शिक्षण म्हणजे शाळेत व शाळे बाहेर आपण जे अनुभव व माहिती संकलित करतो व त्याचाआपल्या मनामध्ये क्रमशः संग्रह करतो त्याला शिक्षण असे मानता येईल .ही माहिती सर्वसाधारण स्वरूपाची असते किंवा एखाद्या विशिष्ट विषयासंबंधी असते.या माहितीचा व कौशल्याचा वापर करून अापण निरनिराळी कामे करू शकतो. केवळ माहितीचा संग्रह म्हणजे शिक्षण असे म्हणता येणार नाही . वर्गातील किंवा वर्गाबाहेरील शिक्षणाचा अापण आपल्या जीवनात वापर कसा करतो त्यावर ते शिक्षण योग्य आहे की नाही हे ठरू शकेल .हल्लीचे दिवस विशेषी करणाचे आहेत .ज्या क्षेत्रात आपण विशेषीकरण प्राप्त करून घेतले त्या क्षेत्रापुरताच जर आपण वापर करू तर शिक्षणाचा अत्यंत मर्यादित हेतू साध्य झाला असे म्हणता येईल .जर शिक्षणामुळे बुद्धीला लवचिकता व धार निर्माण झाली म्हणजेच जीवनात  कोणतीही समस्या आल्यास ती यशस्वीपणे सोडवण्याचे सामर्थ्य निर्माण होईल तर शिक्षणाचा थोडा अधिक हेतू साध्य झाला असे म्हणता येईल .शिक्षणाचा हेतू समस्येचे आकलन व ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याजवळील माहितीचा योग्य प्रकारे वापर हा आहे .
   

एखादी व्यक्ती ज्ञान संपन्न आहे म्हणजे त्या व्यक्तीजवळ माहितीचा खूप संग्रह आहे असे होत नाही .त्या माहितीचा कुठेही जीवनात कसा वापर करून घ्यावा याचे कौशल्य त्यांच्या जवळ आहे असा होतो .बुद्धीला धार व लवचिकता प्राप्त होणे हे शिक्षणाचे खरे साध्य म्हणता येईल  .


   ज्ञानसंपन्नता हा शब्द ज्या प्रमाणे व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात वापरला जातो त्याचप्रमाणे पारमार्थिक क्षेत्रातही वापरला जातो .परमेश्वर, सत्य ,ते अनंत, अनाम,अनादि ज्याला समजले आहे जो त्यांच्या सन्निध आहे तो ज्ञान संपन्न असेही  म्हटले जाते .विविध धर्मातील प्रमुख धार्मिक ग्रंथ ज्याला मुखोद्गत आहेत त्याला ज्ञानसंपन्न म्हणता येईल का ?यातील विषय व आशय याचे व्यवस्थित विश्लेषण, निरूपण व समालोचन,जो करू शकतो त्याला ज्ञानसंपन्न म्हणता येईल का? ,त्या परमोच्च शक्तीबद्दलचे व्यवस्थित निरुपण व व्याख्यान  म्हणजे ज्ञान संपन्नता नव्हे.  मराठीचा कोणताही प्राध्यापक कोणताही प्रसिद्ध कीर्तनकार या अर्थाने  ज्ञान संपन्न झाला असता .!!ज्ञान म्हणजे त्या परमोच्च शक्तीचा अनुभव होय. कोणताही अनुभव खऱ्याअर्थाने शब्दात मांडता येत नाही .शब्दांची कितीही आतषबाजी केली तरी त्यामुळे अनुभव येऊ शकत नाही .जे शब्दातीत आहे ते शब्दांमध्ये कसे मांडता येईल ?शब्दांत मांडणारा कितीही कुशल असला तरी तो प्रयत्न तोकडाच पडणार .समजणारा कितीही कुशल असला तरीही त्याचा प्रयत्न तोकडाच पडणार .शिक्षण व ज्ञान हे शब्द नेहमी ज्या अर्थाने वापरले जातात त्या अर्थाने ते ज्ञानसंपन्नतेच्या मार्गात सत्यशोधनाच्या मार्गात  अडथळा ठरण्याचा संभव आहे . सर्व संत सत्य शब्दातीत आहे असे म्हणतात तर ते सत्य शब्दांची कितीही कसरत करून कसे साध्य करून घेता येईल .शब्दांनी आपण जो आराखडा उभा करू किंवा  जो आराखडा ऐकणारा समजेल ते स्वाभाविकपणे सत्य नसेल .अशा परिस्थितीत शब्दांचे इमले  उभे करून ते सत्य सांगण्याचा प्रयत्न सफल होणे शक्य नाही .कदाचित  जो आराखडा आपण उभा करू तो मिळेलही पण ते सत्य नसेल.मन स्तब्ध  झाल्याशिवाय पूर्णपणे रिकामे झाल्याशिवाय  शांत झाल्या शिवाय त्यात सत्य प्रगट होणे शक्य नाही .अशा परिस्थितीत शिक्षण व ज्ञान हे सत्य प्रकट होण्याच्या मार्गात अडथळा ठरण्याचा संभव आहे असे काही जणांना वाटते .सत्य काय आहे हे शेवटी ज्याचे त्यालाच शोधून काढावयाचे आहे त्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत होणार नाही .
२४/६/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel