सुखार्थिन: कुतो विद्या, कुतो विद्यार्थिन: सुखम्।

ज्याला सुखासक्ती असेल त्याला विद्या कोठली, व विद्येच्या उपासकाला सुखोपभोग कोठले?

मला प्राचीन काळचे आश्रम आठवतात. जेथे शिकण्यासाठी मुले जात तेथे एक प्रकारची समता आहे. मुलगा राजाचा असो वा रंकाचा. सर्वांना एक शिस्त. कृष्ण आणि बलरामही सुदाम्याबरोबर लाकडे आणायला जातात. राजाचा मुलगाही नीट वागला नाही तर त्याला हाकलून देत. 'विक्रमोर्वशीयम्' म्हणून एक संस्कृत नाटक आहे. गुरुगृही राजाचा मुलगा शिकत असतो. तो एका पक्ष्याला बाणाने मारतो. आश्रम-नियमांचे उल्लंघन करतो. ऋषि म्हणतो, ''परत पाठवा याला. आश्रमविरुध्दमाचरितेमनेन.'' शाकुंतल नाटकात कण्वऋषींच्या आश्रमात शिरताना दुष्यंत म्हणतो, ''विनीतवेषेणप्रवेष्टव्यानि आश्रमपदानि नाम'' आश्रमात विनयाने पाऊल ठेवले पाहिजे. कण्व कुलपती होते. दहा हजार विद्यार्थी ज्याच्याजवळ शिकायला असत, त्याला कुलपती म्हणत. आणि मुले शिकायला आली की गायी चरायचे आधी काम देत. इकडे तिकडे जाणा-या गायींना सांभाळणे कठीण. ओढाळ गायीच्या गळ्यात लोढणेही बांधावे लागते. मग गुरू म्हणे, ''ज्याप्रमाणे या गायींना सांभाळणे कठीण त्याप्रमाणे आपली इंद्रिये सांभाळणे कठीण. गायींच्या गळ्यांत लोढणे अडकवावे लागते. त्याप्रमाणे तुम्हांलाही नियम, व्रते यांचे बंधन इंद्रियांना घालावे लागले.'' आणि गुरूला दक्षिणा १२ वर्षे शिकल्यानंतर जाताना द्यायची. गरिबाजवळ काहीच नसेल तर त्याने नुसते एक फूल दिले तरी पुरे. कृतज्ञतेची ती खूण आहे. आज श्रीमंताचा मुलगा तेवढीच फी देतो, गरिबाचा तेवढीच देतो! हा केवढा अन्याय? गरिबाजवळून दोन आणे घ्या, श्रीमंत मुलाजवळून २५ रुपये घ्या, परंतु हे कोणाच्या मनातही येत नाही.

परंतु मी हे काय सांगत बसलो? तुमच्याकडे रामनवमीचा उत्सव झाला का? पन्हे वगैरे केलेत? रामनवमी झाली. आता मारुतिजयंती येईल. चैत्री पुनवेला मारुतीचा जन्म. कोकणातील आपल्या गावी आपणच मारुतिजन्माचा उत्सव करीत असू. तुझे आजोबा त्या दिवशी पहाटे जाऊन मारुतीची पूजा करायचे. आई प्रसादासाठी नारळीपाकाच्या वड्या करून द्यायची. पुण्यात पंधरा पंधरा दिवस मारुतीसमोर कथा होतात. आणि तेथे मारुती तरी किती! रामदासस्वामींनी महाराष्ट्रभर मारुतीची उपासना रूढ केली म्हणतात. असे एकही गाव नसेल जेथे मारुतीचे लहानसे मंदिर नाही. आधी रामाचा जन्म, नंतर मारुतीचा. आधी ध्येय, व मग त्या ध्येयासाठी धडपडणारा जीव. सुधा, हनुमंताचा केवढा महान आदर्श! त्याचे जीवन म्हणजे सर्वांगीण विकासाचे भव्य उदाहरण! शरीराने बलवान आणि बुध्दीनेही समर्थ. पुन्हा हे सारे कायिक व बौध्दिक बळ त्याने रामसेवेसाठी दिले. आपले जीवन थोर ध्येयासाठी देणे म्हणजे मारुतीची उपासना. हनुमान जन्मला तोच लाल सूर्यबिंबाला मिठी मारायला उड्डाण करिता झाला. मारुतीचे उपासक समर्थ रामदासस्वामी लिहितात:-

''उत्कट भव्य ते घ्यावे। मिळमिळीत अवघेचि टाकावे॥''

जीवनात मिळमिळीतपणा नको. परीक्षेत होईन काठावर पास, अशी आज मुलांची वृत्ती. शंभरातील नव्वद मार्क मिळवीन अशी महत्त्वाकांक्षा नाही. कोणतेही कर्म असो, त्यात परमोच्च गाठीन, अशी धडपड हवी. मिळमिळीत जीवनात राम नाही, आणि ज्यात राम नाही, ते मारुती हृदयाशी धरणार नाही. मारुतीच्या किती कथा! सीतामाई त्याला मोत्यांचा हार देते. तर तो एकेक मोती चावून बघतो. सीता म्हणते, ''हे रे काय?'' तो उत्तरला, ''त्यात राम आहे का बघत आहे.'' ती म्हणाली, ''तुझ्या हृदयात आहे?'' त्याने हृदयकपाट उडून आतील राममूर्ती दाखविली. ध्येयाचा ध्यास हवा माणसाला. कबीर म्हणतो,

''अंदर राम बाहर राम। जहाँ देखो वहाँ राम ही राम॥''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel