अरबस्थानांतील स्त्रीजीवन
अरबी भाषेंतील म्हणींतून स्त्रियांविषयी अनुदारता व निष्ठुरता दिसून येते. विवाहबंधनें नांवाला असत. वर म्हणे, ''मी तुला मागणी घालतों.'' वधू म्हणे, ''मी स्वतःला तुला देतें.'' आणि गांठ मारली जाई-परंतु ही गांठ सहजपणें सुटे. इस्लामपूर्व अरबस्थानांत बहुपातित्व होतें. स्त्रीनें तंबु सोडला कीं सुटला संबंध. पुन्हा पति निवडायला ती मोकळी असे. प्रत्यक्ष ती आपण होऊन पति निवडी वा आईबापांच्या द्वारां. वाटेल तेव्हां ती सोडचिठ्ठीहि देई. मलबारच्या नायक लोकांत आतांआतांपर्यंत अशीच चाल होती. नायर नारी अनेक पति करीत. मुलांना आपला बाप कोणता तें कळत नसे. ती आईजवळ रहात. स्टॅबो म्हणतो, ''अरबांची सामाईक इस्टेट असे. सर्वांत वडील तो कुटुंबाचा मुख्य. सर्वात मिळून एक पत्नी! तिच्याजवळ जो असे तो तंबूच्या बाहेर आपली काठी खूण म्हणून उभी करून ठेवी. ती काठी पाहून आंत कोणी येत नसे.''
अरबांत मातृप्रधान कुटुंबपध्दत जुनी होती. मुहंमदांनीं नवधर्म दिल्यावर ती पितृप्रधान झाली. इस्लामपूर्व अरबांत स्त्रिया म्हणजे मालमत्ता मानीत! पिता मेल्यावर मुलगा स्वतःच्या जन्मदात्या आईशिवाय इतर आयांशी लग्न लावी! सास्वाहि पत्नी होत. जोपर्यंत पत्नी माता झाली नाही तोपर्यंत ती तुच्छ मानली जाई. ती पुत्रवती झाल्यावर महत्त्वाचंची होई, कारण ऐक्याचें बंधन आतां तिनें निर्मिलें. मनुष्य आपल्या पत्नीपेक्षां आपल्या मातेस अधिक मान देई.
आईच्या सबंध पत्नीच्या संबंधापेक्षा अधिक शाश्वत वाटे. जोपर्यंत पत्नी स्वच्छेनें पत्नी म्हणून वागत आहे तोपर्यंत पति हा तिचा धनी असे. ती जणूं त्याची मिळकत दासी. तिनें त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे. तिला ऐकायचें नसेल तर ती तसें करू शकत असे. कारण कायदेकानू थोडेच होते? तिचें स्वातंत्र्य मर्यादित असे, परंतु ती त्याला सोडूं शकत असे. तें स्वातंत्र्य मर्यादित असे, परंतु ती त्याला सोडूं शकत असे. ते स्वातंत्र्य तिला असे. इतर देशांच्या मानानें तेथें अधिक स्वातंत्र्य होते. कारण मातृप्रधान कुटुंबसंस्था होती. कुटुंबाचे मूळ म्हणून मातेकडे पाहिलें जाई. पित्याकडे नाही.
नागर अरब व वाळवंटांतील बेदुइन या दोघांची स्त्रियांकडे पाहण्याची द्दष्टि निराळी होती. बेदुइनांमध्यें स्त्रियांविषयीची दाक्षिण्यवृत्ती होती. तो उदारतेनें त्यांच्याकडे पाही, कवींच्या काव्यांत स्त्रियांविषयी उदारता आहे, परंतु कवि हे जात्याच दिलदार व उदार असतात. इतरांपेक्षा सहृदय व संस्कारी असतात. परंतु बेदुइन हा आपल्या प्रेयसीला मालकीची वस्तु मानीत नसे, तर पूजनीय देवता मानी ! अरक्षित कुमारिकांना वाळवंटी वीरांनी कसें सभ्यतेनें व दाक्षिण्याने वागविले याची काव्यांतून अनेक उदाहरणे आहेत. सुधारलेल्या लोकांत ध्येय व आचार यांत अंतर असतें. परंतु वाळवंटांतील अरबांचे तसें नसे. ध्येयानुरूप त्यांचा आचार असे. वाळवंटांतील अरब महिला निराळीच होती. तिचें जनानखानी जीवन नसे. ती मोकळी असे. ती अपरिचित पुरुषपाहुण्यांचें स्वागत करी. कोणी संशय घेत नसे. ती स्वतःच्या चारित्र्यास प्राणाहून जपे. दुसरा कोणी वाली जवळ असावा असें तिला वाटत नसे. ती भित्री नसे. पुरुषांना जसें शौर्य-औदार्य, तसें स्त्रीला सतीत्व, पवित्र चारित्र्य! त्या काळांत व्यभिचार म्हणजे न धुतला जाणारा कलंक मानला जाई. पत्नी पतीला शौर्याची कृत्यें करायला प्रेरणा देई. विजयी होऊन तो येई व त्याची स्तुति करी. या स्तुतीचा अरब मोठा भोत्तच असे. अंताराची गोष्ट सुप्रसिध्द आहे. स्त्रियांच्या रक्षणार्थ जखमी झाला तरी तो उभा होता. ''मी या खिंडीच्या दाराशीं भाला रोंवून उभा राहतों. तुम्ही जा. सुरक्षित जागीं जा.'' स्त्रिया गेल्या. आणि पाठलाग करणारे आले. भाला रोंवून घोडयावर हात ठेवून अंतारा उभा होता! शत्रू जवळ यायला धजेना, परंतु घोडा हलला. आणि त्याला टेकून उभा असलेला अंतारा खाली पडला. त्याचे प्राण आधींच निघून गेले होते.