साने गुरुजी


चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद.

तू परीक्षेत चांगल्या रीतीने उत्तीर्ण झालीस. तुला शाबासकी. परीक्षांचे निकाल लागल्यामुळे जिकडे तिकडे पास झालेली मुले मोठ्या खुषीत आहेत. नपास झालेली दु:खी आहेत. वर्षभर केलेले श्रम फुकट गेले म्हणून वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांनी वर्षभर श्रम केले होते का? ते श्रम पायाशुध्द होते का? नीट समजून रोज थोडासा नियमित अभ्यास केला तर पास होणे कठीण नसते. परीक्षा जवळ आली म्हणजे मुले जागी होतात आणि मग यश न मिळाले तर खट्टू होतात.

तुमच्याक़डे मध्यंतरी विनू आला होता ना, तो व त्याची सारी भावंडे पास झाली. सुधा, प्रभा, मालती, जतीन वगैरे तुझ्या ओळखीची सारी मुले पास झाली. तुझी प्रभा पास झाली का? झालीच असेल. ती हुशार आहे असे तू म्हणत असस. तुझ्या इतर मैत्रिणी पास झाल्या का? आणि मामांचा दिनकर पास झाला का? दिनकर मला फार आवडायचा. तो नेहमी हसायचा. त्याच्या वर्गाचे शिक्षक म्हणायचे, ''क्षणभर याचे चित्त एकाग्र होत नाही. इकडे बघेल तिकडे बघेल.'' परंतु मला त्याच्या मुखावरचे हास्य मोही. ते मला मी कोठेही गेलो तरी आठवते.

सुधा, तुला गणितात आणि शास्त्रात शेकडा ७० हून अधिक मार्क मिळाले. छान. गणित व शास्त्र विषय तुझे चांगले आहेत. आजकालच्या हिंदुस्थानला याच विषयांची जरूरी आहे. सा-या जीवनातच गणिती दृष्टी, शास्त्रीय दृष्टी हवी आहे. मी गणिती दृष्टी म्हणजे काहीही फुकट न दवड़ण्याची वृत्ती म्हणतो. भगिनी निवेदता एकदा म्हणाल्या, ''हिंदुस्थान गरीब देश आहे. एक क्षणही फुकट दवडणे पाप आहे. एक पैही अनाठायी खर्च करणे गुन्हा आहे.'' हिंदी जनतेत ही वृत्ती यायला हवी आहे. प्रत्येक पै राष्ट्रसंवर्धनाच्या कामात गेली तर कामाचे डोंगर उठतील. परंतु गणिती वृत्ती याहून थोर आहे. मी केवळ हिशेबी दृष्टीनेच बघत नाही. गणित, अनंताच्या दारात नेऊन सोडते. गणितानेच विख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाइन विश्वाचे कोडे सोडवितात. उपनिषदातील ॠषींनी गणिताच्या भाषेतच ब्रह्माचे स्वरूप मांडले. सुधा तुझ्या अण्णाला गणित कळत नाही. पुढचा जन्म येणारच असला तर तो गणितासाठी येवो. जगातील मोठमोठे तत्त्वज्ञानी गणिती होते. आणि आपले पूज्य विनोबा तेही थोर गणिती आहेत. भारताला अनंताच्या दृष्टीने नि हिशेबी दृष्टीने- दोन्ही दृष्टींनी- गणिती वृत्ती हवी आहे. त्याचप्रमाणे शास्त्रीय दृष्टी. शास्त्रीय दृष्टी म्हणजे बुध्दीला पटेल तेच घ्यावयाचे. तेच मानावयाचे. सारा बावळटपणा, बाष्कळपणा फेकून द्यावयाचा. आंधळ्या रूढींना, मृत विधिविधानांना काडी लावायची. एक प्रसंग आठवतो. म्हात्माजींचा अस्पृश्यता निवारणाचा हिंदुस्थानभर दौरा चालू होता. हिंडता हिंडता ते पुण्याला आले. शनिवार वाड्यासमोर विराट सभा भरली होती. त्या सभेत महात्माजी म्हणाले, ''वेदात अस्पृश्यतेला स्थान नाही; आणि असेल तर तो वेद मी नम्रपणे दूर ठेवीन आणि माझी बुध्दी प्रमाण मानून मी जाईन.'' पू. विनोबाजी एकदा जयप्रकाशांजवळ म्हणाले, ''देवाखालोखाल मी कशाला मानीत असेन तर बुध्दीला.'' शास्त्रीय दृष्टी म्हणजे बौध्दिक दृष्टी. युरोप बुध्दीचा डोळा उघडून वागू लागले आणि विज्ञानाची अनंत दालने खुली होऊ लागली. त्यांनी आपले जीवन सुखमय, समृध्द, निरोगी असे केले आहे. अणुबाँबचे शोध लागत असतील, परंतु तेवढ्याने शास्त्राला नावे ठेवण्याची जरुर नाही. आणि शास्त्रात मागसलेल्या भारताने तर नयेच ठेवू. भारताने विज्ञानात अमोल भर घालावी व मग जगाला शांतीचे पाठ द्यावेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel