रक्ताचे पाट वाहिले !

वास्तविक मुहंमदांचा किती प्रेमळ स्वभाव ! अपरंपार करुणेचे ते सिंधु होते. कोठेंहि कोणी दु:खी दिसला तर ते द्रवत, त्यांचे डोळे भरुन येत. अरब लोक मर्द, परंतु मुहंमद तर स्त्रीप्रमाणें रडत ! एखादा अनुयायी मेला, मुलें मेलीं तर त्यांचे डोळे भरत. 'बायकी स्वभावाचा' असें त्यांचे शत्रु त्यांना म्हणत. अशा त्या कारुण्यमूर्तीला परिस्थितीमुळें हातीं शस्त्र धरावें लागलें ! स्वत:च्या लोकांच्या संरक्षणासाठीं, बाल्यावस्थेंतील नवराष्ट्राच्या रक्षणासाठी ते संघटित सेना उभारुं लागले. आपल्यावर एकदम हल्ला होऊं नये म्हणून पुढें जाऊन हल्ले करावे लागले. ते टेहळणी करणा-या तुकडया पुढें पाठवीत. कारण अरब रात्री किंवा अगदीं उजाडत अचानक हल्ले करतात.

मक्कावाले मदिनेच्या जवळ मुसलमानांचीं फळझाडें तोडीत, लुटालूट करीत आले. शेळयांमेंढयांचे कळप त्यांनीं लांबविले. अबुजहल एक हजार लोक घेऊन मदिनेवर चालून आला. त्यांचा एक तांडा युध्दाची सामुग्री घेऊन येत होता. त्याचें रक्षण करणें व मदिनेंतींल मुसलमानांचा नाश करणें, हें अबु जहलचें काम होतें. मदिनेवर अबु जहल येत आहे हे मुसलमानांस आधींच कळलें. म्हणून ते बाहेर बद्रची दरी होती तेथें जाऊन बसले. तीनशें तेरा निवडक लोक घेऊन मुहंमद तेथें तयार होते. अबु जहल येत होता. मुहंमदांनी आकाशाकडे हात केले व म्हटलें, 'प्रभो, तूं मदतीचे दिलेलें आश्वासन विसरुं नकोस. तूं नाभीवाणी दिली आहेस. माझी ही धर्मभीरुंची, शूरांची सेना नाश न पावो.'

कुरेशांचें सैन्य आलें. त्या सैन्यांतून तिघे पुढें आले व म्हणाले, 'तुमच्यांतून तीन निवडा. तिघांचा सामना होऊन लढायांचा उघड निकाल ठरवूं.' मुहंमदांकडील हमजा, अलि व ओबैदा यांनी हें द्वंद्वयुध्दाचें आव्हान स्वीकारलें. आणि ते तिघे विजयी झाले ! परंतु कुरेश वचन पाळणारे थोडेच होते ? त्यांनीं एकदम हल्ला चढवला. आणि खणाखणी सुरु झाली. हातघाईची लढाई. आपण हरणार असें मुहंमदांस वाटूं लागलें. शत्रूचें तिप्पट सैन्य होतें. आणि एकाएकीं वादळ उठलें. जणुं देवाची मदत आली. मुहंमदांनी स्फूर्तिप्रद संदेश दिला. 'हा पहा परमेश्वर आला. हे पहा वारे उठले.' आणि ते तीनशें जणुं तीन हजार झाले ! वाळूचे लोट उठले. जणुं देवदूत येऊन लढूं लागले. मक्कावाले हटले, माघार घेऊं लागले. त्यांचे पुष्कळ पुढारी मारले गेले. अबु जहल मारला गेला. पुष्कळ कैदी झाले. त्यांतील फक्त दोघांचा शिरच्छेद करण्यांत आला. अरबांच्या युध्दनीतीप्रमाणें ही शिक्षा झाली. इतर कैद्यांस माणुसकीनें वागविण्यांत आलें. मुहंमद आपल्या अनुयायांस म्हणाले, 'आपत्तींत अपमान करुं नका. सहानुभूतीनें दयेनें वागवा.' हे कैदी ज्या मुसलमानांच्या स्वाधीन होते त्यांनीं मुहंमदांची आज्ञा पाळली. जेवतांनाहि त्या कैद्यांना ते आपल्याबरोबर घेत, आपलें अन्न त्यांना देत. आपली भाकर त्यांना देऊन स्वत: नुसता खजूर खात. या कैद्यांपैकीं एक जण पुढें म्हणाला, 'धन्य या मदिनेवाल्या मुसलमानांची. ते पायीं चालले व त्यांनीं आम्हांस घोडयावर बसवलें. त्यांनीं आम्हांस गव्हाची रोटी दिली जरी त्यांना खजुरावर राहणें भाग पडे.' मदिनेत ज्यांच्याजवळ घरेंदारें होतीं अशांकडे हे कैदी वांटून दिले होते !

जी लूट मिळाली तिच्या विभागणीविषयी भांडणे सुरुं झाली ! मुहंमदांनीं स्वत: सर्वांना सारखी वांटून दिली. आणि पुढें अशीं भांडणें होऊं नयेत म्हणून कांहीं नियम घालून दिले. कुराणांत एक स्वतंत्र प्रकरणच आहे. अल-अनफाल म्हणजे लुटीविषयीं. 'जो शासनसत्तेचा प्रमुख असेल तो वाटणी करील. लुटींतील पाचवा हिस्सा सार्वजनिक तिजोरींत जमा होईल. त्यांतून गरीब व गरजू यांना मदत दिली जाईल.'

या बद्रच्या लढाईचा नैतिक परिणाम मोठा झाला. परमेश्वराचा आपणांस पाठिंबा आहे असें मुस्लिमांस वाटूं लागलें. त्यांना उत्साह मिळाला. स्फूर्ति संचरली. कुराणामध्यें परमेश्वराच्या युध्दांत देवदूत कसे भाग घेतात, याचीं उदात्त, भव्य, काव्यमय वर्णनें आहेत. येशु व इतर संत महात्मे मानतात त्याप्रमाणें मुहंमदहि परमेश्वर व मानवजात यांच्यामध्यें जा-ये करणारे देवदूत असतात असें मानीत असावेत. प्राचीनांचे जे देवदूत ते आजचे निसर्गनियम    झाले आहेत ! परंतु खरोखर देवदूत म्हणून कांही आहे का ! देवालाच माहीत. मुहंमद 'असत्' चें हि एक तत्व मानीत. असत्तत्त्वाचें अस्तित्व मानीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel