चैत्र निम्मा झाला. खरा उन्हाळा सुरू झाला. उन्हाळा म्हणजे लहरी. क्षणात वारा पडतो तर क्षणात वादळ सुटते. धुळीचे लोट गगनात जातात. वातचक्र सुरू होते. नाचत नाचत रिंगणे घेत धुळीचे कण, पानपातेरा, कागदाचे कपटे- सर्व काही आकाशात उंच जाऊ लागते. परंतु पुन्हा वारा थांबतो व हा उंच गेलेला कचरा खाली येतो. संस्कृतमध्ये मी एक सुभाषित वाचले होते की, ''गुणहीन मनुष्य उच्च पदावर गेला तरी खालीच यावयाचा, जसे वातचक्रात धुळीचे कण उंच जातात परंतु पुन्हा खाली येतात.''

आंब्याच्या झाडाखाली असलेली मुले वारा सुटताच आंबा कोठे पडतो, ते पाहायला किती दक्ष असतात. आपला केळांबा होता ना, त्याचे डेख हलके. वारा येताच ५-५० आंबे टपटप पडायचे. आमची धावपळ मग काय विचारते? हा वेचू की तो वेचू असे व्हायचे.

हा चैत्र महिना. आप्पाचा चैत्रातच जन्म. त्या वेळेस अधिक चैत्र होता. म्हणून आप्पाचे नाव पुरुषोत्तम. अधिक महिन्याला पुरुषोत्तम महिना म्हणतात. आप्पाला मला वाटते लहानपणी पाळण्यात घातले होते की नव्हते त्या सुमारास त्याची आजी वारली. आई आजोळी बाळंतपणास गेलेली. गावातच सासर, गावातच माहेर. सासूबाईंना शेवटचा नमस्कार करण्यासाठी आई पहाटे उठून जाऊन आली. त्या आमच्या आजीचे नाव सावित्री आजी. लहानपणी आम्हांला खाऊ द्यायची. आंब्याची, फणसाची साठे, भुईमूगाच्या शेंगा, पेपरमिंटाच्या वड्या, नारळीपाकाच्या वड्या- सारे तिच्या पेटा-यात असायचे. 'आजी, खाऊ दे' आम्ही शाळेत जाताना म्हणत असू. मग आम्हांला चार शेंगा किंवा साठाचा तुकडा मिळायचा. आजीचा दादावर लोभ, तर आजोबांचा माझ्यावर. आजीने दादाला ताईत केला, आजोबांनी मला दुलई शिवली. लहानपणी कोणी नवीन आपणासाठी काही केले की किती आनंद होतो! मूठभर मास चढते अंगावर. आपल्यासाठी सर्वांनी काही तरी आणावे, खाऊ आणावा, खेळणे आणावे असे लहान मुलांना वाटत असते. ते तुमचे खिसे पाहतात, तुमच्या हातांतील पिशवी, बॅग, पेटी आधी उघडून बघतात. खेळणे दिसले की लगेच ''मला बाहुली, मला चेंडू'' करून नाचू लागतात. मुलांना रिक्तहस्ते भेटायला जाणे म्हणजे अरसिकपणाचे लक्षण होय.

परंतु सुधा, काय घेऊन जावे हे तुझ्या आण्णाला कळत नाही. आपण जे नेऊ त्याला हसणार तर नाही, असे मनात येऊन मग मी शेवटी काहीच नेत नाही! परंतु सारखे मनाला चुकल्याचुकल्यासारखे मात्र वाटते. अग, परवा रस्त्याने एक मजूर जात होता. डोक्यावर बोजा होता. परंतु हातात कलिंगडाची फोड होती. गरीब असो वा श्रीमंत असो, काही ना काही घरी मुलांसाठी नेतोच नेतो.

तुमच्या बोर्डीला कलिंगडे आहेत का? तेथे चिकू आहेत, नारळ आहेत, केळी आहेत- परंतु कलिंगडे नसतील. कुलाबा जिल्ह्यात कलिंगडे फार. विशेषत: अलिबाग तालुक्यात. पुष्कळ वर्षांपूर्वीची गोष्ट. अक्काचा मधू आजारी होता म्हणून मी गेलो होतो. भिकोबा डॉक्टरांचे औषध. उन्हाळ्याचे दिवस. मी भिकोबांकडे औषध आणायला गेलो की म्हणायचे, ''मामा, आधी कलिंगड खाऊ चला.'' ते माझ्यासाठी थांबायचे. ते रोज एक तरी कलिंगड खायचे. ते टायफॉइडमध्येही कलमी आंबा खायला द्यायचे. टमाटोचा रस द्या म्हणायचे. ते धाडसी होते. ''नुसतं मोसंबं मोसंबं काय करता? गोड फळ कोणतंही द्या'' म्हणायचे. हल्ली तर टायफॉइडमध्ये भातही दिला तरी चालेल म्हणतात. आरंभापासून देत असाल तर हो. परंतु डॉक्टरांची नाना मते. बर्नार्ड शॉसारखे विश्वविख्यात पंडित टोचाटोचीच्या अगदी विरुध्द. टायफॉइडचे टोचून घेतलेलेही हजारो मरतात असे त्यांनी आकडे देऊन सिध्द केले. देवीचे टोचतात, परंतु त्या टोचण्याचा काही उपयोग नाही, असा प्रचार करणा-या संस्था इंग्लंड- अमेरिकेत निघाल्या आहेत. एका बाईने इंग्लंडमध्ये मुलाला देवी टोचणे नाकारले. पार्लमेंटमध्ये प्रश्नोत्तरे झाली. एक सभासद म्हणाला, ''टोचून घ्यायला विरोध करणा-यांना गुन्हेगार मानले पाहिजे.'' परंतु मंत्रिमंडळातील एक मंत्री उत्तर देताना म्हणाले, ''या देवी टोचण्याचा उपयोग नाही म्हणून इतका पुरावा मांडण्यात आला आहे की, विरोध करणा-यांना गुन्हेगार मानावं असं बिल करण्याचं धाडस मला करवत नाही.'' बर्नार्ड शॉ लिहितात : ''एखादी आई टोचाटोची करायला येणा-याला गोळी घालील, मग त्यांचे डोळे उघडतील.'' डॉक्टरी शास्त्रातही रूढी तयार होतात. जरी या उपचारात अर्थ नाही हे कळलं तरी परंपरा चालत आली आहे म्हणून चालू ठेवतात झालं! आमचे मामा पुण्याच्या सॅनिटरी कमिशनरच्या कचेरीत होते. ते म्हणत, जगातून परस्परविरोधी इतका मजकूर या रोगांच्याबाबत व त्यांच्या उपचारांबाबत आमच्याकडे येत असतो की, सारे फोल आहे असे वाटू लागते. महात्माजींचा निसर्गोपचार बरा असे वाटते. परंतु अलीकडे जरा पडसे झाले तरी डोस पिणारे लोक झाले आहेत! जरा निसर्गाला आपले, काम करायला वाव ठेवाल की नाही?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel