मंदिरांतून स्वर्गाच्या मंदिरांत नेलें. तेथील दैवी खुणा पहाव्या म्हणून आम्ही त्याला नेलें. ज्या मंदिराची आम्ही देवदूत नेहमीं स्तुति करतों त्या मंदिरांत पैगंबरास नेलें.' कुराणांतील हे जे उल्लेख आहेत त्याभोंवतीं सुंदर काव्यें जन्मलीं आहेत. किती तरी भव्य दिव्य दंतकथा गुंफिल्या गेल्या आहेत. स्टॅन्ले लेनपूल म्हणतो, 'कांही असो. हें दर्शन, भव्य दर्शन जरी काव्यमय असलें तरी तें अत्यंत अर्थपूर्ण आहे. त्यांत खोल अर्थ होता.' कोणता बरें तो खोल अर्थ ? तो अर्थ हा कीं निराशेंतहि मुहंमद आशेच्या स्वर्गांत जणुं वावरत होते !

आणि आशा घेऊन मुसब आला. ज्या टेकडीवर त्या बारा जणांनीं पूर्वी ती पहिली शपथ घेतली होती, त्या टेकडीच्या पायथ्याशीं ते सारे भक्त जमले. रात्रीची वेळ होती. पैगंबराचे आवडते तारे चमकत होते. अपूर्व शांति होती. विरोधक झोंपले होते. मुहंमद त्यांना म्हणाले, 'तुम्ही मला व मक्केंतील माझ्या अनुयायांना तुमच्या यसरिब शहरांत बोलवीत आहांत. परंतु यांत धोका आहे. मक्कावाले हल्ला करतील. संकटे येतील.'

परंतु ते सारे एका आवाजानें म्हणाले, 'संकटांची कल्पना ठेवूनच आम्ही नवधर्म स्वीकारला आहे. हे प्रभूच्या प्रेषिता, सांग, कोणतीहि शपथ घ्यायला सांग. प्रभूसाठीं व तुझ्यासाठीं वाटेल ती शपथ आम्ही घेऊं.'

पैगंबरांनीं कुराणांतील कांहीं भाग म्हटले. नंतर सर्वांसह त्यांनीं नमाज केला त्यानंतर या नवधर्मावर प्रवचन दिलें. मग ती पूर्वी बारांनी जी प्रतिज्ञा घेतली होती तिचा पुनरुच्चार सर्वांनी केला. परंतु त्या प्रतिज्ञेंत पुढील शब्द जोडले गेले, 'मुहंमद व त्यांचे अनुयायी यांचें आम्ही रक्षण करुं. जसें आम्ही आमच्या बायकामुलांचें रक्षण करतों !'

नंतर यसरिबच्या लोकांनी विचारलें, 'देवासाठीं आम्ही मेलों तर आम्हांला कोणता मोबदला मिळेल ?'
"परलोकीं सुख.' पैगंबर म्हणाले.

"तुम्हांला चांगले दिवस आले तर तुम्ही आम्हांस सोडणार तर नाहीं   ना ? तुमच्या लोकांकडे परतणार नाहीं ना ?'

"नाहीं, कधींहि नाहीं. तुमचें रक्त तेंच माझें. मी तुमचा, तुम्ही माझे.'

"तर मग द्या तुमचा हात.' एक म्हातारा एकदम उठून म्हणाला.

मुहंमदांनीं हात पुढें केला. प्रत्येकानें तो आपल्या हाती घेतला. प्रत्येकानें मुहंमदांच्या हातावर वेदूइनांच्या पध्दतीनें हात ठेवून शपथ कायम केली.

हें सर्व होतें न होतें तों पाळतीवर असलेल्या एका मक्कावाल्याचा आवाज आला. सारे घाबरले. परंतु पैगंबरांच्या धीर गंभीर वाणीनें सर्वांना आश्वासन मिळालें. या पाऊणशेंतील बारा जणांस पैगंबरांनीं आपले प्रतिनिधि म्हणून केलें. 'नकीब' म्हणून नेमलें. आणि म्हणाले, 'मूसानें असेच बारा निवडले होते. तुम्ही बारा इतरांची जणुं ग्वाही. आणि मी सर्वांसाठी ग्वाही.'

यसरिबला परत जाण्यापूर्वी मुसबला आईला भेटावें असें वाटलें. तो आईचा व आपल्या जमातीचा फार लाडका होता. परंतु नवधर्म घेतल्यापासून तो अप्रिय झाला होता. तो म्हणून अबिसिनियात गेला होता. तो आईकडे गेला.

"अरे आज्ञाभंगका, मक्केंत तुझी आई राहाते. त्या आईला आधीं कां नाहीं भेटलास ? मीं तुला निरोप पाठवला होता कीं आधीं मला भेट. परंतु तूं दुसरीकडे गेलास.' आई म्हणाली.
"आई, पैगंबर देवाचे आहेत. म्हणून त्यांची आधीं भेट. मग तुझी, इतरांची'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इस्लामी संस्कृति


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गावांतल्या गजाली
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
खुनाची वेळ
भारताची महान'राज'रत्ने
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी