एकदा आम्ही आजोबांनी पहाटे मुहूर्त पाहिला होता, म्हणून पहाटे निघालो. मला वाटते मोरू ओकाची गाडी होती. बैल ताजेतवाने. खेरांच्या उतरणीतून पळत पुढच्या चढावावर बैल आले आणि ते रस्त्याच्या बाजूला गेले! केवढी धोंड तेथे होती! ती अजून तेथे आहे. त्याच्यावर गाडी आदळली. जू मोडले! आम्ही सारे वाचलो. बैल निभावले. परंतु आता दुसरी गाडी कुठली? मोरू म्हणाला, ''मी विष्णूची गाडी आणून देतो.'' आणि तो गेला नि ती गाडी घेऊन आला. निघाले बैल पाखरांसारखे. अक्का, मावशी गाडीत होत्या. वाटेत जांभळीची झाडे जांभळांनी ओथंबलेली. आम्ही गाडीतून उतरलो व जांभळे खात निघालो. एक होलपाटा वर मारला की, जांभळांची पखरण खाली पडे. आमच्या जिभा जांभळे खाऊन निळया झाल्या. मी वाटेत करंजणीच्या गोड विहिरीचे पाणी पिणार होतो. अक्का म्हणाली, ''जांभळं, करवंदं यांच्यावर पाणी पिऊ नये. मोडशी होते.'' मोरू म्हणाला, ''मागं एक वाटसरू याच रस्त्यानं जात होता. पाणरलेली, पावसानं भिजलेली जांभळं त्यानं खाल्ली. वर आणखी पाणी प्यायला की काय हरी जाणे. परंतु रस्त्यातच जुलाब उलटया होऊन तो मरून पडला.''
सुधामाई, तुम्ही जांभळे खाल्लीत तर वर पाणी नका हो पिऊ. अरुणालाही जपा. तुमच्या तिकडे जांभळे आहेत का? पुण्याच्या मंडईत जांभळे येतात विकायला. कशी रसाळ असतात. कोकणातील जांभळांच्या अंगावर फारसा गर नसतो. परंतु पुण्याकडील ती जांभळे चांगली गरदार, दळदार असतात. आपल्या भागीरथीकाकूच्या परसवात जांभळी, कोकंबी, अळविणी, आवळी- सर्व प्रकारची झाडे होती. लहानपणी 'आमची' मौज होती.
परवा लक्ष्मीकडे गेलो होतो. ती इंटर सायन्सची परीक्षा पास झाली. पेढे मिळाले. ती म्हणाली, ''तुम्हांला सांगण्यासाठी म्हणून दोनदा तुमच्याकडे आले तर तुमच्या खोलीला कुलूप.''- आपला आनंद आपल्या मनात नसतो. दु:खाला वाटेकरी हवा असतो तसा सुखालाही. माझा एक विद्यार्थी मित्र होता. तो परीक्षेत पहिला आला होता. तो छात्रालयात राहात असे. त्याचे अभिनंदन करायला मी त्याच्या खोलीत गेलो तर तो रडत होता.
''नरहर, काय झालं? रडतोस का? तू तर पहिला आलास. हसायच्या वेळेस तुला रडू का येतं बाळा?'' त्याला अश्रू आवरत ना. मी पुन्हा पुन्हा विचारले. तेव्हा तो म्हणाला, ''अण्णा, मी पहिला आलो; परंतु हे कोणाला कळवू?'' नरहरचे वडील नव्हते. आपण पहिले आलो, याचे कौतुक करायला कोणी नाही म्हणून त्याचे डोळे भरून येत होते. मनुष्याचा आनंद दुस-याशी एकरूप होण्यात आहे. आपल्या भावनांशी समरस होणारा कोणी नसेल तर जीवनात आनंद नसतो.
परंतु मनुष्य आपले वर्तुळ लहान ठेवतो. ठराविक दोनचार माणसे एवढेच जणू त्यांचे जग असते. जर सारे जग तो आपले मानील, तर त्याच्या आनंदाला तोटा राहणार नाही. रशियाच्या सर्वसत्ताधारी स्टॅलिनची गोष्ट तुला माहित आहे? त्याची पत्नी मरण पावली. या कठोर पुरुषाचे तिच्यावर प्रेम होते. तिने त्याला सहृदय बनविले होते. तिच्या सर्वस्वार्पण वृत्तीमुळे त्याच्या भावना पुसून टाकलेल्या जीवनातही थोडा ओलावा आला होता. परंतु ती मेल्यावर, तिची शवपेटिका भूमातेच्या पोटात ठेवल्यावर स्टॅलिन म्हणाला, ''माझ्या हृदयातून सारी दया, करुणा, प्रेम ही आजपासून नाहीशी झाली. हे हृदय आता दगडाचं झालं आहे.'' मी ते वाक्य त्याच्या चरित्रात वाचले आणि स्टॅलिनच्या जीवनावर प्रकाश पडल्याप्रमाणे मला वाटले. औरंगजेब बादशहाचेही असेच नव्हते का? सा-या जगाशी कठोर होणारा औरंगजेब आपल्या मुलीसमोर नांगी टाकी.