युरोपात शोध लागतात. औद्योगिक क्रांती होते. तिच्याबरोबर राजकीय व सामाजिक क्रांती होते. नवीन कल्पना जन्माला येतात. जगाचे स्वरूप बदल लागते. वाफेचा शोध लागून आगबोटी सर्वत्र जाऊ येऊ लागतात, आगगाड्या येतात. तारायंत्रे येतात. पुढे बिनतारी यंत्रेही आली. वीज व वाफ यांनी क्रांन्ती केली. नवीन साम्राज्ये जन्मली. आशिया, आफ्रिका गुलाम झाली. इंग्रजांच्या साम्राज्याचे अनुकरण फ्रान्स, जर्मनी वगैरे राष्ट्रे करू लागली. आफ्रिकेची युरोपियन राष्ट्रात वाटणी झाली. आशियाची तीच स्थिती मिळविले की, जगाने तोंडात बोटे घातली. जपानमुळे आशियाई राष्ट्रात अभिमान जागृत झाला. परंतु जपान आशियात साम्राज्य स्थापू लागला. तो पाश्चिमात्यांचे अनुकरण करू लागला.
साम्राज्यशाह्या आपसात झगडणार हे दिसतच होते. पहिले महायुद्ध १९१४ ते १८ झाले. जर्मनीचा मोड झाला. राष्ट्रसंघ स्थापिला गेला. तिकडे रशियात १९१७ मध्ये क्रान्ती झाली. चीनमध्ये सन्यत्सेनने रिपब्लिक स्थापिले. हिंदुस्थानात असहकार, सत्याग्रह यांचा जन्म झाला. इजिप्तमध्ये इगलूलपाशा झगडत होते. केमालने तुर्कस्थान स्वतंत्र केले, खिलाफतीला मूठमाती दिली. राष्ट्रसंघ स्थापन झाला. परंतु स्पर्धा चालूच होत्या. इटलीत मुसोलिनी व जर्मनीत हिटलर अँबिसीनिया घेतला. स्पनेमध्ये लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या श्रमजीवी सत्तेविरुद्ध फ्रँकोला हिटलर व मुसोलिनी यांनी मदत केली. हिटलर एकेक प्रदेश घेत चालला आणि अखेर दुसरे महायुद्ध पेटेले. जर्मनी नि जपान जग जिंकणार असे वाटले; परंतु जर्मनीने इंग्लंडवर सर्व सैन्यानिशी हल्ला केला नाही व जपानने हिंदुस्थानवर केला नाही. रशिया निकराने लढला. इंग्लंडने शर्थ केली. जर्मनी अणुबाँबचा शोध लावू पाहात होता. परंतु तो लागण्याच्या आत जर्मनी कोसळला. जपानही पडले. कारण इतकडे अमेरिकेला अणुबाँब सापडला. जपानी शहरावर तो टाकण्यात आला. लाखो लोक क्षणात मेले. महायुध्द संपले.
आपल्या देशात आपण ‘चलेजाव’ युद्ध केले. नेताजीनी ‘आझाद सेना’निर्मिली. परंतु शेवटी फाळणी होऊनच स्वातंत्र्य मिळाले. शान्तता होईल असे वाटले; परंतु आजही पुन्हा तेच समोर आहेत. तेच हिंदू-मुसलमानांचे प्रश्न. तुकाराममहाराज म्हणतील : “ बाह्य स्वरुप बदलले; परंतु मनुष्य आहे तसाच आहे. तेच हेवेदावे, द्वेषमत्सर. माझ्या वेळेस हिंदू-मुसलमान येथे लढत होते, आजही तेच प्रकार. माझ्या वेळेस तलवारीने लढत, आज जग अणुबाँबने लढत आहे. लढाया आहेतच. मी तुमच्या लखलखाटाने दिपून जाणार नाही. सारा अंधारच आहे. तिस-या युद्धाच्या जगात तया-या चालल्या आहेत. कधी सुधारणार हा मानव?”
तुकारामाच्या वेळेस सा-या पृथ्वीचा शोध लागला नव्हता, यांत्रिक शोध लागले नव्हते, ध्रुवावर स्वा-या नव्हत्या. गेल्या तीनशे वर्षांत हे सारे झाले. परंतु मानवी मन अजून संकुचितच आहे. एखाद्या राममोहन एखादा विवेकानंद, एखादे रवीन्द्रनाथ, एखादे गांधीजी, एखादा रोमा रोलॉ, एखादा आइन्स्टाइन मानवाला मानव म्हणून ओळखताना दिसतो. हीच काय ती आशा.