आणि धर्माची स्थिति काय होती? भटक्या अरबांत एक प्रकारचा धर्म होता. खरोखरची आस्तिकता त्यांच्यांत होती कीं नाहीं तें सांगता येणार नाहीं. अस्पष्ट अशी कांही कल्पना त्यांना होती. परलोक आहे कीं नाहीं याविषयीं ते नक्की सांगू शकत नसत. काल्पनिक मननचिंतन करण्याची त्यांची वृत्ति नसे. तिकडे त्यांचा कल नसे. परलोकाच्या अमूर्त कल्पना, या गुंतागुंतीच्या अद्दष्य गोष्टी विचार करायला त्याला विश्रांती ! व वेळहि नव्हता. परमेश्वर एक आहे हें ज्ञान त्याला नव्हतें. तो अनेक देवतांना भजे. हे देव म्हणजे अर्धवट दैत्यच होते ! भुतेंप्रेतें, पिशाच्चे यांतून जरा उत्क्रान्त झालेले असे हे देव होते. मानवजातीचें कल्याण करणारे, कल्याणमय, कृपासिंधु देव अजून निर्मिले गेले नव्हते. ही भुतें-प्रेते, हे जिन, हे गि-हे अपाय करतील म्हणून अरब त्यांना भजे. भीतीमुळें देवपूजा होई. दुसरी एक पितृपूजा त्यांच्यात होती. कांहीं जुन्या जाति-जमातींतून कांहीं चिन्हें असत. ती चिन्हें वंशपरंपरा आलेलीं असत. या चिन्हांवरून कुळांना नावें पडत. एखादें झाड, एखादी टेकडीं, एखादा प्राणी, एखादा साप अशीं तीं चिन्हें असत! या चिन्हांविषयी अपार आदर व भीतिहि असे. या वस्तु पुढें प्रतीकें बनल्या. झाडें, खांब, निरनिराळया प्रकारचे दगड यांची, मृतात्म्यांचीं प्रतीकें समजून पूजा होऊ लागली. एकेश्वरी धर्म या बेदुइनांना माहीत नव्हता.
किना-यालगतच्या सुखी, समृध्द अरबांत कशा प्रकारचा धर्म होता? मक्का शहर केवळ व्यापारी केंन्द्र नसून धर्मकेन्द्रहि होतें. येथेंच ते जगत्प्रसिध्द पवित्रतम व प्राचीनतम काबा हे मंदिर होतें ! हें मंदिर अरब जमातीचा पूर्वज अब्राहम (इबराहीम) यानें प्रथम बांधले म्हणतात. कोणी म्हणतात, पहिला पूर्वज जो बाबा आदम त्यानें प्रथम बांधले म्हणतात. कोणी म्हणतात, पहिला पूर्वज जो बाबा आदम त्यानें स्वर्गातील नमुन्याप्रमाणें तें बांधलें ! पढें मग अब्राहम, इस्माइल यांनी तें पुनःपुन्हां बांधले. आदमच्या काळांत आकाशांतून पडलेला दगड तो याच मंदिरांत आहे आणि याच मंदिरांत 360 दिवसांच्या 360 देवता होत्या. एका दिवसाला एक देव ! या 360 मूर्त्यांच्यामध्यें मुख्य देव हुबल याची लाल पाषाणी मूर्ति होती. घगलस व गगेतलिस यांच्या सोन्याच्या व चांदीच्या मूर्ति होत्या. अब्राहामाची मूर्ति व त्याच्या मुलाची मूर्तीहि येथें होती. येथेंच जवळ ती झमझम विहीर होती. जिचा झरा वाळवंटांतून जोरानें बाहेर येत आहे. अरबांचे प्राण एकदां तहानेनें व्याकुळ झाले होते तेव्हां हा झरा प्रभुकृपेनें वाहूं लागला !
काबाच्या मंदिरामुळें मक्काच नव्हे तर तो सारा जिल्हाच पवित्र मानला जाई. त्या काळया पाषाणांचें चुंबन घेण्यासाठीं प्रतिवर्षी हजारों अरब येत. दिगंबर होऊन सात प्रदक्षिणा घालीत. दिगंबंर कां व्हायचें? जे कपडे अंगावर घालून पापें केलीं ते कपडे प्रदक्षिणेच्या वेळेस नकोत. हा दिगंबर जैन धर्माचा परिणाम असावा. जैन धर्म दक्षिणेस म्हैसूरच्या बाजूस अधिक होता. अरबांस तो माहीत असावा. मक्केस बुध्दच्याहि मूर्ति, पादुका होत्या असें म्हणतात. मक्केच्या पवित्र स्थानांत सर्व जातिजमातींच्या देवतांना स्थान असे. देव असत व देवताहि असत. देवदेवतांतहि एक प्रकारची लोकशाही जणुं होती ! प्राचीन अरबांच्या धर्मात सेमिटिक धर्माचें मिश्रण आहे. तसेंच खाल्डियन, फोनिशियन, कॅननाइट्स वगैरेंच्या धर्मांचेंहि मिश्रण आहे. हा एक प्रकारें अनेक भुताखेतांचा धर्म होता ! जातिजातींचे धर्म शेजारी शेजारीं येऊन काबाजवळ उभे राहिले. सूर्य, तारे, तीन स्थितिदर्शक तीन चंद्रदेवता होत्या. शुक्लचंद्र, कृष्णचंद्र, व शुक्लचंद्र-कृष्णचंद्र अशा तीन स्थितिदर्शक तीन चंद्रदेवता होत्या. अल-लात, मनात व अल-उझा हीं त्यांची नावें ! प्रथम अरब झाडें, दगड, पर्वत यांची पूजा करीत. पुढें मूर्ति करूं लागले. अब्राहामची मूर्ति म्हणजे एक दगडच होता. 'हा अब्राहाम' असें म्हणत. प्रत्यक्ष मूर्ति का रोमन, ख्रिश्चन धर्मामुळें आल्या? का बुध्द धर्माच्या संबंधामुळे आल्या? झाडें, पर्वत येथें प्रेतात्मे राहतात अशी कल्पना असे.