स्वतःचा शोध ही मनुष्याची स्वाभाविक प्रेरणा आहे. हा शोध निवड रहित जागृततेतुून होऊ शकतो. कदाचित अनेक मार्गातील हा एक मार्ग आहे.स्वशोध म्हणजे स्वाभाविकपणे आपल्यामध्ये असलेले सुप्त कलागुण व इतर गुण यांचा शोध असे काही जणांना वाटते. उदाहरणार्थ बरेच डॉक्टर नाटक व सिनेमात काम करताना आढळून येतात . 

नाटक सिनेमा चित्रकला गायन इत्यादी क्षेत्रात  दुसऱ्या क्षेत्रातून मंडळी येतात. प्रसिद्ध लेखकही काही वेळा दुसऱ्या क्षेत्रातून  आलेले आढळून येतात  .अशी अनेक उदाहरणे देता येतील .आपला कल कुठे आहे ते पाहून त्याप्रमाणे व्यवसाय किंवा क्षेत्र निवडले पाहिजे .बऱ्याच वेळा आपला कल किंवा आपली आवड स्वतःच्याच लक्षात न आल्यामुळे किंवा वडील मंडळींच्या आग्रहामुळे एखादे क्षेत्र निवडले जाते .काही वेळा आर्थिक किंवा इतर परिस्थितीच्या दबावाखाली एखादे क्षेत्र निवडले जाते.नंतर आपला कल लक्षात आल्यामुळे व परिस्थितीने साथ दिल्यामुळे मनुष्य आपल्या आवडत्या क्षेत्रात येतो तर काही वेळा तो यशस्वी झाला तरीही नावडत्या क्षेत्रात राहतो. आवडते क्षेत्र त्यांच्यापासून दूर राहते .तेव्हा अगोदरच क्षेत्र निवडताना आपली आवड निवड पाहून ते क्षेत्र निवडले पाहिजे असे बऱ्याच वेळा म्हटले जाते.

  मला या दृष्टीने स्वशोध हा शब्द वापरायचा नाही .प्रत्येकाला केव्हा ना केव्हा मी कोण असा प्रश्न पडतो .मी म्हणजे देह? मी म्हणजे बुद्धी? मी म्हणजे अहंकार? मी म्हणजे मन ?मी म्हणजे  जीवात्मा की परमात्मा? की हे सर्व म्हणजे मी? .असे प्रश्न काहींना अगदी तरुणपणी ,उदारणार्थ ज्ञानेश्वर शंकराचार्य निवृत्तीनाथ इत्यादी  ,तर काहींना मध्यमवयीन असताना, तर काहींना म्हातारपणी पण केव्हा ना केव्हा साधारणपणे पडतातच .हा प्रश्न शारीरिक दुःखामुळे किंवा कौटुंबिक आर्थिक विवंचना व संकट यामुळे किंवा अन्य मानसिक ताणतणाव यामुळे पडतो .काही जण सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे असे म्हणून या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करतातात.तर काही जण पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म घेईन व गुण गाईन आवडी असे म्हणतात .असे भक्तिमार्गी संत सुरुवातीच्या काळात परमेश्वराचा म्हणजेच विठ्ठलाचा शोध घेत असतात. यासाठी सत्संग भजन पूजन नामस्मरण धर्मग्रंथ  वाचन प्रवचन ऐकणे तीर्थयात्रा इत्यादी मार्ग अवलंबले जातात .तर काहीजणी कोणतीही समस्या नसताना केवळ आंतरिक ओढीने मीचा शोध घेताना आढळतात .म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्व-शोध ही एक आंतरिक प्रेरणा किंवा स्वाभाविक  स्थिती आहे असे म्हणता येईल .स्व म्हणजेच मी म्हणजेच माझे चराचराशी असलेले संबंध होय .या संबंधांचे स्वरूप जाणून घेऊन त्यातून मी कसा आहे त्याचा उलगडा होण्यासाठी मी चाच एक भाग अलग होउन त्याने या संबंधांची त्रयस्थपणे पाहणी केली पाहिजे .ही पाहणी सातत्यपूर्ण व कुठेही या संबंधांमध्ये न गुंतता न ढवळाढवळ करता खरोखरच अलिप्तपणे केली पाहिजे .सातत्यपूर्ण म्हणजे जागृतपणे, न गुंतता म्हणजे अलिप्तपणे व ढवळाढवळ न करता म्हणजे निवड रहित पद्धतीने केली पाहिजे.स्व शोध ही प्रत्येकाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे .हा शोध निवड रहित जागृततेतून पूर्ण होऊ शकेल.

१/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel