गदगला डॉ. गोडबोले यांनी केवढे हॉस्पिटल बांधले आहे. एक्स-रे मशिन वगैरे सारे आहे. हॉस्पिटलच्या आवारातच बाजूला हरिजन वसतिगृहही चालविले आहे. ते मोठे कर्तबगार आहेत.
दूर टेकड्या दिसत. त्यांतून सोने निघे म्हणतात. परंतु फारच थोडे. खर्चाच्या मानाने परवडत नाही म्हणून ते काढण्याचा कोणी उद्योग करीत नाही.
कन्नडचा हा उत्तर भाग सुपीक, परंतु पाण्याचा दुष्काळ. खाली म्हैसूरच्या बाजूला भरपूर नद्या, कालवे. परंतु धारवाड, हुबळी भागांत मोठी नदी नाही. पाण्याचे हाल. कोटी दोन कोटीच्या पाण्याच्या योजना आहेत, केव्हा प्रत्यक्षात येतील हरी जाणे. १९५३ च्या सुमारास धारवड, हुबळी यांना पाणी देऊ सरकार म्हणते. नळ वगैरे सामान येऊन पडले आहे.
हुबळीला मी मनूकडे जेवायला गेलो. अमळनेरला ती लहान असताना मी तिला गोष्टी सांगायचा. मनू डॉक्टर आहे. तिचे यजमानही डॉक्टर. मनूचे लहान बाळ नुकतेच गेलेले. ती दु:खी होती. मी मागे तिला पत्र लिहिले होते. बाळाचे दोन दिशी बारसे होते. तो आधीच गेला. चांगले ८-८॥ पौंड वजन होते. आरोग्यसंपन्न अर्भक! आले नि देवाघरी गेले. मनू म्हणाली, ''उपाय चालत नाहीत. पाहिलं की निराशा येते. माझ्या हाताला कधी अपयश आलं नव्हतं. परंतु माझ्याच बाळाच्या बाबतीत आलं.'' मनूचा चेहरा गंभीर, जरा उदास दिसला. काय करायचे? मी तिच्या डोक्यावरून हात फिरविला व म्हटले, ''मनू, अप्पाचासुध्दा पहिला मुलगा असाच तिस-या दिवशी गेला. किती चांगला मुलगा! कसं जावळ होतं! आणि एकदम सुकून गेला! काही लक्षातही आलं नाही. मनू, ही दु:ख नेहमी ताजीच असणार! तू विवेकी, विचारी!'' खरेच मनू विवेकी. तिचा अरुण आता ६-७ वर्षांचा आहे. गोड मुलगा. शेजारी हसरी आनंदी शान्ता आहे. तिला म्हणतो, ''तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होऊन ती जाऊ दे सासरी. तू नको जाऊस,'' लहान भाऊ झाला तेव्हा अरुण म्हणाला, मला अगदी खोलीभर हिरेमाणके मिळाल्याचा आंनद झाला आहे!'' लहान मुलांना कधी कधी शब्द कसे सुचतात पण! अग, नानासाहेब गो-यांची शुभा लहानपणी त्यांना म्हणाली, ''कसा राजासारखा शोभतो माझा नाना!'' मनूचा अरुण किती तरी वाचतो. खरेच, मागील वर्षी ती सारी तुमच्या बोर्डीला आलीच होती. त्यांना नारळी नि समुद्र यांची अजून आठवण येते. अरुणचे वडील म्हणाले, ''मागील वर्षी आम्ही बोर्डीला गेलो होतो. समुद्रावर बसलो होतो. मनूने 'सागरा अगस्ति आला' असा चरण वाळूत लिहिला. तर अरुणने सागराच्या पुढे स्वल्पविराम केला व आईला म्हणाला, ''सागराला हाक ना मारलीस? पुढे खूण नको का?'' एवढासा अरुण! पण बघ त्याची बुध्दी. प्रिय आचार्य भागवत अरुणचे काका. ते या लाडक्या पुतण्याला अनेक सुंदर पुस्तके आणून देतात. आचार्यांची पत्रे मनू व तिचे यजमान यांना धीर देतात. हा अरुण अगदी लहान होता. तेव्हा आचार्य व मी येरवडा तुरुंगात होतो. बाळ अरुणची वत्सल वर्णने करणारी मनूची पत्रे आचार्य मला वाचायला देत! मातृप्रेम ही अवर्णनीय वस्तू आहे. मनू व तिचे यजमान अरुणसह मला हुबळी स्टेशनवर पोचवायला आली होती. स्टेशनात आलेले टपाल पडले होते. मनू म्हणाली, 'दादांचं पत्र असेल.' दादांचे म्हणजे आचार्य भागवतांचे. आचार्यांच्या पत्राची केवढी ओढ! दु:खी मनूला त्यांची पत्रे म्हणजे अमृतांजन!
