एकनाथ महाराजांची नेहमी गंगेवर म्हणजेच गोदावरी नदीवर जाऊन घाटावर स्नान करण्याची पद्धत होती .स्नान करून गडू गंगेच्या पाण्याने भरून घेऊन ते ओलेत्याने घरी येत असत व नंतर देवपूजा करीत. महाराज खूप शांत आहेत कधीही कोणावरही रागावत नाहीत असा त्यांचा लौकिक होता.हे गावातील एका टवाळाला कोणीतरी सांगितले त्याने आपल्या मित्रांबरोबर पैज लावली की मी महाराजांना रागावून दाखवीन. दुसऱ्या दिवशी पानाचे साहित्य घेऊन घाटावर महाराज जिथून येत जात असत त्या ठिकाणी तो जाऊन बसला. महाराज येताच त्याने त्यांच्या अंगावर एक पिंक टाकली .महाराज काहीही न बोलता पुन्हा गंगेवर गेले व स्नान करून पुन्हा त्याच वाटेने आले.त्यांने पुन्हा पिंक टाकली.महाराज पुन्हा अंघोळीसाठी घाटावर गेले.अशा प्रकारे अठरा वीस वेळा पुन्हा पुन्हा तो पिंक टाकत होता तरीही महाराज रागावले नाहीत हे पाहून शेवटी त्याला स्वतःचीच लज्जा वाटून त्याने महाराजांचे पाय धरले .महाराजांना याबद्दल विचारता ते म्हणाले की . मला त्याचा राग येत नाही त्याला मी काय करणार ? महाराजांनी त्याला क्षमा करून आपला शिष्य म्हणून स्वीकार केला.ही घटना सांगताना घाटावरील लोक ,परगावातून स्नानासाठी आलेले लोक ,त्यांचे शिष्य, असल्यास शत्रू, गावातील स्नेही ,त्यांच्या घरची मंडळी ,इत्यादी अनेक जण या घटनेचे वेगवेगळे वर्णन करतील उदाहरणार्थ
१---बाबा गुंडाला घाबरला व तो त्यामुळे पुन्हा पुन्हा अंघोळ करीत राहिला .
२----केवढा महात्मा शांतीचा पुतळा जणू केवढा थोर
३---.कोण हा बाबा केवढे बावळट ध्यान
४---- उगीच त्याची मिजास चालू दिली .त्याला धरून कानाखाली एक आवाज काढायला पाहिजे होता.
५--केवढा हा उद्धटपणा आम्हाला नुसती हाक मारली असती तरी त्याला बदडून काढला असता .-वगेरे वगेरे ज्याच्या त्याच्या धारणेप्रमाणे जो तो त्या घटनेचे वर्णन करील .
क्रिया एकच असली तरी ज्याच्या त्याच्या धारणे प्रमाणे संस्काराप्रमाणे विचाराप्रमाणे प्रतिक्रिया निरनिराळय़ा असतात. या सर्वाची जाण आली म्हणजे अापण घाईघाईने निष्कर्ष काढण्याचे सोडून देतो .कोणत्याही घटनेवरील आपली प्रतिक्रिया आपल्या संस्काराप्रमाणे म्हणजेच धारणे प्रमाणे आहे हे लक्षात येऊ लागते .त्यातून आपोआपच अंतर्मुखता येते. आपण कसे आहोत हे लक्षात येऊ लागते .आपोआपच निवड रहित जागृतता अस्तित्वात येते. त्यालाच साक्षीत्व असेही काही जण म्हणतात . घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो . घटने बरोबर आपण वहावत जात नाही .त्याच्या निरनिराळ्या लोकांच्या वर्णनाबरोबर वाहावत जात नाही.
२१/४/२०१८© प्रभाकर पटवर्धन