हातीमच्या मुलीचें नांव सुफाना असें होतें. ती पैगंबरांस म्हणाली : 'हे परमेश्वराच्या प्रेषिता, माझा बाप आज जिवंत नाहीं. मला एकच भाऊ परंतु तोहि आज द-याखो-यांत पळून गेला आहे. मी स्वत: खंडणी भरुन मुक्त होऊं शकत नाहीं. तू उदार हृदयाचा आहेस. मला स्वतंत्र कर. माझा पिता विश्वविख्यात होता. तो आमच्या जमातीचा नेता होता, राजा होता. तो कैद्यांची खंडणी भरुन त्यांना मुक्त करीत असे. तो स्त्रियांची अब्रू सांभाळी, त्यांची प्रतिष्ठा राखी. तो गरिबांना पोषी, दु:खितांना शांतवी. कोणी कांहीं मागितलें तर त्यानें कधीं नाहीं म्हटलें नाहीं. अशा त्या हातिमची मी मुलगी. सुफाना माझें नांव. मला तूं मुक्त नाहीं करणार ? माझ्या लोकांस मुक्त नाहीं करणार ? तुझ्या उदार हृदयाला मी प्रार्थितें, उदार अशा तुझ्या आत्म्याला हांक मारुन विनवितें.'
पैगंबर म्हणाले, 'तुझ्या पित्याच्या अंगीं ख-या मुसलमानाचे गुण होते. मूर्तिपूजक असूनहि त्यावर ईश्वराची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना करण्याची जर मला परवानगी मिळाली तर मी हातिमांच्यासाठीं प्रार्थना करीन.' नंतर सभोंवतींच्या मुसलमानांस उद्देशून ते म्हणाले, 'हातिमांची मुलगी मुक्त आहे. तिचा बाप उदारांचा राणा होता. माणुसकीची मूर्ति होता. जे दयावंत असतात त्यांच्यावर प्रभु प्रेम करतो. ते देवाचे लाडके होतात. ईश्वर त्यांना बक्षीस देतो.'
सुफाना मुक्त झाली. सारेच मुक्त करण्यांत आले. मुहंमदांनीं सर्वांना देणग्या दिल्या. ते सारे नवधर्म घेते झाले. सुफाना सीरियांत भावाकडे गेली व त्याला मुहंमदांचें औदार्य सांगती झाली. अदीचें हृदय कृतज्ञतेनें भरुन आलें. तो मदिनेला आला. मुहंमदांच्या चरणीं लागला. इस्लाम स्वीकारता झाला. सुफानाच्या या प्रसंगावर इराणी कविराज सादी याच्या बोस्ताँमध्यें सुंदर कविता आहेत. उदात्त असाच तो प्रसंग होता. जीवनांतील महान् काव्य त्या प्रसंगीं प्रकट झालें होतें.
दुसरी एक मोझेना नांवाची जमात होती. या जमातीचा काब इब्न झुहेर हा प्रसिध्द कवि होता. हा मुहंमदांचा व नवधर्माचा शत्रु होता. उपहास व टिंगल करी. परंतु त्याचा भाऊ मुस्लिम झाला होता. हा मुस्लिमभाऊ काबला नेहमीं म्हणे, 'तूंहि मुसलमान हो. वितुष्टें वाढवूं नको. काव्यशक्ति द्वेष पसरवण्यांत खर्चू नकोस. ख-या धर्माची निंदा नको करुंस.' एकदां काब गुप्तपणें मदिनेंत आला. ज्या मशिदींत पैगंबर प्रवचन करीत होते तेथें तो गेला. पैगंबरांच्या भोंवतीं भक्तिप्रेमानें श्रोते बसले होते, उपदेशामृत पीत होते. हेच ते पैगंबर असें काबनें ओळखलें. तो एकदम पुढें घुसून म्हणाला : 'पैगंबराच्या प्रेषिता, तुझा तिरस्कार करणारा कवि काब मुसलमान होऊन जर तुझ्यासमोर येऊन उभा राहिला तर तूं त्याला क्षमा करशील ?'
"हो करीन.' पैगंबर म्हणाले.
"तर मग मीच तो काब !'
मुहंमदांच्या जवळचे लोक त्याच्या अंगावर एकदम धांवले. परंतु पैगंबरांनीं सर्वांना शांत केलें. ते म्हणाले, 'मी त्याला क्षमा केली आहे. त्याच्या केसालाहि धक्का लागतां कामा नयें.' काबचें कविहृदय उचंबळलें. त्यानें विचारलें, 'पैगंबर, मी एक कसीदा म्हणूं, पवित्र सुंदर काव्य म्हणूं ?' पैगंबर कवींना उत्तेजन देत नसत. परंतु या वेळेस त्यांनीं परवानगी दिली. काबनें स्वत:ची एक कविता म्हटली. अरबी भाषेंतील ती उत्कृष्ट कविता आहे. तें एक प्रेमगीत होतें.
कवि आपली प्रियकरीण जी सुआद तिच्या वियोगाची दु:खकथा सांगत आहे. 'माझी प्रिया मला सोडून गेली. माझें हृदय जळत आहे, झुरत आहे, मी दु:खी कष्टी आहें. अशान्त आहें. कशी आग शमवूं ? कसें हृदय शान्त करुं ? माझी लाडकी गोड सुआद. कोठें आहे ती ? तिच्या पाठोपाठ तिचा बंदा बनून मी रानोमाळ भटकत आहें. कोठें आहे ती ? कसें अवर्णनीय तिचें सौंदर्य, किती मृदुमंजूळ वाणी, कसा गोड तिचा गळा ! सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणें तिचें हसणें; प्रसन्न व मोहक स्मित !' अशी कविता चाललेली असते आणि काब एकदम विषयान्तर करतो. तो पूर्वी सुआदसाठीं वेडा होता. आतां मुहंमदांसाठीं होतो. नवधर्माचा तो महान् कवि होतो. या महान् विषयांत शिरतो व उदात्त काव्य निर्मू लागतो. सारे तन्मय होतात. आणि काव्यांतील परमोच्च शिखर येतें :
"जगाला प्रकाश देणारी महान् मशाल म्हणजे हे मुहंमद ! जगांतील सारें पाप नष्ट करणारी प्रभूची तरवार म्हणजे हे मुहंमद !!'
हे चरण म्हणतांच व ते ऐकतांच मुहंमद एकदम उठतात व आपला झगा काबच्या अंगावर घालतात ! हा झगा काबच्या कुटूंबांत सांभाळण्यांत आला होता. पुढें मुआवियानें चाळीस रिहमला तो विकत घेतला. पुढें तो झगा अब्बासींच्या हातीं गेला. शेवटीं तुर्की सुलतानांजवळ गेला. या झग्याला 'खिरका-इ-शरीफ' पवित्र झगा असें म्हणत. अत्यंत आणीबाणीच्या वेळेस या झग्याचें राष्ट्रीय निशाण करीत. काबनें जी कविता म्हटली तिचें नांव 'कसीदे बानत सुआद' असें आहे. कोणी 'कसीदत-अलबुर्दा' म्हणजे झग्याचें काव्य असेंहि नांव देतात.