मनू देशावर वाढलेली. परंतु तिच्या यजमानांचे पूर्वायुष्य कोकणात गेलेले. अग, पालगडला आचार्य भागवतांचे नाते होते. आम्ही कोकणातल्या गोष्टी बोलत बसलो; तो कोकिळा ओरडली. अरुण म्हणाला, ''पाणी नाही, शेण खा'' असे ना हा पक्षी म्हणत आहे? मी म्हटले, ''अरे, ती चातक पक्ष्याची गोष्ट. सासूने सुनेला 'ऋषीला पाणी प्यायला दे' म्हटले तर सुनेने शेणखळा नेऊन दिला. ऋषीने शाप दिला, ''तुला पाण्यासाठी टाहो फोडावा लागेल!'' चातक पक्षी म्हणजे ती सून. पावसाच्या वेळेस दोन थेंब याच्या तोंडात पडतात! तेवढ्यावर वर्षाची तहान भागायची.'' आणि मग पक्ष्यांच्या गोष्टी निघाल्या. अरुणचे वडील म्हणाले, ''शेरभर नाचणी, इतकेच पीठ'' म्हणून एक पक्षी ओरडतो. सासू सुनेला म्हणत आहे की, 'शेरभर नाचण्या असून पीठ इतकेच कसे?' आणि तो दुसरा एक पक्षी,- ''त्रिय्यो त्रिय्यो'' म्हणून आवाज काढतो, मी म्हटले. आणि 'पेरते व्हा,' 'कवडा पोर पोर' वगैरे सर्व प्रकारचे पक्ष्यांचे आवाज आमच्या स्मरणात आले. आणि उंबरगावचा राम मला म्हणायचा, ''तो पक्षी 'पेरते व्हा' कशावरून रे म्हणतो? 'चालते व्हा' कशावरून म्हणत नसेल?'' त्या ध्वनीनुरूप कोणतेही शब्द आपण बसवावे. आगगाडीच्या आवाजात ''कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी'' हे चरण आपण बसवतो! मनुष्याला सारी सृष्टी आपलीच वाणी बोलत आहे असे वाटते!
गदगला त्या दिवशी रात्री थोडा पाऊस आला. सारी झोपली होती- पाऊस आला म्हणजे माझे मन नाचते. उचंबळते. पावसातून फिरायला जावे असे नेहमी मला वाटते. बाहेरच्या झाडांवर टपटप् आवाज होत होता. कोकणात आपल्या घराजवळ केळीची झाडे असायची. केळीच्या पानांवर पावसाचे थेंब कसे वाजतात, नाही? मी खिडकीतून हात बाहेर घातला. पावसाचे थेंब हातावर पडले. मी तो ओला हात तोंडावरून फिरवला. परंतु हा क्षणिक पाऊस. खरा पावसाळा अजून नाही सुरू झाला. होईल लौकरच. ढग दोन आले होते, रिते होऊन ओलावा देऊन गेले. ते जाताच पुन्हा चंद्र दिसू लागला. मी खिडकीतून त्याच्याकडे बघत होतो. निळया आकाशातून तो हसत होता. चंद्र म्हणजे विश्वंभराचे मुके भावगीत आहे! खिडकीतून मध्यरात्री माझ्यासारखा कोणी वेडापीर त्याच्याकडे बघत असेल का?