चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद.
मुंबईस तुम्ही थोडा वेळ का होईना भेटलात म्हणून आनंद झाला. अप्पा व तुम्ही सारी जणे हँगिंग गार्डनवर जाऊन तेथील सुंदर बाग बघून आलात. मला तुमच्याबरोबर यायला जमले नाही. अरुणा फुले पाहून आनंदली म्हणून अप्पा म्हणत होता. तिला ट्रामगाड्या, मोटारी, बसिस पाहून गंमत वाटत होती. लहान मुलांना सारे पाहावे असे वाटत असते. शंकर परवा आपल्या लहान मुलांना घेऊन रस्त्याने जात होता. वाटेत एक लहान कुत्रा होता. शंकरचा मुलगा म्हणाला, ''थांबा, कुत्रा पाहू.'' आणि शेवटी म्हणाला, ''याला घरी नेऊ!'' त्याची समजूत घालता घालता नाकी नऊ आले!
तुम्ही दोन दिवस राहून लगेच गेलात. परंतु भेट झाली हे काय थोडे? ज्याला त्याला उद्योग आहेत. एकमेकांची पत्रे एकमेकांस येत-जात असली तरी प्रत्यक्ष भेटीचीही ओढ असते. प्रिय माणसांना बघावे, क्षणभर त्यांच्याजवळ बसावे असे वाटत असते. मनुष्य अन्नापेक्षा प्रेमाचा भुकेलेला आहे.
मी तुम्हांला भेटून लगेच इकडे निघून आलो. शिमग्याचे दिवस. विद्यार्थी व इतरही तरुण मंडळी गावात आट्यापाट्या वगैरे खेळण्यात दंग. रात्री चांदणे स्वच्छ असते. चांदण्यामध्ये खेळण्यात एक प्रकारची मौज असते. मी लहान असताना पिराच्या माळावर आम्ही आट्यापाट्या खेळायला जात असू. तेथे ते मोठे पायरीचे झाड होते. तुला ते आठवते का? एक मोठा म्हातारा सर्प त्या झाडाला रात्री प्रदक्षिणा घालतो अशी आख्यायिका होती. तो साप दिसावा म्हणून आम्ही पाहात असू. परंतु आम्हांला तो कधी दिसला नाही. त्याच्या अंगावर वीत वीत केस होते असे जुने लोक सांगत. या पिराच्या माळावर रात्री भुते दिसतात, त्यांचा पांढरा रंग असतो असेही म्हणत. परंतु आम्हांला भूत कधी दिसले नाही. आम्ही आट्यापाट्या खेळण्यात दंग होऊन जात असू. मला तितकेसे चांगले खेळता येत नसे. परंतु सर्वांबरोबर राहण्यात, रात्री हिंडण्याफिरण्यात मौज असते.
आता मोठा होम येत्या ३ तारखेला. निरनिराळ्या वाड्यांवर लहान लहान होम लागतील. मग गावातील सगळ्या वाड्यांवरचे लोक आपल्या महारवाड्यात जमतील. तेथे सर्व गावाचा मोठा होम असतो. तेथे कोंबडे वगैरे पूर्वी मारीत असत. त्यातही मानापमानाचे प्रश्न असत. पशुपक्ष्यांना बळी देण्याची पध्दती फार वाईट. देवाच्या नावाने तरी गरीब प्राण्यांना नका मारू. तुम्हांला मांसमच्छर खायचे तर खा; परंतु देवाच्या नावाने हत्या कशाला! कोठे बकरे मारतात, कोठे कोंबडी, कोठे दस-याला हेला मारतात. बंगालमध्ये पूजा दिवसांत कालीमातेची पूजा असते. हजारो कोकरे मारली जातात. रक्ताचे पाट वाहतात. खरोखर हे सारे अघोरी प्रकार आहेत. परंतु अजून ते बंद होत नाहीत.
आपल्या गावात आता झोळाईची पालखी गावभर हिंडेल. प्रत्येकाच्या घरी ती जाते. पूजा करायची. नारळ द्यायचा. चांदीच्या मुखवट्याच्या मूर्ती आहेत. पालखीही सजवतात. झोळाई, सोमजाई या आपल्या गावच्या ग्रामदेवता. गावाच्या वेशीवर त्यांची देवळे आहेत. जणू गावाबाहेर राहून गावाचे या जगन्माता रक्षण करीत आहेत.