बेदुइनांचें मुक्तजीवन

किना-याजवळचे भाग सोडून अरबस्थानच्या अंतर्गत भागांत आपण जाऊ या. वरती अनंत निळें निळें आकाश व खालीं अनंत प्रशांत वाळवंट. अत्यंत स्वच्छ व ताजी हवा. सांगतात कीं या भागांत मनाची विशिष्ट स्थिती होते. एकदम भावना उचंबळतात. बुध्दीला, मनाला एकदम चालना मिळते. अनंत शांति. तेथें तुमच्याशिवाय कोण आहे? तुमच्या पावलांशिवाय कोणाचीं पावलें ऐकूं येणार? मधून एखादा गरुड दिसेल, एखादें पहाडी जनावर, शेळीमेंढी दिसेल. केवळ असीम शांति व स्तब्धता. जणुं अपार परमेश्वराच्या सन्निध आहोंत असें वाटतें. मुक्या अनंततेजवळ आहोंत असें वाटतें. एक प्रकारचा अनुनुभूत आनंद हृदयांत उसळतो असें म्हणतात. वृत्ति उत्तेजित एकदम मुत्तच् होतात. त्या उडया मारूं पाहतात. शरीरांत व मनोबुध्दीत एक प्रकारची विद्युत संचरते, बुध्दीस चालना, चोदना मिळते. अरबांच्या मनावर हे सारे परिणाम होत असतील. त्यांच्या प्रतिभाशाली व कल्पनामय मनांत किती भाव उसळत असतील! कसे थरारत असतील! या अप्रकट मुक्या भावना मुहंमदांच्या 'अलजहु अकबर' या धीरगंभीर वाणींतून प्रकट झाल्या व जगभर पुढें गेल्या.

या अंतर्गत भागांत राहणा-यांना बेदुइन (बद्दू) म्हणत. या बेदुइनांची निसर्गाशीं सतत लढाई. कढत वारे सुटत, प्रचंड वादळें होत, वाळूचे डोंगर आकाशांत उडत व खालीं कोठें पडत. अशा परिस्थितीमुळें विशिष्ट गुण बेदुइनांच्या अंगी आले. शेती करणारा एकाच ठिकाणीं राहतो. परंतु बेदुइनांना शेती कोठली? ते सदैव भटकत. या भटक्या बेदुइनांचेहि दोन प्रकार असतात. शेळयामेंढया वाढवणारे व उंट वाढवणारे. शेळयामेंढया चरणारे वाळवंटात खूप आंत जाऊं शकत नाहीत, ते कुरणाच्याजवळ, पाण्याच्या आसपासच रहात. परंतु उंटवाले वाळवंटांत आंत संचार करीत. अरबी बेदुइन हे विशेषतः उंट पाळणारे होते. उंटांना डोंगरांवरचा गवतपाला पुरा पडत नाहीं. वाळवंटांतील झाडेच त्यांचे खाद्य. तसेंच खारें मचुळ पाणी त्याला अधिक मानवतें. हिवाळयाच्या दिवसांत अंगांत ऊब रहावी म्हणूनहि उंटाला वाळवंटांत भटकावें लागतें. वितांना उंटिणीला वाळवंटांची जमीन हवी. उंटिणीला जशा प्रसववेदना होतात तशा क्वचितच कोणा प्राण्याला होत असतील! उंटिणीला प्रसूतिकाळीं उबेची फार जरूरी असते. म्हणून उंट वाढवणारे बेदुइन अंतर्गत भागांत राहतात. माणसांपासून दूर राहतात. तेहि कमी माणसाळलेले व स्वैर असे त्यामुळें होतात. किना-याजवळ किंवा सुपीक भागांत जे अरब रहात त्यांचे जीवन बेदुईन कमी मानी. वाळवंटांतील स्वच्छंदी स्वतंत्रेचें जीवन त्याला प्रिय वाटे. आजकालच्या जीवनांत किंती गडबड. सारी धांवपळ. ती धांवपळ ज्ञानार्थ असो वा धनार्थ असो. शांति तिळभर नाहीं. अखंड जोजार सुरू. सारा संसार जणुं छातीवर येऊन बसतो, मानगुटीस बसतो. अशा वेळेस आपण त्या बेदुइनांचें मुत्तच् जीवन जरा मनांत कल्पूं या. बेदुइनाचें जीवन म्हणजे एखाद्या अलज्ड मुलांसारखें जीवन. स्वच्छंद, हेतुहीन, समाधानी, आनंदी, संपूर्ण जीवन. स्वतःच्या साध्या जीवनांत त्याला अपार समाधान असे. तो सुखी असे, कारण तो यथार्थपणें जगत असे. त्याला अधिकाची इच्छा नसे. त्याला केवळ एकच भीति असे. ती म्हणजे मरणोत्तर जीवनाची! हा विचार आपल्या मनांतून तो पार दवडी. जगांत कोणाचीहि त्याला भीति वाटत नसे. ना मानवाची, ना संकटाची, उद्यांचा विचार तो करीत नसे. जी जी परिस्थिति येईल तिचा पुरेपुर उपभोग घ्यायला तो तयार असे. संकले आलें, सहन करी. सुख आलें भोगी. आज या क्षणीं जें सुख आहे ते भोगूं दे. जीवनाचा पेला त्यांतील थेंबन्थेंब पिऊं दे. त्या सुखाच्या क्षणीं दुसरे विचार मनांत आणून तें सुख तो मलिन करीत नसे. बेदुइन कीर्तीचा व विजयाचा भुकेला असे. परंतु ही महत्त्वाकांक्षा त्याला संचित करीत नसे. दुःखचिंतांचे ढग त्यामुळें मनांत नसत जमत. त्यांचें तें वाळवंटांतील जीवन, परंतु तें एक प्रकारें परिपूर्ण असे. उत्साही, संस्फूर्त व सामर्थ्यसंपन्न असें असे. त्यांचें तें जीवन वासनाविकारांचें असे. परंतु त्यांतहि एक प्रकारची आनंदी व समाधानी वृत्ति त्याची असे. जीवन हे जगण्यालायक आहे अशी त्याची निःसंदिग्ध खात्री असे.

अशा ह्या त्याच्या जीवनांतहि ध्येय असे. वाळवंटाचा तो अस्सल पुत्र. तो एखाद्या पुढें आलेल्या डोंगराच्या टोंकाखाली छायेंत पडून नसे रहात. तो शूर, साहसी, अतिथ्यशील असा असे. स्त्रियांच्या रक्षणार्थ सदैव सिध्द असे. आपल्या जातिजमातीसाठीं स्वतःचे द्यावयास तो तयार असे. निराश्रितांस आश्रय द्यावयास, गरजवंतास साहाय्य करावयास तयार असे. त्याची वाणी मोठी गोड, वक्तृत्वपूर्ण व अस्स्खलित अशी असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel