टीकेमुळे आपली दुसऱ्या बद्दलची समज जास्त वाढते का?चांगली टीका व वाईट टीका, रचनात्मक टीका व विनाशात्मक टीका ,असे दोन प्रकार पाडता येतील का ?मुळात कुणीही टीका का करतो ?टीका जास्त सुसंवाद निर्माण करू शकेल का ?
ज्यावेळी आपल्याला एखाद्या माणसाचा विचार पटत नाही त्यावेळी आपण टीका करण्याला उद्युक्त होतो .म्हणजेच स्वतःची मनोरचना व दुसऱ्याची मनोरचना भिन्न असते .म्हणजेच भिन्न धारणेमुळे टीका केली जाते .यामध्ये आपली धारणा बरोबर व दुसऱ्याची चूक असा भाव असतो .हे कितपत बरोबर आहे ?दुसऱ्याचे विचार ऐकताना आपल्या धारणेनुसार जो आतून प्रतिध्वनी येतो तोच आपण ऐकत असतो .दुसऱ्याचे विचार खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत . आपण दुसर्याचे ऐकत नाही तर स्वतःच स्वतःचे ऐकत असतो .धारणा हा पडदा समजला तर त्यावर दुसऱ्याच आलेले विचार आपटतात त्यातून ध्वनी येतो व तोच आपण ऐकत असतो या पडद्याशिवाय जर दुसऱ्याचे विचार आपल्यापर्यंत पोचतील तरच ते खरे एेकणे होईल .
एखाद्याला समजून घ्यावयाचे असेल तर अापण आपली धारणा बाजूला ठेवून म्हणजेच मोकळ्या मनाने ऐकले पाहिजे.स्वतःची परिस्थिती नुसार बनलेली मनोरचना म्हणजेच हा पडदा त्याला मी धारणा असे नाव दिले आहे .
जर आपल्याला आपल्या मुलाला समजून घ्यावयाचे असेल तर टीका करून दोष देऊन त्याला आपल्या मर्जीप्रमाणे आकार देण्याचा प्रयत्न करून त्याला समजता येणार नाही तर अापण त्याला नुसते पाहिले पाहिजे जर हृदयात प्रेम असेल तरच हे सर्व सहज शक्य होईल .
टीका विरोध निर्माण करते व जेवढा विरोध होईल तेवढी समज अशक्य होत जाईल. ऐकण्याची कला आहे जर आपण आपली धारणा बाजूला ठेवून ऐकले तर दुसऱ्याचे मनोगत आपल्याला सहज कळू शकेल.धारणा बाजूला ठेवून म्हणजे अापण काहीतरी कृती करावयाची आहे असा ग्रह निर्माण होतो.तसे नाही आपण सर्व प्रक्रियेचे केवळ साक्षित्व करावयाचे आहे यासाठी मन स्तब्ध पाहिजे म्हणजे उघड्या खिडकीतून ज्याप्रमाणे सूर्यकिरण सहज आत येतात त्याप्रमाणे दुसर्यांचे विचार सहज आपल्या मनात प्रवेश करतील व आपल्याला त्यांचे मनोगत कळु शकेल .टीकेतून समज अशक्य दिसते .रचनात्मक टीका व विनाशात्मक टीका -
रचनात्मक टीकेचा उद्देश दुसऱ्यांच्या धारणेमध्ये आपल्या धारणेप्रमाणे बदल घडवणे हा असतो .तर विनाशात्मक टीकेमध्ये दुसऱ्याला उद्ध्वस्त करणे हा हेतू असतो .दोन्ही टीकेमध्ये जरी प्रतीचा फरक असला तरी मूलत: त्यात फरक नाही . दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती यामध्ये कुठेच नाही .
ज्या वेळी मन स्तब्ध असेल, अलिप्त असेल ,निवड रहित जागृत असेल म्हणजेच आपल्या मनो रचनेप्रमाणे चांंगले व वाईट अशी निवड न करता केवळ पाहात असेल त्याच वेळी खऱ्या अर्थाने समज प्राप्त होईल नुसते ऐकणे त्यावेळीच शक्य होईल .म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या टीकेमुळे खरी समज प्राप्त होणे शक्य नाही .