आपल्याला मृत्यूची भीती का वाटते ?जे माहित आहे त्याबद्दल भीती वाटणे स्वाभाविक आहे उदाहरणार्थ पाण्याची भीती कारण आपण बुडू आणि मरू जंगलाची भीती कारण वन्य श्वापदे आपल्यावर हल्ला करून ठार मारतील. झाडावर चढण्याची ,प्रवास करण्याची भीती कारण आपण पडलो तर मरू.इत्यादी परंतु तरीही जे आपल्याला माहीतच नाही त्याबद्दल भीती का वाटते ?
एखादा म्हणेल की मृत्यूनंतर नरक आहे ठीक भूत योनी आहे ठीक पुनर्जन्म आहे व तो  ,हाल अपेष्टा किंवा अन्य योनी यांमध्ये येईल ,परंतु नरक भूत याोनी पुनर्जन्म इत्यादी निश्चितपणे कोणी पहिला आहे का ?खात्री देता येईल का?मृत्यूनंतर स्वर्ग चांगला पुनर्जन्म इत्यादी गोष्टीही सांगितलेल्या आहेत . प्रत्यक्षात आपल्याला काहीच माहिती नाही हे कबूल करणे भाग आहे .जी माहिती आहे ती फक्त सांगोवांगी व कल्पनेतून निर्माण झालेली आहे .जे गेले ते कधी पुन्हा सांगावयाला परत आले नाहीत जे आहे ते जरी काही सांगत असले तरी ते सत्य सांगत आहेत असा आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल 

जर असे आहे तर पहिला प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो की आपल्याला मृत्यूची भीती का वाटते?त्याबद्दल आपल्याला विचार करावयाचा आहे .जे आपल्याला माहित आहे ते सोडून जाण्याची भीती म्हणजे मृत्यूची भीती होय .शरीर मुले- बाळे नातेवाईक चल अचल संपत्ती इत्यादी  हे सर्व सोडून जाण्याची भीती  म्हणजेच अज्ञाताची भीती नसून ती जे आहे ते सोडण्याची भीती वाटते .
जे माहित आहे त्याची भीती वाटेल परंतु जे माहीतच नाही त्याची भीती कशी वाटेल ?मृत्यूनंतर जे काही आहे त्याचा एक आराखडा कल्पना  त्यांची भीती वाटणे स्वाभाविक आहे परंतु भीती वस्तुस्थिती पण काल्पनिक गोष्टींबद्दल भीती हे वास्तव .
प्रांजळपणे पाहिले तर जे आहे ते सोडून जाण्याची भीती म्हणजेच मृत्यूची भीती असे मान्य  करण्याला अडचण नसावी कंटाळा आला रे आता बाबा .किती दिवस इथे आता मला ठेवतोस घेऊन जा रे लवकर .असे म्हातारी माणसे म्हणत असली तरी प्रत्यक्षात चर अचर जड सूक्ष्म वस्तूंमध्ये असलेले बंध सुटत नाहीत हेच खरे .हे बंद सुटण्याची भीती म्हणजेच मृत्यूची भीती 
मृत्यूची भीती म्हणजे मी नष्ट होण्याची भीती म्हणजेच  माझे असलेले सर्व संबंध सुटण्याची भीती होय  भीती असू शकते पण अज्ञाताबद्दल नाही  
मी मृत्यूनंतर जीवन आहे की नाही याबद्दल बोलत नाही ते असेल किवा नसेल त्याचा विचार आत्ता अप्रस्तुत आहे मी फक्त भीती का वाटते कसली वाटते याबद्दल विचार मांडत आहे जीवन मृत्यू इत्यादी गोष्टींकडे स्वच्छपणे सरळपणे साधेपणाने पाहिले पाहिजे बऱ्याच वेळा निरनिराळ्या गोष्टींकडे  अापण अत्यंत गुंतागुंतीचा दृष्टिकोन ठेवून पाहात असतो .म्हणूनच ज्यांंचा दृष्टीकोन साधा सरळ असतो स्वच्छ असतो अशा लोकांबद्दल आपल्याला आदर वाटतो उदाहरणात टांँलस्टांँय टागोर महात्मा गांधी जे कृष्णमूर्ती इत्यादि      
२५/४/२०१८. प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel