चि. प्रिय सुधास,

सप्रेम आशीर्वाद.

तुझे या वेळेस सुंदर पत्र आले नाही. तुझी पत्रे चांगली असतात, असे मागच्या वेळेस लिहिले म्हणून ऐटलीस वाटते? का पावसाळा येणार म्हणून कामात आहात? सकाळी वाळवणं वाळत घालायची, गुरांनी खाऊ नये म्हणून राखण करायची, संध्याकाळी ती सारी भरायची. उन्हाळयात हे काम असते. गुळाची ढेप घेता आली तर घेऊन ठेवायची. ती फोडून तो गूळ भरून ठेवायचा. हवा लागू नये, गूळ पातळ होऊ नये म्हणून घट्ट झाकणे लावायची. कोकणात आमच्या लहानपणी आम्ही शेगडी वगैरे गुळाच्या हंडयावर झाकण ठेवून मातीने लिंपून टाकीत असू. ज्या दिवशी ढेप फोडायची, गूळ भरून ठेवायचा, त्या दिवशी गूळ खायची मजा आणि त्या दिवशी आंब्याचे पन्हे करायचे. गंमत. तुझ्या तेथे गूळ भरून ठेवायचे असे प्रकार नसतील, परंतु लाकडे साठवून ठेवायची, शेण्या साठवून ठेवायच्या ही कामे असतील. तेव्हा या कामात रमलीस की काय? अळी वगैरे भाजून उद्या पेरण्यासाठी तयार केलीत का? यंदा भुईमूग, चवळी वगैरे पेरणार का? गवार, भेंडे पेरणार का? बी वगैरे बघून ठेवा.

काही काही ठिकाणी पाऊस सुरू झाला असे वाचले. खरा पाऊस सुरू झाला की हा तात्पुरता ते कळत नाही. परंतु थोडा पडला तरी विहिरींना थोडे पाणी येते. थोडी हातहाय कमी होते. हा पाऊस तात्पुरता असला तरी खरा पाऊसही काही आता लांब नाही.

मी अकस्मात धारवाडला जाऊन आलो. कधी गेलो नव्हतो. तेथे प्रिय मित्र भास्करराव यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्या घरचे वातावरण किती प्रेमळ! आणि सारी मुले आनंदी, मोकळी. आपापले कपडे धुतात. तो लहान सुहास तोही आंघोळ करून आपली चड्डी आपटून धुवीत होता. विहिरीवरून पाणी आणायला सारी मदत करीत होती. जेवताना मजा. सुहास म्हणाला, 'आई म्हणजे केवढी थोर देणगी! लहान मुलाला सारे आईजवळ मागण्यात, तिच्याजवळून घेण्यात आनंद असतो. तेथे त्याचा हक्क, तेथे त्याचे सारे स्वातंत्र्य! '

आम्ही बोलत होतो. मी म्हटले, 'हुबळी' शब्दाचा अर्थ काय? तर मित्र म्हणाले : कानडीत 'हू' म्हणजे फूल व बळळी म्हणजे वेल. 'फुलवेल' हा या शब्दाचा अर्थ. कन्नड भाषेत 'हुब्बळी' असे म्हणतात. नावांचे अर्थ कळले म्हणजे किती आनन्द होतो. अग उटकमंड भूगोलात आपण वाचतो. नीलगिरीतील हवा खाण्याचे हे ठिकाण! परंतु 'उटकमंड' हा साहेबाने केलेला अपभ्रंश. 'उदकमंडल' असे मूळचे सुंदर संस्कृत नाव. नीलगिरीभोवती सर्वत्र सुंदर पाण्याची सरोवरे आहेत. विशेषत: उदकमंडल भागात अशी असतील. आणि कूर्गची राजधानी 'मर्कारा' म्हणून आपण वाचतो ना? त्याचा मूळ शब्द 'मडिकेरी' असा आहे. मडि म्हणजे सोवळे व केरी म्हणजे तळे. सोवळे तळे असा अर्थ होतो. सोवळे म्हणजे का निर्मळ, पवित्र. तेथेही स्वच्छ पाण्याची तळी असतील. मी तिकडच्या स्वच्छ पाण्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. पोहण्यासाठी बुडया मारणारा मनुष्य किती तरी खोल गेला तरी दिसतो! स्वच्छ पाणी!

मला धारवाडला किती तरी गोष्टी कळल्या. कन्नड वाङ्मयातील महान नावे कळली. अनेकांचे इतिहास कळले. परंतु या पत्रात थोडक्यात सारे कसे सांगू? कानडी- मराठीवादाच्या आपण गोष्टी ऐकतो. उगीच नाही विरोध वाढत. येथील वृध्द लोक म्हणाले, ''आम्ही पुण्यास शिकायला असताना आमची थट्टा व्हायची. कानडीअप्पा म्हणून टिंगल व्हायची. कानडीत कविता आहेत का हो, म्हणून विचारायचे. एका प्राध्यापकानं आमच्या देशाला अनार्य देश म्हटलं. आम्ही मुले रागावलो.'' अनार्य शब्द गीतेत 'असंस्कृत, रानटी' या अर्थी आहे. त्या प्राध्यापकांना द्राविडी देश असे का म्हणायचे होते? एक मित्र म्हणाले, ''धारवाडला पहिलं वर्तमानपत्र सुरू झालं तेही मराठीत. शिक्षणाधिकारी यायचे ते सारे महाराष्ट्रीय. ते इथं खुद्द धारवाडमध्ये मराठीला उत्तेजन द्यायचे.  पुढं व्ही. बी. जोशी म्हणून एक शिक्षणाधिकारी आले. त्यांना हा अन्याय वाटला. त्यांनी गाडं बदललं. आजूबाजूला संस्थानं होती; त्यांचे राजे महाराष्ट्रीय. प्रजेची भाषा कन्नड तरी त्यांची राजभाषा मराठी!'' अनेक गोष्टी मी ऐकत होतो. धारवाडला सरकारने एखादे कॉलेज काढावे म्हणून लोकांनी मागणी केली. सरकार म्हणाले, ''तुम्ही दोन लक्ष रुपये द्या. मग कॉलेज काढू.'' तेव्हा येथील ट्रेनिंग कॉलेजचे एक प्रिन्सिपॉल व दुसरे एक गृहस्थ यांनी घरोघर हिंडून दोन लक्ष रुपये जमविले. अनेकांजवळून एकेक महिन्याच्या पगाराची देणगी घेतली. अशा रितीने हे कॉलेज उभे राहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel