सीरियांतील एका प्रवासांत हाशीम मरण पावला. इ.स. ५१० मध्यें ही गोष्ट झाली. त्याला एक मुलगा होता. त्याचें नाव शयबा परंतु हाशीमचें काम त्याचा धाकटा भाऊ मुत्तलिब याच्याकडे आलें. मुत्तलिबला फार मान मिळे. त्याला अल-फैज म्हणजे उदार अशी पदवी होती. शयबा आईसह यसरिब येथें आजोळी होता. शयबाची आई सल्मा ही यसरिबची. यसरिब म्हणजे मदिना. मुत्तलिब शयबाला नीट वागवी. लोक म्हणत शयबा म्हणजे मुत्तलिबचा जणुं गुलाम आहे. त्याला ते अब्दुल-मुत्तलिब म्हणजे मुत्तलिबचा गुलाम असें म्हणत! पैगंबरांचे आजोबा अब्दुला मुत्तलिब या नांवानें इतिहासांत ओळखले जातात. मुत्तलिब इ.स. ५२०मध्यें मेला. आणि पैगंबरांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब हे मक्केच्या सार्वजनिक जीवनाचे सूत्रधार बनले.
या वेळेस मक्केचें काम दहा जणांत वांटून दिलें होते. दहा खातीं दहा जणांकडे. अशी परंपरा पडली होती कीं या दहांत जो सर्वांत वयोवृध्द असेल त्याला सर्वांनी अधिक मान द्यायचा. तो पुढारी. त्याला रईस किंवा सय्यद म्हणत. मुहंमदांचे चुलते अब्बास हे या दहांतील प्रमुख होते. चारित्र्य व दानत यामुळें अब्दुल मुत्तलिब यांचेंच प्रभुत्त्व होतें.
अब्दुल मुत्तलिब यांना संतति होत नव्हती. ''मला संतति होऊ दे. एक मुलगा तुला देईन.'' असा त्यांनीं काबाला नवस केला. आणि पुढें पुष्कळ संतति झाली. बारा मुलगे व सहा मुली. नवस फेडण्यासाठी आवडता मुलगा अब्दुल याचा बळी तो देणार होता. परंतु देवानें आवाज दिला शंभर उंट दे, म्हणजे पुरे ! अब्दुल मुत्तलिबनें तसें केलें. तेव्हांपासून शंभर उंट दे, म्हणजे पुरे ! अब्दुल मुत्तलिबनें तसें केलें. तेव्हांपासून शंभर उंट म्हणजे खुनाची नुकसान भरपाई असें ठरले !
देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला जो हा अब्दुलज तोच पैगंबरांचा पिता. त्याचें अमीनाजवळ लग्न झालें. अमीनाहि यसरिबची होती. याच सुमारास म्हणजे इ.स. ५७० या वर्षी एक महत्त्वाची गोष्ट झाली. यमनच्या अबिसिनियन अधिका-यानें सना येथें एक चर्च बांधले. काबामुळें मक्केला असलेलें पावित्र्य व वैभव नष्ट करावें असें त्याच्या मनांत होतें. कोणी मक्कावाल्याने हे चर्च भ्रष्ट केलें. तेव्हां हबशी सुभेदार मोठें सैन्य घेऊन मक्केवर चालून आला. तो स्वतः प्रचंड हत्तीवर बसला होता. तो हत्ती पाहून अरब दबकले. त्यांनी हत्तीचा शक सुरू केला ! हबशी जवळ आले. कुरेश बायाकामुलांसह पहाडांत पळाले. काबाच्या देवता आपला सांभाळ करतील म्हणाले. काय होतें तें ते दुरुन पहात होते. भव्य उषा उजळली. अबिसिनियन मक्केकडे निघाले. परंतु काय आश्चर्य ! पक्ष्यांची प्रचंड सेना आली. आणि हे पक्षी दगडांचा वर्षाव करूं लागले. आणि नंतर आकाशांतील मोटा सुरू झाल्या. प्रचंड पर्जन्य ! असा पाऊस कधीं पडला नाहीं. शेंकडों लोक दगडांनी मेले. पाण्यानें मेलेले वाहून जाऊं लागले. समुद्रास मिळाले ! हबशी व्हॉइसरॉय पळाला. तोहि घायाळ झाला होता. लौकरच मेला. याच वेळेस अरबस्थानांत प्रथम देवीची साथ आली. इतिहासकार म्हणतात चिमण्या व पाऊस ही दंतकथा असावी. कोणती तरी सांथ येऊन हे सैन्य नष्ट झालें असावें. मात्र कधीं कधीं मक्केच्या खो-यांत अपरंपार पाऊस पडतो ही गोष्ट खरी.