अशा रीतीनें मदिनेंतून बहुतेक बंडखोर ज्यू गेले. परंतु थोडे ज्यू मागें राहिले होते. ते सूडाच्या इच्छेनें राहिले होते. आम्ही पूर्वीचा जुना करार पाळूं.' असें ते मुहंमदांस म्हणाले. म्हणून विषाचा पुन: पुन्हां कटु अनुभव आला तरीहि त्यांनीं त्यांना राहूं दिले. परंतु आपल्या वळणावर ते गेले. त्यांची कुरेशांजवळ कारस्थानें सुरु झालीं. मक्कावाले स्वस्थ नव्हतेच. सर्व अरबस्थानांतील मूर्तिपूजक जातिजमाती मुहंमदांविरुध्द उठविण्याची त्यांची खटपट चालली होती. कुरेशांचा व इतरांचा एक प्रबळ संघ स्थापला गेला. आणि दहा हजारांचें सैन्य मदिनेवर निघालें ! अबु सुफियानच सेनापति होता. मदिनेपासून थोडया अंतरावर हें प्रचंड सैन्य तळ देऊन तयारीनें राहिलें. मदिनेत तीन हजारांचेंच सैन्य उभें राहूं शकलें. शहरांतील असंतुष्ट मुनाफिकीनांच्या दगाबाजीची भीति होतीच. मदिनेभोंवतीं खंदक होता. तो आणखी खोल करण्यांत आला. ज्या बाजूस संरक्षण नव्हतें त्या बाजूचा खंदक अधिकच खोल खणला गेला. तटबंदीच्या ठिकाणीं बायकामुलें ठेवण्यांत आलीं. मदिनेंतील सैन्य बाहेर पडलें. शहराच्या बाहेर त्यांनीं छावणी दिली. समोर खंदक होता. ज्यूंची बनी कुरेझा ही एक जमात मदिनेच्या नैऋत्येस रहात असे. ते तटस्थ राहतील, असा भरंवसा होता ते करारानें मदत करण्यास बांधलेले होते. करार मोडा व मूर्तिपूजकांस मिळा, असा त्यांना कुरेशांचा निरोप आला. मुहंमदास ही दगलबाजी कळली. त्यांनी बनीनुझैरांकडे दोन जबाबदार लोकांबरोबर निरोप पाठविला कीं, 'तुम्ही कर्तव्यास जागा.' परंतु ज्यूंनी उर्मट उत्तर दिलें, 'हा मुहंमद कोण ? ज्याची आम्ही आज्ञा पाळावी असा हा कोण मुहंमद पैगंबर ? त्याचा व आमचा कोणताहि करार झालेला नाहीं.' ज्यूंना मदिना शहराची सारी बातमी होती. ते ती शत्रूला पुरवतील, अशी भीति वाटत होती. शहरांतील मुनाफिकीनहि गडबड करुं लागले. मुसलमानांत संताप, प्रक्षोभ व अशांति वाढत होतीं. परंतु मुहंमद त्यांना शांत ठेवीत होते. कुराणांतील तेहतीसाव्या सु-यांत या वेळच्या परिस्थितीचें फारच सुंदर वर्णन आहे. मुस्लीम सेना पुढें मैदानांत आली कीं, अचानक जाऊन मदिनेवर हल्ला करावा, असें बनी कुरेझा मनांत म्हणत होता. आंतहि असंतुष्ट लोक होतेच. परंतु मुहंमद खंदक ओलांडून पुढें जातना. मदिनेच्या भिंतीस पाठ लावून ते उभे होते. शेवटीं मूर्तिपूजकांचे ते दहा हजार सैन्य माशा मारुन कंटाळूं लागलें. अनेक जातिजमातींचें तें कडबोळें होतें. त्यांच्यांत भांडणेंहि सुरु झालीं. मुस्लिमांनी त्यांच्यात आणखी भेद पाडले. फाटाफुटी केल्या. ऐक्य नष्ट होऊं लागले. अन्नाचा तुटवडा पडूं लागला. घोडे मरुं लागले. शेवटीं या मैदानी सेनेनेंच खंदकांतून जाऊन चढाई करायची असें ठरविलें. हल्ले होऊं लागले. परंतु प्रत्येक हल्ला हाणून पाडण्यांत आला. हें प्रचंड सैन्य पांगूं लागलें, नष्ट होऊं लागलें. संमिश्र फौजा वा-यावर गेल्या. ईश्वराची मदत आली. प्रचंड वारे उठले. आणि मुसळधार पाऊस आला. तंबू उडून गेले. मैदानी सैन्याची फार दुर्दशा ! एक दिवा टिकेना. हिलाल राहीना. अबु सुफियान व त्याचें सैन्य पळालें. या लढायीला खंदकाची लढायी असें म्हणतात.

मुसलमान आनंदानें शहरांत आले. कांही शत्रूंकडील लोक ज्यू बनी कुरेझा यांच्या आश्रयाखालीं रहायला गेले. परंतु बनी कुरेझा मदिनेच्या जवळ असणें धोक्याचें होतें. केलेले करार मोडून ते देशद्रोही झाले होते. मदिनेवर अचानक हल्ला करुन सर्वांची कत्तल करण्याचें त्यांच्या मनांत होतें. परंतु खंदकाच्या लढायीचा निराळाच परिणाम झाला. बनी कुरेझांकडे मुहंमदांनीं पुन:पुन्हा जाब मागितला. पुन: पुन्हा त्यांनीं उर्मट उत्तर पाठविलें. शेवटीं त्यांच्या बस्तीस मुसलमानांनीं वेढा घातला. ते शरण आले.

"तुमचा काय निकाल द्यावा, कोणती शिक्षा ?' त्यांना विचारण्यांत आलें.

"आम्हांला काय शिक्षा द्यावयाची तें औसांच्या जमातीचा पुढारी साद यानें ठरवावें. तो योग्य न्याय देईल.' ते म्हणाले. हा साद मोठा शूर पुरुष होता. खंदकाच्या युध्दांत तो जखमी झालेला होता. ज्यूंच्या करारभंगानें तो संतापलेला होता. स्वत: मरणाच्या दारीं होता. त्यानें कोणता निकाल दिला ?
"लढूं शकणारे सारे ठार करावे. स्त्रिया व मुलें यांनां गुलाम करावें !' सादच्या निर्णयाप्रमाणें शिक्षा दिली गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel