सुधा, तुझ्या आईमध्ये अनेक गुण होते. परंतु तिचा व्यवस्थितपणा मला नेहमी आठवतो. तू व्यवस्थितपणाची उपासना कर. सारे काम स्वच्छ व नीटनेटके करावे. अव्यवस्थितपणा हा आपला राष्ट्रीय दुर्गुण आहे. तो घालवला पाहिजे. व्यवस्थितपणा म्हणजेच सुंदरता. कोणतेही काम वेळच्या वेळेस करणे, कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे, पैशांचा व्यवस्थित हिशेब ठेवणे, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, तिकिटे रांगेत नीट उभे राहून घेणे, क्यूत नीट उभे राहून बसमध्ये शिरणे, शेकडो गोष्टी व्यवस्थितपणात येतात. आम्ही दहा माणसे; जेवायला जमलो तरी किती घोळ घालतो. युध्दे वाईटच; परंतु युध्दे करायलाही अनेक गुणांची जरूर लागते. अग पहिल्या महायुध्दाच्या वेळेस जर्मनीने पूर्व सरहद्दीवरून लाखो सैन्य पटकन पश्चिम सरहद्दीवर आणले. लाखो लोकांची व्यवस्थित ने-आण करणे, त्यांचे खाणेपिणे, शेकडो गोष्टी; परंतु यंत्रासारख्या होत असतात. भारताने व्यवस्थितपणा अंगी बाणवून घेतला पाहिजे. नाना फडणिसांची व्यवस्थितपणाबद्दल फार ख्याती. तुळशीबागेत नाना कीर्तनाला जायचे. ते येताच एकदम सारे शान्त होत असे. इंग्रजांनी, नाना म्हणजे व्यवस्था, असे गौरवाने म्हटले आहे.
तू म्हणशील अण्णाने हे काय 'व्यवस्थापुराण' आज सुरू केले आहे! शिमग्याच्या गंमतीजंमती का तुला हव्या आहेत? पुण्याच्या एका मित्राचे पत्र आले. पुण्यात शिमगा वगैरे सारे बंद. मुंबईत मधून मधून होता म्हणे. उत्तर हिंदुस्थानचे भय्ये शिमगा खेळल्याशिवाय थोडेच राहणार? एकमेकांच्या अंगावर रंग उडवण्याची मजा. गोकुळात बलराम आणि कृष्ण रंग खेळायचे. होळीला बुक्का, गुलाल उधळायचे. ते प्रसिध्द गाणे तुला माहीत आहे?
''जमुनातट राम खेले होरी जमुनातट''
यमुनेच्या तीरावर बलराम होळी खेळत होते. उत्तरेकडे धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळतात. त्या दिवशीच अंगावर रंग उडवतात. सुधा, मुंबईला बंगाली लोक आहेत ना! काय मस्त खेळतात रंग! त्यांच्या बायकाही त्यात भाग घेतात, लहानथोर नाना रंगांनी रंगून जातात. आज ना कोणी बडा, ना छोटा. आज अंगावर रंग उडवला म्हणून कोणी रागवयाचे नाही. ती गंमत मानायची सर्वांनी. जणू समता अनुभवायची.
धूलिवंदन! आज का भूमीचा महिमा? अरे, ती धूळ तुच्छ नका मानू. लागू दे ती जरा अंगाला. ॠषी म्हणतो :
''मधुमत् पार्थिव रज:।''
तो मातीचा कण तोही गोड समज. रवीन्द्रनाथ गीतांजलीतील एका गीतात म्हणतात, ''मला दागिने घालून सुंदर वस्त्रे परिधानवून त्या धुळीतील खेळांपासून हे मला दूर ठेवतात. पृथ्वीच्या आरोग्यदायी स्पर्शापासून मला दूर ठेवतात.'' अगदी पोषाखी नका बनू, असे का धूलिवंदनाचा सण सांगतो? का जेथे सर्व वाइटाचे भस्म केले तेथील भूमी पवित्र झाली. ते भस्म वंदायचे. होळीचा अर्थ काय? काय जाळायचे? ती लाकडे, त्या गोव-या म्हणजे काय! खरे म्हणजे आपल्या मनात लपून बसलेल्या सर्व वाईट गोष्टी आज बाहेर काढून त्यांचे भस्म करायचे असते. देवा शंकराने कामदेवाला जाळले. त्याची ही खूण असे कोणी म्हणतात. मनातले जमलेले सारे बरबट आज बाहेर फेकायचे. निर्मळ व्हायचे. तो होम म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील, सामुदायिक जीवनातील जे जे वाईट, त्याचे त्याचे भस्म करणे होय. तो जुना सण ठेवावा. हा नवीन अर्थ यात ओतावा. अचकटविचकट अभद्र बोलणी बंद करावी. अज्ञान, भेद, आलस्य, भीती, भांडणे, भोगवासना, स्वार्थ नाना दुर्गुणांचे प्रतीक म्हणून एक गवताचा चिंध्यांचा पुतळा करावा. त्याचे भस्म करावे. गावाची सुधारणा करण्याचे नवीन संकल्प करावेत. गावातील जुनी भांडणे आज भस्म झाली. आता प्रेमाची रंगपंचमी रंगो. सारे एकत्र खपू, हसू, खेळू, शिकू निर्मू. मौज.