नवीन पिढी तरी चारित्र्यसंपन्न होवो. मी परवा सेवा दलाच्या शिबिराला गेलो होतो, तेथे त्यांना हीच गोष्ट सांगितली. आज भारताला अन्नवस्त्राहूनही चारित्र्यसंपन्न माणसाची जरुरी आहे. प्राण गेला तरी खोटे बोलणार नाही, अनीतीने पैसे मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुस-यास सतावणार नाही, अशा वृत्तीची नि:स्पृह, निर्मळ, सेवापरायण माणसे राष्ट्राला हवी आहेत.

तू म्हणशील, अण्णा का आज नकाराचे पुराण सांगत राहणार? नाही बाळ, मी नास्तिक नाही. जगात सारे वाईट आहे असे नाही माझे म्हणणे. अग, साराच समाज सडलेला असेल तर तो नष्टच होईल. शरीरात प्राणमयताच नसेल, शुध्द रक्तच नसेल तर शरीर गळेल. ज्या अर्थी आपला समाज चालला आहे त्या अर्थी विषारी द्रव्यांशी झुंजणा-या अमृतमय वस्तूही समाजात असल्याच पाहिजेत हे निर्विवाद. आणि त्याचीही दर्शने होत असतात.

प्रेमाची शक्ती अपूर्व आहे. दोन दगड सिमिटाने, चुन्याने जोडले जातात. पूर्वी म्हणे चुन्यात गूळ घालीत असत. त्या चुन्याने इमारती भक्कम व्हायच्या. भिंती पडायच्या नाहीत. मानवी हृदये जोडायला प्रेमासारखी अपूर्व वस्तू नाही. आपल्याजवळ प्रेमाचा तुटवडा नसो. बाकी कशाचा तुटवडा पडला तरी हा नको. प्रेम असेल तर सर्व काही आहे. प्रेम नाही तर काही नाही. ईश्वराचे वर्णन आपण ज्ञानरूपी परमेश्वर असे केले आहे. परंतु नारदॠषींनी आपल्या भक्तिसूत्रात-

''स तु निरतिशयप्रेममय :।''

ईश्वर हा प्रेमसागर आहे असे म्हटले आहे. सुधामाई, ईश्वर शब्दाचा अर्थ तुला माहीत आहे का? ईश्वर म्हणजे सत्ता चालवणारा; परंतु कोणाची सत्ता जगात चालते? तरवारींची, तोफा बंदुकांची?- ती खरी सत्ता नव्हे. खरी सत्ता प्रेमाची आहे. प्रेमाने जसे जिंकून घेता येते तसे कशानेही नाही. म्हणून प्रेम हाच खरोखर परमेश्वर.

भारतात परस्परांवर प्रेम करणारी माणसे सर्वत्र दिसोत. जीवनातील हा ओलावा कधीही नष्ट न होवो. ते रमण महर्षी नुकतेच निजधामास गेले. तू वाचलेस ना? त्यांच्या आश्रमात ठेवण्यासाठी कोणी तरी दोरीने बांधून एक हरिण आणले, रमण महर्षी म्हणाले, ''त्याला बांधलंत कशाला? सोडा ती दोरी.'' तो भक्त म्हणाला, ''ते पळून जाईल.'' ते म्हणाले, ''तुला नको काळजी.''भक्ताने दोरी सोडली. रमण महषाअनी त्या हरिणाच्या पाठीवरून हात फिरविला व ते म्हणाले, ''बेटा, इथं राहा बरं.'' आणि काय आश्चर्य! ते हरिण तेथे बसले. तेथेच हिंडू फिरू लागले. कधी तेथून गेले नाही. त्यांच्या हातात कोठून ही शक्ती आली ? ती का प्रेमाची शक्ती होती? त्यांचा आत्मा त्या हरिणीच्या आत्म्याजवळ का बोलला? पशूपक्षीही प्रेमाची शक्ती ओळखतात. प्रेमाने वश होतात, माणसे नाही का होणार?

माझ्या मनात अलीकडे असे विचार येत असतात. सेवामय वृत्तीने भारतात प्रेमस्नेहाचा पाऊस पाडणारे हजारो मेघ हवे आहेत. आठ दहा गावांच्यामध्ये असा एकेक सेवेकरी असावा. पायांचा पारवा बनून त्या पंचक्रोशीत त्याने हिंडत राहावे. औषधे द्यावीत, स्वच्छता करावी, रात्री नवविचार द्यावेत. अडीअडचणी दूर करण्याची खटपट करावी, मुलांत मिसळावे, त्यांच्याबरोबर खेळावे, त्यांना गाणी शिकवावी, गावात चार फुले फुलवा सांगावे. असे तरुण लोक हवे आहेत. आशेने, उत्साहाने, प्रेमाने, सेवाभावाने उचंबळणारे तरुण. असे तरुण मिळतील तर ओसाड़ व भकास भासणारा भारतीय संसार हिरवागार होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel