महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती".हा चरण तुकारामांच्या अभंगातील आहे. अर्थ स्पष्ट आहे .अश्या प्रकारच्या काही उद्बोधक कथा सांगितल्या जातात. त्यातील एक कथा .अरण्यात एक सागाचे झाड होते .त्याच्या शेजारी एक रोपटे होते .लहानसा वारा आला तरीही ते रोपटे लवत असे .सागाचे झाड आपल्या फांद्या पसरवून डौलात उभे असे. सागाचे झाड रोपट्याला तू दुर्बल आहे,कमकुवत आहे, म्हणून हिणवित असे.एके दिवशी जोराचा वारा आला त्यावेळीही साग तसाच ताठ उभा होता .नेहमीप्रमाणे रोपटे लवले आणि वारा पुढे निघून गेला.वारा गेल्यावर रोपटे पुन्हा ताठ उभे राहिले .अशा प्रत्येक वेळी साग रोपट्याला हिणवत असे .रोपटे शांतपणे काहीही न बोलता सागाचे हिणववणे ऐकून घेत असे . एके दिवशी फार मोठे वादळ आले .त्या वादळाचा जोर इतका होता की साग उन्मळून खाली पडला.वादळ शांत झाल्यावर रोपटे जे जमिनीबरोबर सपाट झाले होते ते पुन्हा ताठ उभे राहिले. यावर असा बोध सांगितला जातो की नेहमी आपण नम्र असावे .
नम्र, लीन, मनुष्य टिकून राहतो. तुकारामांच्या अभंगातील सुरवातीला उल्लेख केलेला चरण आपल्याला तोच बोध सांगतो .महापुरात नदी किनारची झाडे उन्मळून पडतात, वाहून नेली जातात ,परंतु लव्हाळे (एक प्रकारचे गवत) तसेच टिकून राहते . अश्या प्रकारच्या कथा टिकून राहणे महत्त्वाचे आहे .असा बोध सांगतात कि नम्रता महत्त्वाची आहे असे सांगतात असा काही जणांना प्रश्न पडेल .लाचार होवून टिकून राहण्यापेक्षा मृत्यू परवडला असेही एखादा म्हणेल.बोधकथेमधील उदाहरण जसेच्या तसे घ्यायचे नसते.उपमा कधीही पूर्णोपमा नसते.त्यातील भाव घ्यायचा असतो. त्याप्रमाणेच बोधकथेतीलही भाव घ्यायचा असतो. टिकून राहणेही महत्त्वाचे आहे.टिकलो तर बदला,सूड,घेता येईल.दत्ताजी शिंदे म्हणाले त्याप्रमाणे बचेंगे तो और भी लढेंगे .
बदला सूड घ्यायचा नसला तरी आपण टिकलो तरच आपण आपली उन्नती करून घेऊ .जगणे असणे हाही एक आनंद आहे . शौर्याच्या नावाखाली उगीचच्या उगीच हकनाक मरणे योग्य होणार नाही . उद्धटपणा उर्मटपणा माजोरी वृत्ती गर्व असू नये .नम्र शालीन गोड स्वभाव असावा .बिकट परिस्थितीत, आपल्याला चीड आणणाऱ्या परिस्थितीत शांत राहणे नम्र राहणे अत्यंत बिकट आहे .तसा जो राहू शकेल तो खरा बलवान होय. झाडे व लव्हाळी,साग व रोपटे या दोन्ही उदाहरणांवरून नम्र लीन शालीन हा बलवान असतो असे सूचित करायचे असावे असे मला वाटते . नम्रता म्हणजे लाचारी नव्हे .नम्रता म्हणजे डरपोकपणा नव्हे.नम्रता म्हणजे शरणागती नव्हे . हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे नाहीतर गैरसमज होण्याची दाट शक्यता असते .
आपल्याला जो मुद्दा मांडायचा असेल तो आक्रस्ताळीपणे मांडण्यापेक्षा शांतपणे मांडता येऊ शकतो. भावनेच्या आहारी जाऊन केलेला आक्रस्ताळीपणा अकांडतांडव एखाद्याची दुर्बलता दर्शविते.मी उत्स्फूर्त आक्रस्ताळीपणा बद्दल बोलत आहे नियोजित आक्रस्ताळीपणा बद्दल नव्हे ! आक्रमकता आक्रस्ताळीपणा यामुळे वादविवाद अशांतता वाढण्याचा संभव आहे . वादे वादे जायते तत्त्वबोध: याऐवजी शीर्षभंग: असेच होण्याची शक्यता आहे . शांतपणे मांडलेला मुद्दा जेवढा परिणाम करतो तेवढा आक्रस्ताळीपणे मांडलेला मुद्दा करील नाही .असे मला वाटते . मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे ॥असा एक तुकाराम महाराजांचा बोध वचनाप्रमाणे वापरला जाणारा अभंग चरण आहे . नम्रपणात शालीनतेत प्रचंड सामर्थ्य शक्ती आहे असे तुकाराम महाराजांना सुचवायचे आहे . असा नम्रपणा अंगी बाणवावा म्हणून बाणवता येणार नाही .आपण उद्धट उर्मट रागीट आहोत हे जेव्हा खऱ्या अर्थाने पटेल तेव्हाच नम्रता आपोआप येईल .
* उद्धटपणाचा रागीटपणाचा अभाव म्हणजे शांतीचे अस्तित्व होय*. *खरा बलवान अशा व्यक्तीलाच म्हणता येईल. *असे सामर्थ्य सातत्यपूर्ण गतिशून्य साक्षित्वातूनच येऊ शकेल *
प्रभाकर पटवर्धन
प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?