बेदुइन फार रागीत असे. जपानी मासे खाऊन फार चिडखोर बनले आहेत. जरा कांही झालें तरी त्यांना झोंबते. त्यांना कांही सहन होत नाहीं. बेदुइन उंटाचें मासे खाऊन रागीट झाले. उंट कसा दिसतो? भेसूर, दुर्मुखलेला. बेदुइन स्वतःच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय कधीं रहात नसे. तसें तो न करील तर कायमची अपकीर्ति होईल. आणि बेदुइन रागावत. संतापतहि पटकन्. त्यामुळें कोण कुणाचा कधीं अपमान करील त्याचा नेम नसे. आणि मग ती वैरें पेटत. अरबांचा पूर्वतिहास म्हणजे वर्षानुवर्षे वैराचा इतिहास. सूड, खून यांचा इतिहास.
बेदुइन कुलाभिमानास फार जपे. आपला घोडा जातिवंत हवा, उंट चांगल्या रक्ताचा हवा, असें त्याला वाटे. त्याचप्रमाणे स्वतःच्या अंगांतील रक्ताचाहि तो अभिमानी असे. पूर्वजांची नांवें लक्षांत ठेवील. त्यांची सत्कृत्यें वर्णील. अशा कुळांतील मी, अशी प्रतिष्ठा मिरवील. माझ्या कुळाहून तुझें कूळ थोर असेल तर सिध्द कर असें आव्हान देईल. अशा या आव्हानांतूनहि लढाया पेटत. या कुलाभिमानामुळें जसे द्वेषमत्सर पेटत, त्याप्रमाणें सदगुणहि येत. बेदुइनची श्रेष्ठता संपत्तीमुळें नसे. तो आळसांत, विलासांत लोळे म्हणून नसे. वैयक्तिक गुणांवर त्याचा मोठेपणा असे. श्रेष्ठ कुळांत जन्मलों असें म्हणणा-यावर जबाबदारीहि असते. आपल्या कुळाची कीर्तिपरंपरा चालवण्यासाठी सा-या जगाशीं लढण्याची त्याला हिंमत ठेवावी लागे. त्या बरोबरच तो आतिथ्यशील व उदार असे. जो कोणी आश्रयार्थ येईल, हांक मारील त्याला मदत करी. शत्रूचा हलज आला तर प्रथम आपल्या तंबूवर तो यावा, असा तो आपला तंबू उभारी. वाटसरू आला तर तोहि प्रथम आश्रयार्थ आपल्या तंबूंत यावा, असेंहि त्याला वाटे. रात्रीच्या वेळीं आपल्या तंबूजवळ तो आगटया पेटवून ठेवीं. हेतु हा कीं वाळवंटांत भटकणा-यांस मार्गदर्शन व्हावें, त्यानें आपल्याकडे यावें. ''मी तुझ्या मानावर माझें संरक्षण सोपवीत आहे.'' असे जर आश्रयार्थ आलेला म्हणेल तर स्वतःच्या देहाचा मुडदा पडेपर्यंत त्याचा तो सांभाळ करील. अतिथीस आश्रय न देणे याहून दुसरें नीच कर्म नाही. अतिथीला क्वचितच कोण फसवी आणि असें जो कोणी करी त्याच्या कुळाला कायमची काळोखी लागे.
एक कवि म्हणतो - ''त्या तंबूंत आमचा मोठा पुढारी आहे. त्याचा शब्द रक्षणास पुरेसा आहे. थोर हृदयाचा तो आहे. रात्रीची वेळ असावी. वादळ असावें. कोणी तरी संकटांशी झगडत अशा वेळीं या तंबूजवळ येई. तो पुढारी आपला तंबू त्याच्या हवालीं करी. होय, खरोखरच तो पुढारी उदार व थोर असे. पाठलाग करणारा शत्रू आला तरी ज्याला संरक्षण दिलें त्याचें रत्तच् त्या पाठलाग करणा-या शत्रूस मिळत नसे.''
पुढील मुस्लीम सम्राटांच्या अवनत व अधःपतित काळांतहि हे गुण कधीं कधीं दिसत. एकदां एका सुभेदारानें कांहीं कैद्यांची कत्तलीसाठी रवानगी चालवली होती. एका कैद्याने पाणी मागितलें. सुभेदाराने देववलें. तो कैदी पाणी पिऊन सुभेदाराला म्हणाला, ''मी तुमचा अतिथी झालों. तुम्ही पाणी दिलें. अतिथीला का आतां मारणार?'' त्या सुभेदारानें त्याला मुक्त केले! अतिथ्यांत संरक्षणाची हमी गृहीतच असे. आणि वचनभ्रष्टता अरबास माहीत नव्हती. त्यानें या बसा म्हटलें कीं संरक्षण मिळालें! तो शब्द म्हणजे विश्वासाचा साहाय्याचा, संरक्षणाचा, अचल निष्ठेचा अमोल ठेवा असे.