चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

तुम्ही पिकलेल्या आंब्याचे उष्टावण केलेत, परंतु मी अजून नाही केले. कोकणात घरी जाईन व घरचा आंबा खाईन. तुम्हीही खा. आपण सारीच चार दिवस घरी राहू व एक मोकळा कौटुंबिक आनंद लुटू. त्या आनंदासारखा गोड आनंद नाही. अरुणाला सर्वत्र नेऊ. शेताच्या बांधावर तिला बसवू नि फोटो काढू; किंवा तू तिला घेऊन त्या आपल्या जमिनीपासून फांद्या असलेल्या आंब्याच्या झाडावर बस. अप्पा फोटो काढील. आपण शेतातच एक दिवस स्वयंपाक करू. आमरस करू. मी आयते घालीन. आई मला म्हणायची तू किती पातळ सारखे आयते घालतोस. सुधा, तुला येतात का आयते घालता? तांदुळाचे पीठ पातळसर करायचे आणि जाड सपाट तव्यावर वाटीने वाटोळे पीठ ओतायचे. वर पत्रावळ झाकण. आयते किती सुंदर दिसतात! स्वच्छ दिसतात, नाजूक दिसतात. कला सर्वत्र आहे. देशावर कणकेचा मांडा करतात. अगदी चिकण गव्हाची कणिक लागते; पुरण भरून थोडी लाटून मग हातावर पोळी वाढवीत वाढवीत नेतात व उलट्या खापरावर टाकतात. अग, घडी केली तर केवढीशी होते! तू असा मांडा करताना कोणाला पाहिले आहेस?

ज्ञानेश्वरांच्या चरित्रात गोष्ट आहे. ज्ञानेश्वर मुक्ताबाईला म्हणाले, ''मांडे कर.'' परंतु त्यांच्यावर बहिष्कार होता. त्यांना खापर मिळेना. चुलीवर खापर उलटे ठेवून त्यावर मांडा भाजायचा असतो. शेवटी ज्ञानदेव मुक्ताबाईस म्हणाले, ''माझ्या पाठीवर मांडे भाज.''

तुम्ही कोकणात या. मी वाट पाहीन. अप्पा पुन्हा झाडावर चढेल. झेल्याने आंबे कसे काढतात ते अरुण बघेल. झेल्याने आंबे ओढीत असताना पिकलेला आंबा जरा धक्का लागताच खाली कसा पडतो आणि तो खाण्यात कशी मौज असते ते पत्रात सांगून थोडेच कळणार?

आपली अलिबागची अक्का झाडावर चढण्यात पटाईत. ती चपळ नि खुटखुटीत. त्या गोष्टीला ३० वर्षे होऊन गेली. अक्का माहेरी आली होती. अप्पा नि अक्का दोघे शेतावर जात. अप्पा असेल पंधरा वर्षांचा. अक्का आंब्याच्या झाडावर चढली. टोकांबा त्याचे नाव. ती झेल्याने आंबे तोडून घेऊन खाली टाकीत होती आणि अप्पा गोणपाटाने फटक फटक करीत होता. आणि तिकडून सीतारामनाना ओकांनी ती गोष्ट पाहिली. त्यांनी भाऊंना सांगितले. दुस-या दिवशी भाऊ अक्काला म्हणाले, ''चंद्ये, तू का झाडावर चढली होतीस?''

''मग त्यात काय भाऊ? भराभर काढले आंबे.'' अक्का म्हणाली.

''अग, एखादे वेळेस वारा सुटतो. पुन्हा नको चढूस.'' ते म्हणाले.

मला सीतारामनाना आठवल्यामुळे त्यांच्या घरचाच तो मुलगा आठवतो. अग, दुपारच्या वेळेस तो आंबे काढायला गेला. उंच झाड आणि वारा सुटला जोराचा. तो खाली येऊ लागला, परंतु त्याचा हात निसटला. तो खाली पडला उंचावरून, आणि तात्काळ देवाघरी गेला. घरी माणसे वाट बघताहेत- की अजून जेवायला येत कसा नाही? तो हाकाहाक कानी आली. कसले जेवण नि काय! मरण कोणाला कुठे कसे येईल त्याचा नेम नसतो? जणू कोणी ओढून नेतो. आपल्या विठोबारावांचा मुलगा नाही का? मागे विहिरीतून चांगला पोहून वर आला. परंतु म्हणाला, 'पुन्हा दोन उड्या मारून येतो.' आणि त्याने पुन्हा बुडी मारली. परंतु वर आला नाही. त्याला का मृत्यूने ओढून नेले? गावोगाव अशा गोष्टी असतात. मला मावशी बडोद्याची गोष्ट सांगायची. नर्मदाकाठच्या चांदोद कर्नाळी गावी लग्न होते. दुपारी जेवणाची पंगत मांडलेली. एक मुलगा नर्मदेवर गेला. तेथे नर्मदेत सुसरी नि मगरी. ती बघ एक सुसर तीराजवळ आहे, आणि मुलाला एकदम ओढून घेऊन ती गेली. मुलगा ओरडतो आहे! गेली सुसर! मंडपात बातमी आली. ज्याच्या त्याच्या तोंडचे पाणी पळाले. लग्नाचा समारंभ, आणि मरण येऊन उभे राहिले! सुख आणि दु:ख ही जणू जवळजवळ असतात. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे : ''जीवनाच्या पोटी येथे मरण आहे.'' होऊ दे या मरणाच्या गोष्टी. जीवन अनंत आहे. मरणही जीवनाचे जणू रूप. मरण म्हणजे पुन्हा नवजीवन मिळविण्यासाठी घेतलेले तिकिट. सभोवती मरण असले तरी आपण जीवनाकडेच पाहतो. महात्माजी म्हणायचे, 'सभोवती निराशा, हिंसा यांचे थैमान असले तरी जीवनाचे, सृष्टीचे अंतिम स्वरूप विनाशाहून, हिंसेहून निराळे असले पाहिजे. आणि जीवनात हा परमोच्च कायदा म्हणजे प्रेम होय.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to सुंदर पत्रे


श्यामची पत्रे