परमेश्वरा कसा आहे याबद्दल विचार न करता अापण परमेश्वरा विषयी विचार का व कसा करतो त्याबद्दल विचार करण्याचे मनात आहे .कार्लाईल नावाच्या एका प्रसिद्ध तत्ववेत्त्याचे एक अवतरण आहे ते पुढील प्रमाणे ."कोणत्याही समाजाचे देव कसे आहेत ते मला सांगा त्यावरून मला त्यांची म्हणजे समाजाची संस्कृती  ओळखता येईल "याचा अर्थ असा की समाज जसा प्रगत होत जातो उन्नत होत जातो तसे त्यांचे देवही जास्त प्रगत व सुसंस्कृत होत जातात. व्यक्ती व समाज काही कारणाने देवाची प्रतिमा निर्माण करतात म्हणजेच तो आहे व कसा आहे त्याबद्दल विवेचन करतात .
मुळात देव कल्पना निर्माण का होते व्यक्ती सुखी असेल तर हे सुख असेच राहावे असे त्याला वाटते व दुःखी असेल तर आपले दुःख लवकर दूर व्हावे असे त्याला वाटते .हे सुख टिकून राहावे व  दुःख दूर व्हावे यासाठी कुणीतरी आपल्याला मदत करावी असे त्याला वाटते .म्हणजेच अापण कुठेतरी असमाधानी असतो व असमाधान दूर करण्याचा मार्ग शोधत असतो .एखादी वरिष्ठ शक्ती आपल्याला हवे ते देइल असे आपल्याला वाटते .या वरिष्ठ शक्तीला अापण देव असे नाव देतो .सरकारमधे जशी एक सत्तेची उतरंड असते त्याप्रमाणे देवा मध्येही अापण एक उतरंड निर्माण करतो व ते आपली दुःखे दूर करतील अशी आशा करतो .त्यासाठी पूजा अर्चा भजन पूजन दान दक्षिणा वगैरे मार्ग अवलंबतो . दुःख निवारणासाठी सुख सातत्यासाठी वरिष्ठ शक्तीला आपण वश करून घेण्याचा प्रयत्न करतो .
दुसरा एक वर्ग असतो तो म्हणतो आम्हाला देवापासून काहीही नको त्यांच्या नाम संकीर्तनात भजन पूजनात कीर्तनात अाम्हाला समाधान व आनंद आहे .म्हणजेच आहे त्या परिस्थितीत ते समाधानी नसतात व नाम संकीर्तनातून त्यांना त्यांचे समाधान  मिळवावयाचे असते.थोडक्यात असमाधान दूर करण्यासाठी देवाची गरज भासते.


यावर एखादा म्हणेल की जर त्यामुळे लोकांना समाधान मिळते तर त्यात चूक काय आहे .चित्रपट नाटक संगीत बैठे खेळ मैदानी खेळ वाचन निरनिराळ्या प्रकारची करमणूक यामुळे जसे समाधान मिळते तसेच समाधान यामुळेही मिळते. प्रत्येकाची समाधान मिळवण्याची रीत वेगवेगळी असू शकते .जोपर्यंत समाजाला त्रास होत नाही तसेच कुटुंबालाही त्रास होत नाही तोपर्यंत कोणी कशाप्रकारे समाधान मिळवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .देव हा व्यक्तीपुरता मर्यादित आहे तोपर्यंत काहीच प्रश्न नाही .परंतु जेव्हा तो समाजाचा होतो तेव्हा झगडा व वाद निर्माण होतो. त्यावेळी मनुष्य ,मनुष्य न राहता पशू होतो.दोन जातींमध्ये दोन धर्मांमध्ये दोन प्रदेशांमध्ये दोन देशांमध्ये माझा देव मोठा की तुझा देव मोठा असा वाद निर्माण होतो. माझी संस्कृती मोठी की तुझी संस्कृती मोठी असा प्रश्न निर्माण होतो .त्यावेळी मनुष्य माणूस न राहता पशू होतो .धर्मावरून आत्तापर्यंत एवढा रक्तपात झालेला आहे एवढे अत्याचार इतिहासात झालेले आहेत की नको तो धर्म असे वाटू लागते .एवढा रक्तपात दोन महायुद्धांमध्येही झाला नाही .
जोपर्यंत आपल्या विचारांच्या कक्षेतून आपण देव कल्पनेकडे पाहात आहोत तोपर्यंत आपल्या कल्पनेतील देवापेक्षा अन्य काही दिसणे समजणे शक्य नाही.
 भजनपूजन नामसंकीर्तन यातून समाधान मिळवण्यात काहीच गैर नाही. परंतु यापुढे जाऊन जेव्हा आपण इतरांपेक्षा काही वेगळे आहोत उच्च आहोत असा भाव निर्माण होतो तेव्हा अहंकाराची वाढ होते .
परमेश्वराने आपल्याला निर्माण केले की नाही ते मला माहीत नाही परंतु आपण मात्र परमेश्वराला निश्चित निर्माण केले आहे .अन्य समाधान मिळविण्याच्या मार्गाप्रमाणेच भजनपूजन इत्यादी मार्गाकडे पहावे एवढेच माझे मानणे आहे .

साधू संत महंत पोथ्या पुराणे प्रेषित यांनी जे सांगितले ते खोटे आहे काय? असे  काही जणांचे म्हणणे असते.त्यांनी जे सांगितले ते आपल्याला बरोबर समजले का? असा माझा प्रश्न आहे .एखादी घटना शब्दरूप करताना भावना शब्दांमध्ये पुरेपूर उतरतील असे नाही तर एखादा अनुभव शब्दांमध्ये मांडणे अशक्य असेल .तरीही शब्दांशिवाय दुसरे काही साधन नसल्यामुळे तो शब्दांमध्ये मांडताना व त्या शब्दांचे पुन्हा समजण्यामध्ये रूपांतर करताना ते यथातथ्य होईलच असे नाही.

थोडक्यात प्रेषिताच्या किंवा पोथ्या पुराणे लिहिणाऱ्याच्या मनात असलेल्या भावना आपल्यापर्यंत पोचतातच असे नाही.एकच शब्द परंतु तो निरनिराळ्या व्यक्तींच्या मनात निरनिराळ्या छटा असलेले  किंवा संपूर्ण निरनिराळे भाव निर्माण करील .एकच नाव विष्णू शंकर विठ्ठल  राम येशू अल्ला,बुद्ध किंवा आणखी काही  निरनिराळ्या लोकांच्या मनात निरनिराळ्या प्रतिमा निर्माण करील . निरनिराळे भाव निर्माण करील 

एखाद्याला मी हिंदू धर्माबद्दलच बोलत आहे असे वाटेल परंतु तसे नाही .प्रत्येक धर्मामध्ये तट पंथ मी मी तू तू असे आहे .प्रेषिताचा ,धर्म प्रमुखांचा शब्द अखेरचा मानला जातो. तो केवळ व्यक्तीपुरता न राहता तो समाजाने मान्य केला पाहिजे.सर्व समाजानी मान्य केला पाहिजे असा आग्रह असतो मग त्यासाठी तलवार हाती घ्यावी लागली तरी हरकत नाही 
तात्पर्य आपण आपल्या धारणेनुसार देवाला निर्माण करीत असतो.देवाला समजत असतो .ही संपूर्ण प्रक्रिया जेव्हा आपल्या लक्षात येईल समजेल व  उमजेल तेव्हां धर्मासंबंधी हट्ट आग्रह आपोआपच कमी होतील ,नाहीसे होतील. मन शांत होईल.क्षणभर स्थिरही होईल.म्हणजेच मन नसेल त्यावेळी काय होईल हे  कल्पनेने सांगता येणार नाही  .शब्दात मांडता येणार नाही .

१६/५/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel