यंदा उन्हाळा दर वर्षांपेक्षा अधिक आहे, नाही? पुण्याला मध्यंतरी पाऊस पडला. दिवसभर खूप तापल्यावर रात्री एकदम थंड झाले तर पाऊस यायचाच. अग येथेही परवा चार थेंब पडले. मी उजाडत कोठे तरी जात होतो. अंगावर थेंब पडले. म्हटले, कोणी मुखमार्जन केले की काय? परंतु पाहतो तो सर्वत्रच थेंब पडत आहेत असे दिसले. पाऊस फार नाही पडला; चार थेंब- नि लगेच गेला.
खरा पावसाळा सुरू होण्याआधी हे असे पाऊस एक दोन वेळा पडतील. आंब्याचे नुकसान करतील. सृष्टीला तुमच्या नफ्यातोट्याची कदर नसते. तुम्ही तिच्याशी मिळते घ्या नि समाधान माना.
तू आपल्या पत्रात मला एक प्रश्न विचारला आहेस! संस्कृती म्हणजे काय रे अण्णा, असे एक लहानसे वाक्य तू लिहिले आहेस. संस्कृती म्हणजे जीवनाला जे जे उजाळा देते, सुंदरता देते, समृध्द करते, पुढे नेते, ती ती संस्कृतीच होय. संस्कृती म्हणजे संयम. मानवाला सुसंस्कृत व्हायचे असेल तर मानवाने संयम राखला पाहिजे. मी मोठा, माझा धर्म मोठा, माझी जात मोठी, माझा प्रान्त मोठा, माझे राष्ट्र मोठे, माझे तेवढे चांगले, बाकीचे त्याज्य- असे म्हणणा-याला संस्कृती कळली आहे असे मला वाटत नाही. संस्कृती जगातील जे जे चांगले ते ते घ्यायला तयार राहील. संस्कृती सहकार करील. संस्कृती संगम करील. असे न करणारी ती संस्कृती नसून विकृती होय.
परवा एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचले, ''हिंदू संस्कृतीचा कोणीच वाली नसावा की काय?'' या लोकांना हिंदू संस्कृती म्हणजे वाटते तरी काय! महात्माजी का हिंदू संस्कृतीचे परमोच्च फळ नव्हते? ज्यांचे जीवन म्हणजे प्रत्यक्ष गीता त्यांना का हिंदू संस्कृतीचे वाली म्हणावयाचे नाही? महात्माजी दिल्लीला म्हणाले, ''हिंदू धर्माचा कोणी प्रतिनिधी परमेश्वराला निवडायचा झाला तर तो माझीच निवड करील असे मला नि:संशय वाटते.'' हे त्यांचे उद्गार का खोटे आहेत? विनोबाजी का हिंदू संस्कृतीची मूर्ती नाहीत? परंतु ते ज्या भक्तीने वेद अभ्यासतात त्याच भक्तीने कुराण अभ्यासतात. आमच्या तथाकथित हिंदू संस्कृतीच्या कैवा-यांना हा मुस्लिम धार्जिणेपणा वाटतो!
ज्ञान हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे. गायत्रीमंत्राने ज्ञानाचा महिमा सांगितला. ज्ञान म्हणजेच ब्रह्म असे आम्ही म्हणत आलो. संस्कृतीचा उपासक सा-या जगातून ज्ञान घेईल आणि मानव समाज सुखी, समृध्द, प्रगतिशील असा करण्यासाठी धडपडेल.
तू अशा संस्कृतीची उपासक हो. सर्व संस्कृतींतील चांगले घेऊन मानवसंस्कृतीची उपासना करणारी हो. आज जगाला मानवसंस्कृतीची गरज आहे.
चर्चा फोल आहेत. आपण प्रत्येक दिवस कसा जगतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. ती एक गोष्ट तुला माहीत आहे? रस्त्यात कोणी तरी अनाथ पडला होता. कोण होता तो? त्याची का काळजी घ्यायला या उभ्या जगात कोणी नव्हते?
तो पाहा एक गृहस्थ येत आहे. अनाथाला पाहून तो त्याच्याजवळ जातो, परंतु पुन्हा चालू लागतो.
''मुसलमान दिसतो आहे. मरू दे बेट्याला.'' असे तो म्हणतो.
तो पाहा दुसरा कोणी तरी येत आहे. त्या अनाथाला पाहून त्याला दया येते. तो खाली वाकून बघतो व पुन्हा उपेक्षेने चालू लागतो.
''ऊं: ! हिंदू आहे कोणी तरी. मरो बेटा.'' असे तो म्हणतो.
शेवटी मृत्यू येतो व तो हिंदू की मुसलमान ते न बघता त्याला कायमचा विसावा देतो.
सुधा, तू या वरच्या दोन माणसांना संस्कृतिसंरक्षक म्हणशील की संस्कृतिभक्षक म्हणशील? आजच्या युगात अशा लोकांची जरूर नाही. कलकत्त्यात पूर्व बंगालमधून निर्वासित येत आहेत व पश्चिम बंगालमधून पूर्व बंगालमध्ये जाण्यासाठी जमा होणारे मुस्लिम निर्वासितही आहेत. समाजवादी स्वयंसेवक या दोघांना शक्य ते साहाय्य करतात. 'तुम्ही मुसलमान निर्वासितांना मदत कराल तर खबरदार, तुमचे खून पाडू' अशा निर्भयपणे धमक्या या समाजवादी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या; परंतु ते मानवतेची सेवा करीत आहेत. इतरांनी लाखो रुपये जमवले असतील; परंतु या मानवतेच्या ख-या सेवेच्या कणापुढे ते कोट्यवधी रुपये प्रभूच्या दृष्टीने कचराच होत. नवभारताचा, नवयुगाचा, नव्या जगाचा त्या निरपेक्ष सेवेतून जन्म होईल.