सर्वत्र प्रचंड नद्या. गरीब लोकांना पाण्यांत जणुं रहावें लागतें. मलेरिया, डांस. अशा सर्द हवेंत अंगांत उष्णता रहाण्यासाठीं मासे न खातील तर काय करतील. माशांऐवजी अमुक एक वनस्पत्याहार केला तर तोच परिणाम होईल, असें कोणी प्रयोगानें जोंपर्यंत दाखवीत नाहीं आणि तो आहार सर्वांना, गोरगरिबांना परवडेल व मिळेल असें जोंपर्यंत दाखवीत नाहीं, तोपर्यंत बंगाल्यास नावें नका ठेवूं. त्यांना मासे खाऊं दे व भरपूर काम करूं दे. देशसेवा करूं दे.' आणि एका प्रख्यात चिनी लेखकानें चीनच्या सर्वभक्षत्वाविषयीं लिहितांना म्हटलें आहे, 'चीनमधील अपरंपार लोकसंख्या, सदैव येणारे पूर, येणारे दुष्काळ, होणारी वादळें, नद्यांचे बदलणारे प्रवाह, हें सर्व ध्यानांत घ्या व मग चिनींच्या खाण्यावर टीका करा.'

पैगंबर शक्य तें सांगत. अशक्य ध्येयें त्यांनीं दिलीं नाहींत. यात्रेच्या वेळेस उंट मारतात. परंतु पैगंबरांनीं स्वच्छ सांगितलें आहे कीं उंटाचें रक्त देवाला मिळत नसतें. देव सत्कर्मे बघतो. मग त्यांनीं तीं चालू कां ठेविली ? त्यामुळें गरिबांना जेवण मिळतें. पोटभर मेजवानी मिळते. पशूंच्या बलिदानानें स्वर्गप्राप्ति, प्रभुप्राप्ति त्यांनीं कधीं सांगितली नाहीं. 'हत्या करण्यापूर्वीहि देवाचें नांव घ्या. शस्त्र तीक्ष्ण असूं दे. हाल करूं नका.' असें मुहंमदांनीं सांगितलें आहे. भक्षणार्थ हिंसा 'मुभा' असे कुराणी धर्म मानतो.

पशुपक्ष्यांविषयीं त्यांना प्रेम वाटे. एकानें घरटयांतून पिलें चोरुन आणिलीं. ती पक्षीण घिरटया घालीत येत होती. तो गृहस्थ पिलें घेऊन, मुहंमदाकडे आला. पैगंबर म्हणाले, 'तीं पिलें त्या चादरीवर ठेव.' त्यानें तसें केलें. ती पक्षीण प्रेमानें झळबूंन तेथें एकदम आली. पैगंबर म्हणाले, 'पहा हें प्रेम. ईश्वराचें याहूनहि अधिक प्रेम सर्वांवर आहे. जा, हीं पिलें पुन्हां त्या घरटयांत नेवून ठेव.'

असे हे प्रेमधर्मी मुहंमद होते. जे अनाथ, परित्यक्त असत ज्यांना कोणी नसे, जे दु:खी व रंजले गांजलेले असत ते मुहंमदांजवळ येत, दु:खें सांगत. मुहंमद त्यांच्याजवळ बसत, बोलत, चौकशी करीत. बायका आपल्या निर्दय पतींच्या तक्रारी घेऊन येत. अगदीं गरीब गुलामहि त्यांच्याकडे येत व त्यांचा हात धरुन त्यांना आपल्या धन्याकडे नेत व म्हणत, 'सांगा या आमच्या मालकांना दोन शब्द. आम्हांला नीट वागवायला सांगा. मुक्त करायला सांगा.' गरीब झोंपडयांतून ते जायचे. सर्वांची विचारपूस करायचे. सर्वांचे अश्रु पुसायचे, जवळ असेल तें द्यायचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel