पाटीलवाडच्या आपल्या फणसावर आता येत नाहीत फार फणस. परंतु एके काळी या एका झाडावर शे-दोनशे फणस लागत. फणसाच्या झाडाला बुंध्यापासून फळे लागतात. हंड्याझुंबराप्रमाणे फणस लोंबत असतात. लहान लहान मुलांच्या खेळांतही

'भटो भटो!'

'ओऽ.'

'कोठे गेला होता?'

'कोकणात.'

'काय आणलेत?'

'फणस.'

असे फणसाचे खेळ आहेत. हाताला तेल किंवा तूप लावून चारखंडांतून गरे काढावे लागतात. नाहीतर चिकामुळे पात्या चिकटतात बोटांना. ''तेल लावू, तूप लावू, गरे काढू'' असे आहे ना वरच्या संवादात?

आता आंबे कुठे कुठे पिकू लागले आहेत. परंतु खरा पाड वैशाखातच. अक्षय्यतृतीया झाली की आंब्यांना पक्का पाड लागतो. यंदा आंबे खूप आहेत, परंतु परसवात हिंडताना जुनी झाडे आढळत नाहीत, नवीन फारशी झाली नाहीत. ती साखर लिटी मला आठवते. लहानसा आंबा, परंतु साखरेप्रमाणे गोड. आम्ही शाळेतून धावतच घरी येत असू व आधी झाडाखाली जाऊन पडलेले आंबे बघत असू. मी आधी येऊन खनिवट्यावर चढत असे. खनिवटा म्हणजे उन्हाळ्यात गुरे बांधायची जागा. चारी बाजूंनी कूड व वर मांडव. अग एकदा मी धावत आलो व चढलो मांडवावर. लिटीखाली हा खनिवटा. आंबे पडलेले असायचे मांडवावरच्या पेंढ्यावर. परंतु एके ठिकाणी मोठा भोसका होता. मी एकदम त्यातून खाली पडलो दोन म्हशींच्यामध्ये पडलो. त्या मारकुट्या नव्हत्या म्हणून निभावले. नाही तर शिंगानी तुझ्या अण्णाला फाडून टाकत्या व अण्णाही पत्र लिहायला न उरता.

तुझा अण्णा लहानपणी भांडकुदळ होता. कोणाशी पटायचे नाही, जमायचे नाही. दादा, अंबू, बाबू वगैरे सारी मुले एका बाजूला. मी एकटा एका बाजूला. माझी आंबे जमवून ठेवण्याची कोठी असे. चारी बाजू दगडांनी रचलेल्या. त्याच्यावर फळी. आत आंबे. शेकडो झाडे परसवात. वारा सुटला की, आंबे पडायचे, आमची धावाधाव. किती मुले असत! सोनाराकडची, करंदीकरांकडची, जोशांकडची- किती तरी मुले! आंबे पडावेत म्हणून झाडाला गळती लावून ठेवायचे. काट्याने करंदीचे पान आंब्याच्या झाडाला टोचून ठेवायचे, व 'आंब्या आंब्या पडीच्चो' म्हणायचे. अग आपली म्हातारी सरस्वतीकाकू- ती किती धावायची. त्यांच्या एका आंब्याच्या झाडाच्या फांद्या आल्या होत्या आपल्या अंगणात. पुटकन आंबा पडे. सरस्वतीकाकू तिकडून धावायची. आम्ही आधी धावत नसू, परंतु ती जवळ आली म्हणजे एकदम धावून आम्ही आंबा उचलीत असू. ती म्हणायची, मेल्यांनो, एकही मिळू देत नाही का रे? ती गंमत असे. घरात आंब्यांच्या आढ्या पडलेल्या असल्या तरी झाडाखाली अनेक मुलांमुलींच्या स्पर्धेत आंबे गोळा करून आणण्यात कर्तृत्व असे.

रामफळांचे हेच दिवस, पपनसांचे हेच दिवस. आपल्या खनिवट्याजवळ रामफळ होती; तिचे केवढे फळ असे : तांबूस हिरवट रंग! कसे रसरशीत दिसायचे फळ. सुधामाई, तू लवाचे फळ खाल्ले आहेस? फोडले म्हणजे कसे गुलाबी भगवे दिसते. आंबट गोड लागते. मी गेल्या ३५ वर्षांत लवाचे फळ खाल्ले नाही. दापोलीचा माझा मित्र यशवंत करंदीकर त्याच्या गव्हेगावच्या बागेत आम्ही लव खाल्ले होते. तो यशवंतही आज देवाघरी आहे. त्याच्या किती आठवणी येतात! तो हळू बोलायचा, हळू हसायचा. त्याच्या घरी कडक शिस्त असे. यशवंतची चित्रकला फार उत्कृष्ट होती. लहानपणची मैत्री मनुष्य कधी विसरत नाही; खरे ना?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel