पुनर्जन्म आहे की नाही हा वादाचा विषय आहे.
कांहीजण पुनर्जन्म आहे असे ठामपणे सांगतात.मृत्यूनंतर सर्व कांही संपत नाही. जीवात्मा त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या लोकांत(देव,यक्ष,गंधर्व,पिशाच्च,
इत्यादी)जातो.त्याच्या कर्मानुसार तेथील वास्तव्याचा काळ संपल्यानंतर तो पुन्हा भूतलावर जन्माला येतो किंवा आणखी कोणत्या लोकांत जातो,असे काहीजणांचे सांगणे आहे.
कांहीजण मृत्यूनंतर जीवात्मा अदृश्य सुप्त स्वरुपात आकाशात विहरत असतो.त्याच्या कर्मानुसार जिथे योग्य परिस्थिती असेल तिथे तो पुन्हा जन्म घेतो. तो लगेच जन्माला येईल किंवा शेकडो वर्षांनीही येईल.तोपर्यंत तो सुप्तावस्थेत असेल.
जीवात्मा निरनिराळ्या योनीमध्ये फिरत केव्हांतरी मनुष्ययोनीत जन्माला येतो.मनुष्यजन्म एकदाच मिळतो असे कांही जण म्हणतात. मनुष्यजन्म भाग्याचा आहे असे कांही जणांचे मत आहे. हे म्हणजे स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे.
स्वर्ग, नरक, पाताळ, सर्व कांही येथेच आहे.कांही पैशाने श्रीमंत असतात.कांही विचारानी श्रीमंत असतात.कांही शरीराने निरोगी असतात.कांही मनाने निरोगी असतात.कांही सर्व दृष्टींनीगरीब असतात.कांही रोगीष्ट असतात.कांहीजण शारीरिक दु:ख भोगतात तर कांहीजण अतीव मानसिक दु:ख भोगतात. आपआपल्या कर्मानुसार सुखदुःख येथेच भोगले जाते.स्वर्ग नरक सर्व लोक येथेच आहेत.मतामतांतरांचा नुसता गलबला आहे.
वर्तमानात पुण्य संपादन केले नाही योग्य वर्तन असले नाही तर भविष्यकाळात दु:ख भोगावे लागेल.म्हणून आता योग्य कर्म करा अशी धमकी कांही जण देतात.
ही जर तरची भाषा योग्य नाही.योग्य कर्म ते योग्य आहे म्हणून करावे.भविष्याच्या लोभाने नव्हे किंवा धाकाने नव्हे असेही एक मत आहे.
योग्य कर्म म्हणजे काय याबद्दलही वादंग आहे.प्रत्येकाच्या पार्श्र्वभूमीनुसार योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्या बदलत असतात.
एका कालखंडात ज्याप्रमाणे योग्य अयोग्य याबद्दल मतमतांतरे असतात त्याप्रमाणेच निरनिराळ्या कालखंडात योग्य अयोग्य याच्या व्याख्या बदलत असतात.
कांही पिढ्यापूर्वीचे योग्य ते आता अयोग्य समजले जाते.योग्य अयोग्य याच्या व्याख्या, निरनिराळ्या जातीत, निरनिराळ्या समाजात निरनिराळ्या प्रदेशात, भिन्न असतात.
अंतिम सत्य म्हणून एखादा जरी हेच योग्य आणि हे अयोग्य असे सांगत असला तरी अंतिम सत्य,निरनिराळ्या धर्मात,जातीत, प्रदेशात, समाजात, देशात,कालात, भिन्न असतात असे निरीक्षणांती आढळून येईल.
भूताच्या आधारावर भविष्याचे इमले रचू नका वर्तमानात राहा.असे आवर्जून कांही जण सांगतात.
आला म्हणजे आला आणि गेला म्हणजे गेला असेही एक मत आहे.निरनिराळ्या धर्मात निरनिराळी मते दिसून येतील.एकंदरीत मतामतांचा सावळागोंधळ असलेला दिसून येतो.
कांही धर्म पुनर्जन्म नाही असे ठामपणे सांगतात.तर कांही आहे हेही तेवढ्याच ठामपणे सांगतात.
परमात्मा आणि जीवात्मा म्हणजे काय हे स्पष्ट करताना पुढील उपमा दिली जाते. सूर्य तळपत असतो.निरनिराळ्या डबक्यात पाणी साठलेले असते.पाण्याच्या शुद्धतेनुसार, स्वच्छतेनुसार, त्यातील प्रतिबिंब निरनिराळे भासते.कमी जास्त वारा असेल तर पाण्यावर तरंगही कमी जास्त प्रमाणात उठत असतात.परिणामी प्रत्येक प्रतिबिंब भिन्न प्रतीत होते.पाणी जेवढे जास्त शुध्द, पाणी जेवढे जास्त स्थिरं, तेवढे प्रतिबिंब जास्त यथातथ्य दिसेल. पाणी पूर्ण शुद्ध झाले,तरंग अजिबात नसतील,तर सूर्यबिंब जास्त यथातथ्य दिसेल.(अशा तर्हेच्या उपमा विषय समजून सांगण्यासाठी दिल्या जातात.विषय समजल्यासारखा वाटतो परंतु प्रत्यक्षात किती समजतो ते ज्याचे त्याला माहीत!आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.उपमा पूर्णोपमा कधीही नसते.त्यातील तत्त्व स्पष्ट करण्यासाठी असते.
तरीही शेवटी प्रतिबिंब ते प्रतिबिंब.मूळ सूर्य नव्हे.पाणी आटले की प्रतिबिंब नाहीसे होईल."मी" नाहीसा झाला की सर्वकांही संपेल जीवात्मा मुक्त होईल.विश्व भासात्मक आहे.
भक्तीमार्गातील लोकांना अशा प्रकारची मुक्ती नको असे ते म्हणतात.देवा तुझे नाव आवडीने घेत राहण्यात जो आनंद आहे त्यातच मी जन्मोजन्मी असावा अशी त्यांची इच्छा असते.*गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ *
+++
तात्त्विक चर्चा म्हणून हे सर्व ठीक आहे.परंतु ही उठाठेव आपण कशासाठी करतो इकडे कुणी लक्ष दिले आहे काय?ही चर्चा आपण कां करतो त्याचे कारण कुणी शोधले आहे काय?अशाप्रकारे वादविवाद करीत राहणे हे तुषकंडन करण्यासारखे नाही काय?तुषकंडन करून धान्य मिळेल काय?
मृत्यू अटळ आहे हे ढळढळीत सत्य आहे.मृत्यूबरोबरच आपण संपतो ही कल्पना आपल्याला सहन होत नाही.आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहावे असे "मी" ला वाटत असते.
*ही टिकून राहण्याची इच्छाच या सर्व चर्चेला सुरुवात करते असे मला वाटते.*
ही अशी चर्चा करण्यापेक्षा ही चर्चा आपण कां करतो याचा शोध घेणे मला जास्त आवडेल.
हा शोध ज्याचा त्याने घ्यायचा आहे.
शोध करता करता गाभ्यापर्यंत गेल्यास, मुळापर्यंत पोहोचल्यास, "मी"ला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहण्याची प्रबळ इच्छा असते.
या इच्छेचे बाह्य रूप म्हणजे पुनर्जन्माबद्दलची चर्चा होय.
"मी" नष्ट केला पाहिजे असे सर्व तत्त्ववेत्ते म्हणतात."मी" नष्ट झाला म्हणजे "तो"(परमेश्वर,अनादि अनंत आपण जे कांही म्हणाल ते)उगवेल असे कांही जण सांगतात.
"मी" मजबूत होण्यासाठी नाना युक्त्या शोधीत असतो. पुनर्जन्म कल्पना आणि चर्चा हा त्यातीलच एक भाग आहे असे मला वाटते.
"मी" नष्ट करण्यासाठी केले जाणारे सर्व प्रयत्न हे "मी"चे दृढीकरण करीत नाहीत काय?
*या सर्व समजातून,या "मी"च्या स्वतःच्या दृढीकरणाच्या प्रयत्नाचे साक्षित्व करून,ही सर्व परमेश्वरी लीला पाहता पाहता, हा "मी" केव्हातरी विरघळेल आणि ते अनादि प्रगट होईल.यामध्ये आपण जाणीवपूर्वक कांही करायचे असेही नाही आणि काही करायचे नाही असेही नाही.जे कांही होत असेल ते "निवडरहित अलिप्ततेतून" ~निवडरहित जागृततेतून~पाहायचे*
१९/१/२०२२©प्रभाकर पटवर्धन