सुधामाई, परवाची एक गोष्ट. अग, आम्ही पाचसात मित्र एके ठिकाणी राहतो. दिवसा सारे कामाला जातो. रात्री सारी पाखरे घरी येतात. मी बाहेर निजतो. मला आधीच झोप कमी, व घरात तर कधीच येत नाही. त्यातून हा उन्हाळा. मी नवारीची खाट बाहेर टाकून झोपतो. ती खाट बाहेर उभी होती. वरती राहणा-या माणसाला सिगारेटचे जळके थोटूक खाली टाकण्याची सवय. ती सिगारेट खाटेवर पडली. सारी खाट पेटली. नवार जळली. बाहेर दोरीवर वाळत घातलेले आमच्या गणेशाचे सदरे जळले. आग घरातच शिरायची, परंतु कोणी मुले ओरडली. तेव्हा त्या खाटेवर पाणी ओतण्यात आले. मी दोन दिवस घरातच झोपतो. नवार आणून पुन्हा खाट विणीन तेव्हा. मी एकदा रात्री खाटेवर अंथरून घालून पडलो असता या गृहस्थाने असेच एक थोटूक टाकले. मी पटकन उठून दूर फेकले. तेही पेटते होते. विझवून खाली टाकावे एवढाही यांना विचार नाही. आगगाड्यांतून तर पाट्या लावलेल्या असतात की, विडी- सिगरेट विझवून थोटूक  टाका. आपले लोक कमालीचे बेफिकीर. अग, आमच्या वरच्या मजल्यावर राहणारे लोक आमच्या दारात भाजीचा कचरा टाकतात. सिगारेटच्या पेट्या, कागद गुंडाळून कचरा, जखमांचा कापूस- सारे फेकतात. घरात एक बादली ठेवून तिच्यात का घाण ठेवता येणार नाही? परंतु दुस-याचा विचार कोण करतो? काही काचेची वस्तू फुटली तर खळ्कन खाली फेकतात. जिकडेतिकडे काचा होतात. पान खाऊन खाली थुंकतात. वाळत घातलेले कपडे रंगतात. परवा नारायण कोठे तरी उभा होता. वरून कोणी थुंकला! काय करायचे या लोकांना! अशी कशी ही मेलेली मने! दुस-याविषयी ज्यांच्या मनाला विचार शिवत नाही ते का शिकलेले, ते का मानव? म्हणून मी नेहमी म्हणत असतो की स्वराज्याचा अर्थही आम्हांला अजून कळला नाही. आपल्या करणीपासून दुस-याला त्रास नाही ना होणार, दुस-याचे नाहक नुकसान नाही ना होणार, हा विचार जोवर मनाला शिवत नाही, तोवर ते मन असंस्कृत आहे, रानटी आहे असेच समजावे; नाही का?

मी बाहेर निजलो म्हणजे आकाशाकडे बघत असतो. रात्रीच्या वेळेस आता ढग येतात. एप्रिल महिना निम्मा होत आला. मे महिना लौकर येईल, आणि जूनमध्ये पाऊस. हे आता आगोटीचे दिवस सुरू झालेच म्हणायचे. लोक आपली घरे चाळू लागले असतील. लहानपणी मी मे महिन्याच्या सुटीत घरी जायचा. आपले पहिले घर कौलारू होते. घर चाळायला गडी यायचे. आणि मग सारे घर झाडायचे काम असे. कचरा पडे. फुटकी कौले पडत. खाप-यांचा ढीग पडे. पुढे पावसाळ्यात अंगणात चिखल होऊ नये म्हणून या खाप-या तेथे टाकतात. मी आईला झाडायला मदत करायचा. वर्षभराचा कानाकोप-यातला केर निघायचा. वरची कौले निघाल्यामुळे काही वेळ कडक ऊन सा-या घरात यायचे. जंतू जणू मरायचे. आई, बाई, सा-याजणी डोक्यावर पदर घेऊन झाडू लागायच्या. केसात घाण उडू नये म्हणून जपत. नंतर आम्ही स्नान करीत असू. मला आठवते आहे, एकदा अशी घरझाडणी झाली होती. रात्री मी वड़िलांबरोबर फरेभरे खेळायला ओटीत बसलो होतो तो विंचू आला. केवढा विंचू! या उन्हाळ्याच्या दिवसात गार जागेकडे येतात. बडोद्यास, पुण्यास ढेकूण फार, तसे विंचूही फार. भाऊंना विंचू फार चढायचा. अग, एकदा त्यांना रस्त्यातून रात्री जाताना विंचू चावला. तसेच घरी आले. आम्ही नाना उपाय  केले. भोपळ्याचे डेंग उगाळून लावले. दुधांडी पैसा उगाळून लावला. जो कोणी उपाय सांगे तो करीत होतो. पहाटे भाऊ आईला म्हणाले, ''विंचू होता की जनावर होते, साप बीप होता? मी आता वाचत नाही. तू सांभाळ मुलांना.'' मी नि अक्का कोठून औषध घेऊन घरी आलो तो आई रडत होती. बरोबर २४ तासांनी विंचू उतरला. कोकणात म्हण आहे :

''विंचू म्हणतो मी शिपाई
सर्वां नाचवीन ठायी ठायी''

रात्री अक्का नि मी खरोखरच औषधासाठी ठायी ठायी हिंडत होतो. हे उन्हाळ्याचे घर शाकारणीचे, घरे चाळण्याचे दिवस आले म्हणजे या सा-या गोष्टी आठवतात. कधी कधी आजोबासुध्दा कौले चाळायला बसत. कोकणात कोणतेही काम करायला कोणाला कमीपणा वाटत नाही.

तुमची शाळा सकाळची की दुपारची? आता समुद्रात डुंबायला जात असाल. उन्हाळ्यात समुद्रात डुंबायची मजा. तासन् तास समुद्रात रहावे असे वाटते. जात जा समुद्रात डुंबायला. आणि नारळाचे पाणी प्या घरी आल्यावर. पत्र पाठव. तुझी झरणी दुरुस्त करून पाठवली. पोचली ना? चि. प्रिय अरुणास गोड पापा. अप्पा, ताई, अक्कास स. प्र. कुमू व आनंदा यांना स. आ. इतरांसही.

अण्णा

साधना, १५ एप्रिल १९५०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel