मला एकदा एकाने विचारले की तुमच्या आयुष्यातील तीन आनंददायक घटना सांगा.मी पुढील प्रमाणे उत्तर दिले
१ ज्यावेळी मी माझी शेवटची परीक्षा दिली
मी त्याला थोडे विनोदाने पण खरे उत्तर दिले कारण त्यानंतर परीक्षेचा अभ्यास रात्र रात्र जागरण टेन्शन हे सर्व आता निकालात निघाले होते त्यामुळे मोकळे मोकळे वाटत होते
२ ज्यावेळी मी नोकरीचा शेवटचा दिवस संपून मुक्त होऊन घरी आलो कारण आता रोजची धावपळ घडय़ाळ्याकडे बघून धावपळ कामाचे टेन्शन साहेबांची मर्जी राखणे त्यांचे कटू बोल एेकणे वगैरे सर्व संपले होते
३ माझा जेव्हा शेवटचा दात डॉक्टरने काढला कारण आता दातदुखी रात्र रात्र कळा सहन करणे डॉक्टरच्या appointments इंजेक्शने, दात काढल्यानंतर पुढची सर्व प्रक्रिया त्यातून निर्माण होणारा त्रास हे सर्व आता संपले होते त्यामुळे मी आता आनंदी होतो
ही सर्व विधाने जरी विनोदी ढंगाने असली तरी त्यातून माझा दृष्टिकोन स्पष्ट होतो मी त्यातून निर्माण होणारे दुःख पाहत होतो परंतु प्रत्येक स्टेजमध्ये सुखही निश्चितपणे होते उदाहरणार्थ कॉलेजमधील वातावरण मित्रमंडळी कट्ट्यावरील गप्पा रस्त्यातून भटकणे मित्र मैत्रिणी त्यावेळी रात्र रात्र उगीच केलेली जागरणे एकत्र पाहिलेले सिनेमा पत्ते खेळणे गॅदरिंग इत्यादि जबाबदारी नसणे मुक्त वातावरण हे दिवस हा आनंद पुन्हा उपभोगता येणार नाही याकडे माझे लक्षच नव्हते तर मी फक्त अभ्यासाचा त्रास कष्ट परीक्षा याचाच विचार करीत होतो व पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही यामुळे मी आनंदात होतो . नोकरीत असताना कामातील आनंद त्यावेळचे सहकारी त्यांच्याबरोबर मजेत घालवलेला वेळ निरनिराळ्या काढलेल्या सहली एकत्रित हिंडणे फिरणे हसणे खेळणे या सर्वातील आनंद माझ्या गावी नव्हता. मी फक्त नोकरीतील दुःखच पाहात होतो .
दात चांगले असताना निरनिराळे पदार्थ चावून खाण्यातील आनंद असंख्य पदार्थांचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेताना होणारा आनंद मी दुर्लक्षित करीत होतो.म्हणजेच दुसरा एखादा हे तीनही प्रसंग दु:खाचे म्हणून सांगेल
प्रत्येकजण आपल्या मनो रचनेप्रमाणे विविध अंगांनी प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो.त्या त्या दृष्टिकोनाप्रमाणे तो त्याचा आस्वाद घेत असतो.त्याप्रमाणे तो त्याचे वर्णन करतो .परिस्थिती तीच परंतु मते अनेक .
सुखदुःख वस्तुस्थितीत नसते ते मानसिक पातळीवर असते हे पटण्याला हरकत नाही.एकाचे सुख ते दुसर्याचे दुःख असू शकेल बऱ्याच वेळा आपण उगीचच दुःखी कष्टी होत असतो .मनो रचना म्हणजेच धारणा त्याप्रमाणे अापण मुूल्य मापन करीत असतो .हे लक्षात आले की सुख दुःखाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपोआप निर्माण होतो . धारणा भिन्न मूल्यमापन भिन्न .हे लक्षात आले की आपोआपच तटस्थता निवड रहित जागृतता अलिप्तता साक्षित्व व त्यातून खरी समज प्राप्त होते. स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलतो ३०/४/२०१८@ प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com