तिसरा अनुयायी झैद झाला. तो गुलाम ज्याला मुहंमदांनी एकदम मुक्त केलें होतें. त्यानें हा नवधर्म घेतला. आणि चौथे अनुयायी कोण झाले ? अबुबकर. ते मक्केंतील श्रीमान् व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे, होते. मुहंमदांस 'अल-अमीन' म्हणत, तसें यांना 'अस-सिद्दीक' म्हणजे सच्चा असें म्हणत. मुहंमदांहून दोनच वर्षांनी ते लहान होते. त्यांना अब्दुल काबा म्हणजे काबाचा सेवक असेंहि म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषानें हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पांच या नवधर्मांत आले. अबुबकर पुढें खलिफा झाले. तसेंच पुढें खलिफा होणारे उस्मान हे मिळाले. उस्मान हा प्रतिस्पर्धी उमैय्या घराण्यांतील होता. दुसरा अब्दुर रहमान तिसर साद-ज्यानें पुढें इराण जिंकून घेतला. चौथा खदिजेचा नातलग झुबैर. आणि पांचवा तो शूर लढवय्या तल्हा. उस्माननें नवधर्म स्वीकारला हें ऐकून त्याचे चुलते संतापले.
त्यांनीं उस्मानला बांधलें व विचारलें, 'पूर्वजांच्या धर्मापेक्षां तुलां का हा नवा धर्म पसंत आहे ? जो नवा धर्म तूं घेत आहेस तो जोंपर्यंत तूं सोडणार नाहींस, तोंपर्यंत मी तुला सोडणार नाही.' परंतु उस्मान उत्तरला, 'त्या परमेश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतों, कीं तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाहीं !'
कांहीं अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेंतीलहि मिळाले. मक्केतील कांही निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हबशी 'बिलाल' इस्लामी इतिहासांत प्रसिध्द आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिध्द आहे. पैगंबरांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रध्देचा धर्मात्मा होता. मुहंमद प्रेमानें म्हणत, 'बिलाल म्हणजे अबिसिनियाचें सर्वोत्तम फळ आहे !'
मुहंमदांच्या अत्यंत जवळचे आप्त मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहंमदांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ति, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींस मुहंमदांच्या शिकवणींत वंचना दिसती, अश्रध्दा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहंमदांची सामाजिक सुधारणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातींत मिळाली असती. या अनुयायांनीं छळ सहन केलें. संकटें सोसलीं. शारीरिक वेदना व मानसिक दु:खें सहन केला. बहिष्कार, मरण यांनाहि तोंड दिलें. मुहंमदांच्या ठायीं त्यांना यत्किंचितहि काळें दिसतें तर अशी अडग श्रध्दा जन्मती का ? ख्रिस्तावर त्याच्या भावांचा, जवळच्या मंडळींचा यत्किंचितहि विश्वास नव्हता. परंतु मुहंमद या बाबतींत दैववान् होते. मुहंमदांच्या अनुयायांची अचल श्रध्दा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविषयींच्या अत्यन्त प्रामाणिकपणाची खूण आहे.
परंतु प्रचार फार झपाटयानें होईना. वडाचें झाड का एकदम वाढतें ? मूर्तिपूजेपासून स्वबांधवांस परावृत्त करण्यासाठीं तीन वर्षे मुहंमद शांतपणें, परंतु अविरतपणें खटपट करित होते. तीन वर्षांत तीस अनुयायी फक्त मिळाले ! मूर्तिपूजा फार दृढमूल झालेली. या प्राचीन धर्मांत पुन्हां अन्य आकषणें होतीं. या नव्या विशुध्द धर्मांत तसें कांहीं एक नव्हतें. जुन्या मूर्तिपूजेंत कुरेशांचा स्वार्थ होता. तो धर्म कायम राहण्यांत त्यांची प्रतिष्ठ होती. मुहंमदांना या मूर्तिपूजेविरुध्द व तदंतर्गत वतनदारीविरुध्द, दोहोविरुध्द लढावयाचें होतें आणि म्हणून अनुयायी वाढतना. तीन वर्षांत तीस. महिन्याला एकहि पडला ! परंतु मुहंमदांचें हृदय खचलें नाहीं. परमेश्वरावर त्यांचा भरंवसा होता. कुराणांत पुन:पुन्हां म्हटलें आहे कीं, 'ईश्वरावर श्रध्दा ठेवून वाट पहा.' ते उद्गार याच कसोटीच्या काळांतील असतील.
तीन वर्षेंपर्यंत फारसा उघड विरोध त्यांना झाला नाहीं. कारण मुहंमदांनींहि उघड बंड पुकारलें नव्हतें. लोक त्यांना माथेफिरु, पागल म्हणत ! भुतानें, सैतानानें पछाडलें आहे असें म्हणत. मुहंमद जाहीरपणें अद्याप प्रचार नव्हते करीत. कोणा परकीयांशीं बोललें तर एकदम त्याच्या मूर्तिपूजेवर हल्ला नसत चढवीत. शांतपणें व दृढतेनें सांगत, 'तो एक प्रभु ओळखा. त्याची, त्या एकाची पूजा करा.' हा शांतिदूत कीं, वेडा ? याच्या शब्दांत सत्य आहे का ? लोकांस आश्चर्य वाटे.