तुम्ही आंबे विकत घेऊन आढी लावली आहे का? माझ्या लहानपणी घरी किती आढया लावलेल्या असायच्या! टोपल्यांतून, हा-यांतून आढया लावलेल्या. शेवटी जमिनीवरही गवत आंथरून आंबे पिकत टाकायचेय किती आंबे असत! तुला आपले विष्णूबाबा माहीत आहेत ना? आई त्यांची गोष्ट सांगायची. ते शरीराने धिप्पाड, दगड पचवणारे. एकदा वाटते लहानपणी रुसले आणि रागावून आंब्याच्या खोलीत जाऊन बसले. त्यांनी आतून कडी लावून घेतली आणि मग तेथील पिकलेल्या आंब्यांवर त्यांनी राग काढला. पन्नास आंबे खाऊन गडी बाहेर आला.

''गेला का राग?'' कोणी विचारले.

''त्या पन्नास कोया बघा. अजून का राग राहील?'' ते म्हणाले.

अशी ही जुनी माणसे. आजोबा गोष्ट सांगायचे. ते एकदा रत्नागिरीस कोर्टाच्या कामासाठी जात होते. हर्णै बंदरात होते. बोटीवर चढायचे होते. खानावळीत ते व आपल्या गावचे सावळारामदादासह दोघे जेवायला गेले. खानावळीत तिखट भाजी, भातही कढत व जरा कच्चा, बोट यायची पुन्हा वेळ होत आलेली.

''अरे नाना, जेव.'' सावळारामदादा म्हणाले.

''काय जेवू? डोळयातून पाणी येत आहे. भात कढत नि कच्चा. बोट येईल.'' नाना म्हणाले.

''अरे, उद्याच्या बोटीनं जाऊ. आधी पोटभर जेवून तर घेऊ. आजीबाई, आमटी वाढा.''

त्या सावळारामदादांनी आजीबाईचा कच्चा भात, तिखट आमटी, सारे संपविले व म्हणाले, ''वाढा, असेल ते वाढा.''

आजीबाई म्हणाली, ''सारे संपले. का दिवाळे काढतोस माझे?''

''आमच्या डोळयांतून पाणी आणायला तुम्हांला नाही का काही वाटत? तुम्ही पोटभर जेवण वाढलं नाही म्हणून निम्मे पैसे देतो.'' ते म्हणाले.

परंतु शेवटी त्या म्हातारबायला चिडवून सारे पैसे देऊन म्हणाले : ''जे येतात जेवायला, त्यांना जरा वेळेवर नीट वाढीत जा; त्यांचे शिव्याशाप नका घेऊ.''

सुधा तू बसल्या बैठकीला १० आंबे तरी खाशील? तुझा अण्णा अजून सहज २५ आंबे खाईल; परंतु आज काल न खाण्यात संस्कृती येऊन राहिली आहे. मी कोठल्या तरी शाळेत गेलो होतो. तेथे माझी बडबड म्हणजे भाषण झाले. नंतर एका खोलीत फराळाचे ठेवण्यात आले होते. तेथे मला नेण्यात आले. चालक, शिक्षक सारे होते, परंतु कोणी मोकळेपणाने खाईना. मला राग आला. मी चिवडा, केळी खाल्ली.

''घ्या आणखी.'' मला कोणी म्हणाले.

''मी तर घेतच आहे. परंतु मी एकटाच खात आहे. तुम्ही कदाचित मला रानटी म्हणाल, म्हणून मी पुरे करतो; परंतु हे सारं जर तुम्ही गंमतीनं सर्वांनी हसत खेळत खावं म्हणून माडलं असेल, तर तुम्ही खात का नाही? ही कृत्रिमता, हा वरपांगीपणा, हा दंभ, म्हणजे का संस्कृती? संस्कृती म्हणजे मोकळेपणा.''

त्या लोकांना नमस्कार करून मी गेलो. मागून काय म्हणाले असतील हरि जाणे. मला या कृत्रिमतेची जितकी चीड आहे, तितकी कशाची नाही. सुधा, तू कृत्रिमाची उपासक नको होऊ, बरे का? मोकळेपणाने खा, प्या, हसा, खेळा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel