**
आंब्याची एक मोठी बाग होती. मे महिना होता.झाडावर भरपूर आंबे लागले होते.एकजण झाडावर चढून पिशवीमध्ये आंबे काढीत होता. त्याने बरोबर तीन चार पिशव्या आणल्या होत्या. तो आंबे काढण्यात गुंग झाला असताना मालक बागेत आला.एक चोर झाडावर चढून आंबे काढीत असताना पाहून मालकाला राग आला. मालक खालूनच ओरडला पहिल्यांदा खाली उतर.मला न विचारता तू राजरोस झाडावर चढून आंबे का काढीत आहेस?तुला काही लाज शरम आहे की नाही ?
चोर शांतपणे वरती आंबे काढून आपल्या पिशव्या भरीतच राहिला.
मालकांचा राग अनावर झाला. वरून चोर बसल्या बसल्या शांतपणे मालकांना म्हणाला.
ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे. आंब्याना व मला त्यानेच निर्माण केले आहे. मी देवनिर्मित आहे. मी देवदास आहे. माझा देवदास म्हणून या फळांवर हक्क आहे. देवदासाने देवनिर्मित फळे घेतली तर त्यात काय चूक आहे?तुम्ही उगीच रागावत आहात ?
हे त्याचे बोल ऐकून मालकांचा तिळपापड झाला. एवढ्यात मालकाला एक कल्पना सुचली.
त्याने जवळच असलेला एक उंच बांबू घेतला.व त्या बांबूने त्या देवदासाला ढोसण्याला सुरुवात केली. आपल्याला बांबूने मारत आहेत. बांबूने आपल्याला जखम होत आहे. असे पाहून तो चोर ओरडू लागला. मी झाडावरून खाली पडेन.माझे पाय मोडतील. मी कदाचित मरेन.तुमचे हे कृत्य योग्य नाही. तुम्हाला पाप लागेल.
त्याच्या बोलण्याला उत्तर म्हणून मालक खालून बांबू ढोशीत म्हणाले.
हा बांबू देवाची निर्मिती आहे. मीही देवाची निर्मिती आहे. देवाच्या निर्मितीने(स्वत:) ,देवाच्या निर्मितीच्या(बांबू) साह्याने, देवाच्या निर्मितीला(चोराला) मारले तर त्यात काय चुकले ?
तू जसा देवदास, देवनिर्मित आंबे काढीत आहेस,त्या प्रमाणेच मी देवदास, देवनिर्मित बांबूंच्या साह्य़ाने, तुला देवदासाला मारीत आहे.
मालक ऐकत नाहीत बांबूने ढोसून आपल्याला खाली पाडणार हे लक्षात येताच ,तो चोर थांबा थांबा म्हणत झाडावरून पटकन खाली उतरला.
तो खाली उतरताच मालक व त्याच्या नोकराने त्याला झाडाला बांधले. एका काठीने त्याला यथेच्छ झोडपून काढले.
त्या चोराने आपल्याला शेरास सव्वाशेर भेटला हे ओळखले.शेवटी तो चोर थांबा थांबा मी चुकलो, मी पुन्हा असे करणार नाही.असे ओरडू लागला.
शेवटी मालकांना त्याची दया येऊन त्यांनी त्याला पुन्हा चोरी करणार नाही असे कबूल करून घेऊन सोडून दिला.
असे देवदास, तथाकथित संत, महात्मा, पुढारी ,समाजसेवक, नेहमीच भेटत असतात.
ज्याप्रमाणे बांडगुळ(बांदे, बांदी) स्वतः कष्ट न करता, झाडाच्या जीवनरसावर स्वतः पुष्ट होत असते, त्याप्रमाणे हे साधू इ. दुसऱ्यांनी कमाविलेल्या धनावर स्वतः पुष्ट होत असतात.
वरती पुन्हा ते अापण देवाचे दास आहोत.
देवाने आपल्याला तुमच्या उद्धारासाठी पाठविले आहे.
तथाकथित साधू ,तुम्ही माझी सेवा करा,तुमची मुलगी पत्नी सेवेसाठी आश्रमात ठेवा,तुमचे कल्याण होईल,असे वर तोंड करून सांगत असतात.
मोठे मोठे शब्द वापरून गोड गोड भाषेत प्रवचने कीर्तने व्याख्याने देत असतात.
अशा साधूंना, साधू कसले भोंदूंना, आपण ओळखले पाहिजे.
हे खऱ्या अर्थाने देवदास नसून चोर आहेत.ही बांडगुळे आहेत.
जर डोळे उघडून नीट आसपास पाहिले तर अशी बांडगुळे ठिकठिकाणी आपल्याला दिसतील.
प्रत्यक्षात ते स्वतःचे कल्याण करून घेत असतात.
राजकारण समाजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अशी बांडगुळे आढळतात
यांचा आव अापण देवदास आहोत तुमच्या उद्धारासाठी कल्याणासाठी आम्हाला पाठविले आहेअसा असतो.
प्रत्यक्षात ते स्वतःची तुंबडी भरत असतात. स्वतःचेच नव्हे तर आपल्या कित्येक पिढ्यांचे कल्याण होईल असे पाहात असतात.
*अशा देवदासांपासून आपण सावध असले पाहिजे.*
*मालकाने जसे त्या चोराला त्याच्याच भाषेत समजावले त्याप्रमाणेच आपणही अशा चोरांना बरोबर ओळखणे आणि त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे. *
*खरे देवदास आणि खोटे देवदास*
*दुसऱ्याच्या कल्याणासाठी खरेच झटणारे आणि तसा आव आणणारे*
* यातील फरक ओळखणे आवश्यक आहे*