लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा  काजु च्या बरणीत हात घालुन त्याने मूठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, *बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड*, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल..  त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला.. 
ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. *किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी* पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..
तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाही च आहे.. *आपण धरुन ठेवलंय सगळ*ं ... हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की अरे, फक्त सोडायचा अवकाश.... 
 *आहे तो सगळा आनंदच आनंद..!* 
शुक नलिका न्याय  -                .भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये नेहमी ही गोष्ट सांगितली जाते .पारधी पोपट पकडण्याच्या वेळी  किंवा इतर पक्षी पकडण्याच्या वेळी जंगलात एक दोरी बांधतात व त्यात कमी व्यासाच्या फुंकण्या (नलिका )अडकवतात  .पोपट फुंकणीवर बसतॊ.  बसल्याबरोबर त्याच्या वजनाने फुंकणी गर्रदिशी फिरते .  पोपट वर पाय खाली डोके अश्या अवस्थेत लटकू लागतो .पोपटाने एवढेच करावयाचे असते .  पायाची पकड ढिली करावयाची व पंख फडफ़डावयाचे.पोपटाला वाटते की जर आपण पायाची पकड ढिली केली तर आपण  खाली पडू त्यामुळे तो पकड घट्ट करून लटकत रहातो.पारधी येतो आणि त्या पोपटांना पकडून आपल्या पिंजर्‍यात टाकतो .याप्रमाणेच माणूस संसारातील असंख्य गोष्टींना म्हणजेच  धारणेला घट्ट पकडून ठेवतो.मुक्त होण्याऐवजी जास्त जास्त संसारांत गुंतत जातो .जे कृष्णमूर्ती नावाचे एक तत्त्वज्ञ गेल्या शतकात होऊन गेले.त्यांचे म्हणणे असे होते की आपण जर आपल्या लहानपणापासूनच्या संस्कारातून निर्माण झालेली धारणा (त्याला त्यांनी conditioning शब्द वापरला आहे )लक्षात घेतली .आपली सर्व हालचाल त्यामुळे कशी नियंत्रित होते .आपले सर्व निर्णय कसे धारणा बद्ध आहेत हे लक्षात आले. जीवनाची अपरिहार्यता लक्षात आली  तर आपोआपच निवडशून्य जागृतता निर्माण होईल .(धारणा म्हणजे व्यक्तीने लहानपणापासून स्मृतीरूपाने निरनिराळ्या  ठिकाणाहून गोळा केलेले ठसे  ज्यामध्ये तो पोपटाप्रमाणे अडकलेला असतो )अापण संसारात कमल पत्राप्रमाणे असू .एकच तत्त्वज्ञान निरनिराळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे सांगताना आढळतात .पोपटपंची करणे कोणालाही शक्य आहे परंतु ते तत्त्वज्ञान अंगात मुरणे कठीण आहे .ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुणीतरी (बहुधा  ज्ञानेश्वर )असे म्हटले आहे की एक तरी ओवी अनुभवावी त्याची आठवण होते.
२९/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel