अरबजीवनांतील काव्य
अरबांत शिक्षण फारसें नव्हतें. मध्य अरबस्थानांतील अरब तर अगदींच अडाणी, अशिक्षित असे. परंतु पोवाडे त्याला आवडत. त्याला वर्णनें आवडत. ते अलंकारिक बोले. बेदुइनांच्या भाषेंत जोर असे. ओज व माधुर्य असे. एक प्रकारची अर्थपूर्णता व सुटसुटितपणा असे. साहित्य फारसें नव्हतें तरी भाषा वक्तृत्वपूर्ण व समृध्द होती. बेदुइन हा भावनोत्कट असल्यामुळें सुंदर व जोरदार शब्दांचा भोत्तच होती. त्याची साधी भाषा, परंतु ती फार काव्यमय बनली. सामाजिक व लढाऊ वृत्तीचें उत्कट प्रतिबिंब तिच्यांत होतें. भाषा विकसित झाली तरी लिखित वाङमय फारसें नव्हतें. ज्ञानाची अशी साधना अद्याप नव्हती. अरबी स्वभावाशीं जुळत अशाच साहित्याच्या शाखा वाढल्या. काव्य अलंकार, वक्तृत्व यांची वाढ झाली. सुंदर शब्दांनी वेडे होणारे अरबांसारखे लोक पृथ्वीवर दुसरे नाहीत! ते शब्दब्रह्माचे, शब्दसौंदर्याचे उपासक होते. शब्दांच्या छटा छटा ते बघतं. भाषा नाना अर्थ प्रसवणारी झाली. प्रभावी वक्तृत्वाला ही भाषा फार उपयोगी पडे. पराक्रमांचे पोवाडे गाता यावेत म्हणून काव्याचा अभ्यास सुरू झाला. काव्य म्हणजे प्रचाराचें एक साधन होतें. जीवनाचें व भावनांचेंहि तत्द्वारा प्रकटीकरण. अरबी काव्यांत उदात्त, गहनगूढ असें कांही नसे. जीवनाची-मरणाची, सोऽहंकोऽहंची मीमांसा नसे. आपलें कूळ, कुटुंब, जात यांच्या गौरवार्थ तें असे. त्यांच्या मनांत तात्त्वि संशय नव्हते. नसत्या कल्पना त्याला अद्याप सतावत नव्हत्या- तो निसर्गाचें संतान होता. वाळवंटाचें लेकरूं होता. प्रगल्भ संस्कृतीचा तो पुत्र नव्हता. बुध्दीची फारशी वाढ झाली नव्हती. म्हणून गंभीर वाङमय त्याच्याजवळ नव्हतें. इतर कलांतहि फारशी प्रगति नव्हती. साहित्य नाही, चित्रकला नाहीं. शिल्पहि ओबडधोबड! वाळवंटांत दगडहि नाहींत, तर शिल्प तरी कोठून येणार? सुंदर मूर्ति तरी कोण घडवणार? कांही थोडया फार मूर्ति असत. परंतु साधे दगडच तो पूजी. थोडेसें काव्य व संगीत याखेरीज फारसा कलाविलास त्याचा नव्हता.
अरब हा काव्यासाठी वेडा होई. सर्व जगांत आपली भाषा उत्कृष्ट असें त्याला वाटे. वक्कृत्व व काव्य या परमेश्वराच्या सर्वात थोर, उत्कृष्ट देणग्या असें तो मानी. ज्या ज्या वेळेस मोठी मेजवानी होई, समारंभ असे, किंवा मोठा आनंद असे, त्या वेळेस तीन कारणें असत. जमातीच्या पुढा-यास मुलगा किंवा घोडीस शिंगरू झालें म्हणजे, किंवा एखादा मोठा कवि जातींत प्रकट झाला तर. कवीचें आगमन म्हणजे आपल्या जमातींतील वीरांचे अमर योशागान व वै-यांचे अमर अपकीर्तिगान. तरवार व भाला यांच्यापेक्षां अधिक मोठा विजय कवीची वाणी मिळावी. ती विजयकीर्ति अरबस्तानभर जाई व एखादें मार्मिक कविवचन अरबास डोलवी. अरबस्थानांतील मोठमोठे वीर स्वतः कविहि असत. त्यांची काव्यशक्ति त्यांच्या मुकुटांतील मोलवान हिरा मानला जाई. कवि असणें हें खानदानपणाचे व दिलदारपणाचें लक्षण मानीत. खलिफा उमर म्हणे, ''अरबांचे खरे राजे कवि व वक्ते हो होत. बेदुइनांचे सर्व सद्गुण ते आचरतात व काव्यांत अमर करतात.''
प्राचीन अरबकाव्य अरब जीवनांचें प्रतिबिंब आहे. या जगाच्या धांगडधिंग्यांपासून अरब दूर असे. वाळवंटांत असे. तेथें लहान मुलांचें अकपट जीवन तो जगे. दिलेलें, देवानें व दैवानें दिलेलें सुख भोगी. तो तेथील निसर्गात रमे. वाळवंटाची हवा खाई. सुंदर, सतेज, निरोगी, ताजा हवा ! वा-यांचे संगीत ऐके. त्याच्या काव्यांत सर्वत्र वाळवंटाचा वास दरवळून राहिलेला आहे. हे काव्य भावनाप्रधान, सरळ, उत्कट आहे. तेथें गूढगुंजन नाहीं. आत्मानात्म नाहीं. जीवनांतील व घटकेचा आनंद त्यांत आहे. या काव्यांत सृष्टीचें वर्णन आहे. सहजसुंदर, अकृत्रिम, मोकळें वर्णन ! वाळवंटांतील देखावे, रात्रीच्या वेळी पहाडांतून, द-याखो-यांतून जावयाचे रोमांचकारी प्रसंग, जेथें भुतेप्रेते पिशाच्चें राहतात तेथून जाणें, ओसाड वाळवंटांतील नीरव शांति, निःस्तब्ध भव्य भीषणता; आणि वखवखलेले लांडगे भेटणे; भर दुपारीं वाळवंटांत येणारी ग्लानि; वाळूचें वादळ उठून गुदमरून जाण्याचा प्रसंग; मृगजळाचें सुंदर, पण फसवे देवावे; ताडाच्या झाडांची छाया; थंडगार शीतल विहिरीजवळचा आनंद; हे सारें अरब काव्यांत आहे.