''तो टांगेवाला, भुक्कड पै किंमतीचा. त्याच्याबरोबर राहणार तू? तू राजघराण्यातील. आणि त्यानं लग्नही केलं आहे. कशी राहणार तू?''

''तुम्हांला तो पै किंमतीचा, मला तो पृथ्वीमोलाचा आहे. माझ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघा. मी इथं राहीन, दुरून त्याला पाहीन. मला दुसरं काय हवं?''

''तू जगशील कशी?''

''शेण्या वेचीन, काम करीन.''

ती मुलगी ब्रह्मदेशात गेली नाही. येथेच राहिली. सरकार तिला काही वर्षासन देई. परंतु ती ते सारे त्या प्रियकराच्या हवाली करी. तो तिला हिडीस- फिडीस करी. परंतु ती तरीही प्रेमाचे गीत गाई. एका लहान झोपडीत ती राही. रस्त्यात पडलेले शेण गोळा करून आणी. त्याच्या शेण्या करी व विकी. तिच्या जीवनाला कशाने अर्थ प्राप्त झाला होता, कशाने उदात्तता आली होती? प्रेमाने. प्रेम म्हणजे किमया आहे. प्रेमाने चमत्कार होतात.''

गोष्ट सांगून तो मित्र थांबला. मी गंभीर झालो होतो. निरपेक्ष झाल्याशिवाय खरे प्रेम करता येत नाही. त्या मुलीला कशाची इच्छा नव्हती. आपल्याला प्रेम करायला कोणी तरी मिळाले या कल्पनेनेच ती मस्त होती.

''हे काजूचे गर तसेच राहिले.'' मित्र म्हणाला.

''प्रेमाची ही उदात्तता ऐकल्यावर का आता काजूचे गर खायचे?'' मी म्हटले.

''परंतु तेही एका मित्रानं पाठवले आहेत.'' तो म्हणाला.

ते काजूचे ओले गर होते. कोकणात आपण ते आमटीत घालतो. मुंबईत किती महाग मिळतात! काजूचे ते ओले गर मी खूप खाल्ले. ते उष्ण असतात. दुस-या दिवशी मला आवंढा गिळता येईना. घसा आतून सुजला. दोन दिवसांनी बरे वाटले.

आज अक्षय्य तृतीया, परशुराम जयंतीचा दिवस. चिपळूणजवळ परशुरामला उत्सव असतो तीन दिवस. परशुराम मोठे सुंदर गाव. उंचावर बसले आहे. सारे रस्ते पाखाडीचे, दगडांनी बांधलेले. तीन दिवस जो तो आपल्या घरासमोर कंदील लावतो. यात्रेला येणा-यांना रस्त्यात उजेड होतो. तीन दिवस कोणाकडेही उतरायला जा, कोणी नाही म्हणत नाही. इंग्रजी पाचवीत असताना मी, तुझे वडील व आणखी काही मित्र परशुरामला पायी गेलो होतो. एका गृहस्थाकडे उतरलो. ते म्हणाले, ''स्नान करा. दोन घास खाऊन घ्या. देवळातलं मुक्तदार जेवण फार उशीरा होतं.'' ते गृहस्थ म्हणाले, ''मागं आमच्या गावात कोणा यात्रेकरूला कोणी एकानं घरात जागा दिली नाही. त्याच्या घराला आग लागली. तेव्हापासून आमच्या गावात यात्रेच्या वेळेस कोणी नाही म्हणत नाही.'' हे परशुरामाचे मंदिर बाजीरावाचे गुरू ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी बांधले. ब्रह्मेन्द्रस्वामींची समाधी सातारा जिल्ह्यात धावडशी येथे आहे. तेथेही भार्गवरामाचे सुंदर मंदिर आहे. पाण्याचे मोठमोठे हौद आहेत. आजूबाजूला फुले आहेत.

अक्षय्यतृतीयेस उदकुंभ दान देण्यात येतो. पंखा देण्यात येतो. या उन्हाळयात थंडगार पाणी व वारा घ्यायला पंखा यासारखी देणगी कोणती? मागे त्रिचनापल्लीकडे गेलो होतो. तिकडे खेड्यापाड्यांतून लहान मुलेही हातात ताडाचा पंखा घेऊन वारा घेताना दिसत. १९३४ मध्ये धुळे तुरुंगात आम्ही होतो. उन्हाळयाचे दिवस. चक्की दळण्याचे काम. घामाघूम होत असू. अशात वा-याची झुळूक आली म्हणजे मी म्हणे, ''आईनं वारा घातला.'' आपल्या पंख्याचा वारा किती जणांना पुरणार? परंतु देवाघरचा वारा नवजीवन देतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel