आणि मुहंमद थरारुन उठे. 'अल्ला हु अकबर !' घोषणा त्यांच्या मुखावाटे बाहेर पडे. आणि समोरचें अशांत वाळवंट ऐके. पहाड ऐके. मुहंमदांस भव्य दर्शनें व्हायचीं. देवदूत दिसायचे. परमेश्वर व मर्त्य मानव यांच्यांत जा-ये करणारे देवदूत त्यांना दिसत. आणि ती एक धन्यतम रात्र आली. सर्व सृष्टीवर दैवी शांतीची पाखर घातलेली होती. तारे चमचम करीत होते. अपार शांति. मुहंमद विचारमग्न होते आणि एक अत्यन्त सामर्थ्यसंपन्न आवाज समुद्रगर्जनेप्रमाणें आला, 'घोषणा कर, घोषणा कर.' दोनदां स्पष्ट आवाज आला.

"काय घोषणा करूं, कसली घोषणा करूं ?'
"देवाच्या नांवानें घोषणा कर.'
पुन्हां तिस-यांदा आवाज आला, 'घोषणा कर.'
पुन्हां मुहंमदांनीं विचारलें 'काय घोषवूं, काय पुकारुं ?'

आणि एकदम ईश्वरी ज्ञानाचें पुस्तक त्यांच्यासमोर उघडें केलें गेले ! मुहंमदांच्या आत्म्यासमोर दैवी पुस्तक उघडें केलें गेलें. मुहंमदांस सारें ज्ञान करुन देण्यांत आलें. जें ज्ञान मनुष्याला अगम्य असतें तें करुन दिलें गेलें. इंद्रियातील ज्ञान. जीवनाच्या संपूर्ण जाणीवेनें होणारें ज्ञान. ईश्वराशीं एकरुप होऊन होणारें ज्ञान. मुहंमद त्या समाधींतून उठले. हृदयावर ते शब्द जणुं खोदल्यासारखे होते. ते थरथरत होते. शतभावनांनी कंपायमान होत होते. ते धांवत घरीं आले. खदिजा तेथें होती.

"खदिजे, खदिजे, काय आहे हें सारें, खरेंच काय ?' असें म्हणून गळाल्यासारखा तो पडून राहिला. खदिजा त्यांच्याकडे पहात होती. पुन्हां मुहंमद म्हणाले, 'खदिजे, लोक खरें मानोत वा न मानोत. मी शांतीचा संदेश देणारा तरी आहें किंवा सैतानानें-भुतानें पछाडलेला पागल तरी आहे !'

खदिजा प्रेमानें म्हणाली, 'हे अबुल कासिम, परमेश्वराला माझी करुणा आहे. तो माझा रक्षणकर्ता. तो प्रभु वेडेवांकडें नाहीं हो कांही करणार. तूं कधींहि खोटें बोलत नाहींस. अपकारांचा बदला अपकारानें घेत नाहींस. तूं श्रध्दावान् आहेस. निदोष व पवित्र तुझें जीवन आहे. आप्तेष्ट, सखेसोयरे, सर्वांशीं तू प्रेमानें वागतोस. सर्वांवर दया करतोस. तूं बाजारांतील गप्पाडया नाहींस. काय पाहिलेंस ? सारें सांग बरें मला. कांहीं भव्य भीषण का पाहिलेंस ?'

आणि मुहंमदांनीं सारी हकीगत सांगितली. सारें ऐकून खदिजा म्हणाली, 'ऊठ, ऊठ. आनंदानें नाच. तूं खरोखरच लोकांचा पैगंबर होणार. खात्रीनें. संशयच नाहीं. ज्याच्या हातांत या खदिजेचें जीवन आहे त्या प्रभुची शपथ. धीर धर. उत्साह धर.' नंतर खदिजा उठली व त्या अज्ञेयवादी, ईश्वर एक असें म्हणणा-या वरकाकडे ती गेली. वरका आतां वृध्द झाला होता. अंध झाला होता. ज्यू, ख्रिश्चन यांचे धर्मग्रंथ त्यानें अभ्यासिले होते. तिनें त्याला सारें वर्तमान निवेदिलें. तो एकदम उचंबळू म्हणाला-
"कुददूसुन कुददूसुन !'

"किती पवित्र गोष्ट, खरेंच किती पवित्र !' हाच सर्वश्रेष्ठ पैगंबर. हाच नामूस अल-अकबर. देवाचा सर्व श्रेष्ठ देवदूत. मोझेसला तो दिसला. येशूकडेहि तोच आला. तोच मुहंमदाकडेहि आज आला. जा. मुहंमदांस सांग कीं तूं आपल्या लोकांचा पैगंबर होणार. म्हणावें घाबरुं नकोस. हृदय शांत कर. शूर, धीर बन.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel