चि. प्रिय सुधास,
सप्रेम आशीर्वाद


तू माझ्या पत्राची वाट पाहात असशील. कधी कधी पत्र लिहिणे नाही जमत. कधी इतर काम निघते, कधी मन अप्रसन्न होते. प्रसन्न मनाने मुलांना लिहावे. टॉलस्टॉल हा फार मोठा लेखक. त्याने कोठे तरी लिहिले आहे की, संतापलेल्या आईच्या अंगावरचे दूधही विषारी होते. तिचा संताप त्या दुधात उतरतो. मुलाला पाजताना मातेचे मन प्रसन्न हवे; पंरतु प्रत्येक लहान वा मोठी गोष्ट करताना मन प्रसन्न असावे असे मला वाटते. प्रसन्नता म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद. लहान मुलांजवळ तरी आम्ही प्रसन्नपणे वागायला हवे. त्यांच्या वाढत्या जीवनाभोवती नको निराशेचे वातावरण, नकोत द्वेषमत्सर. मागे दहा वर्षांपूर्वी स्पेनमध्ये एकीकडे भांडवलवाले व एकीकडे श्रमणारी जनता यांचे युद्ध चालले होते.  पंडित जवाहरलाल त्या वेळेस तेथील श्रमणा-या जनतेच्या सरकारचे पाहुणे म्हणून एक दोन दिवस गेले होते. विमानांचे हल्ले होत होते. घरे पेटत होती, उद्ध्वस्त होत होती. परंतु लहान मुलांच्या राहण्याची सोय भूमिगत निवासात करण्यात आली होती. त्यांचे जेवण खाणे, तेथे त्यांचे खेळ. तेथे ती गात, हसत, शिकत. नवीन पिढीसमोर मानवाच्या दुष्टतेचे प्रदर्शन नको. किती सुंदर ही दृष्टी, नाही का?

शिमगा संपला. होळी गेली. रंगपंचमी गेली. रंगपंचमी महाराष्ट्राच्या इतिहासात दोन गोष्टींनी अजरामर झाली आहे. शहाजी व जिजाई बालस्वभावानुसार एकमेकांवर गुलाल फेकतात. त्या वेळेस लखूजी जाधव व मालोजी यांची झालेली बोलणी वगैरे सारा इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे. आणि सवाई माधवराव पेशव्यांच्या वेळेसही पुणे शहरात एकदा रंगपंचमी थाटाने गाजली. शाहिरांनी तो प्रसंग वर्णिला आहे. पेशवाईतील मोठमोठी कर्तबगार माणसे रंग खेळत आहेत.

फाल्गुनाच्या कृष्णपक्षात तुकाराम व एकनाथ दोन संतांच्या पुण्य़तिथ्या. तुकारामांना देवाघरी जाऊन तीनशे वर्षे झाली. देहूला यंदा हजारो वारकरी जमले होते. खेड्यापाड्यांतून ही मंडळी आली. वर्तमानपत्रातील इतर गोष्टी त्याच्या कानावर नसतील गेल्या. परंतु तुकारामांना जाऊन तीनशे वर्षे झाली, यावर्षी महोत्सव आहे ही गोष्ट सर्वांना कळली.

गेल्या तीनशे वर्षांत केवढाल्या घडामोडी झाल्या! तुकाराम जन्मले त्याच वेळेस इंग्लंडमधील धर्मच्छळाला कंटाळलेले लोक अमेरिकेत वसाहती करायला जात होते. इंग्लंडच्या साम्राज्याचा पाया घातला जात होता. इंग्रज हिंदुस्थानात आले होते.  पोर्तुगीज जगभर जात होते. हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता उदयाला आली. मोगली सत्ता शिगेला पोचली. पुढे ती गडगडू लागली. मराठे बळावले. अठराव्या शतकात सारे हिंदुस्थान ते आपलेसे करणार असे वाटले. परंतु पानिपतच्या आधीच पलाशीची लढाई होते. अकीटची लढाई होते. मद्रास व कलकत्ता येते इंग्रजी सत्ता रोवते. पानपतानंतरही मराठे सावरतात. परंतु इंग्रजांपुढे टिकाव लागत नाही. आपण अलग अलग राहिलो. हैदर, टिपू गेले, मराठे गेले. शीखांचाही मोड होतो. पुढे ५७ झाले – तरी ते अपेशी होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel