आतबाहेर राम; जेथे बघेन तेथे रामच राम. सुधामाई, मारुतीला त्याची आई अंजनी भेटली. ती म्हणाली, ''अरे, तुझी स्तुती जो तो करतो, परंतु मी नाही करणार तुझी स्तुती. शेवटी रावणाचा संहार करायला रामरायांना यावे लागेल. 'रामाला श्रमवलेस. तूच का नाही रामाचे सारे काम करून टाकलेस?'' अशी अंजनी माता. मुलापासून अधिकच अपेक्षा करणारी. थोर माता जिजाई नाही का शिवछत्रपतींना म्हणाली, ''अजून कोंडाणा घेतला नाहीस. तो घे; मग मला आनंद होईल.'' आईबापांनी मुलाला पराक्रमी करावे. आम्ही त्याला मनीऑर्डर पाठवीतच असतो व तो चैन करीतच असतो. वास्तविक सोळा वर्षांचा मुलगा झाला की मित्र झाला. त्याला आता सांगावे : ''स्वत:च्या पायावर उभा राहा. कष्ट कर, काम कर, आणि शीक.'' अमेरिकेचे एक अध्यक्ष हूव्हरसाहेब होते. त्यांचा मुलगा गवंडयाच्या हाताखाली काम करताना मेला! आपल्याकडे जीवनात अशी प्रखरता यायला हवी. सारे रडगाणे झडझडून फेकायला हवे.

खरे- विसरलो. महावीरजयंतीसुध्दा येत्या ३१ तारखेला आहे. जैन धर्म स्थापणारा महापुरुष महावीर आणि बुध्द जवळ जवळ समकालीनच. दोघे राजघराण्यात जन्मले. दोघांनी राज्ये झुगारली, संसार झुगारले, आणि जगाला ख-या सुखाचा मार्ग दाखविण्यासाठी त्यांनी स्वत:ची जीवने दिली. भव्य जीवने! दोघांनी अहिंसेचा महान संदेश दिला. जैन धर्म म्हणजे मनावर विजय मिळविण्याचा धर्म. जिन म्हणजे ज्याने सारे जिंकले आहे तो. ज्याने मनावर विजय मिळविला तोच खरा महावीर! जैन धर्मात अनेक तीर्थंकर होऊन गेले. तीर्थंकर म्हणजे तारून नेणारे. तीर्थ म्हणजे तारून नेणारी वस्तू. या जगातील जंजाळातून सुख-शान्ती मिळवायला एकच मार्ग. तो म्हणजे कोणाला दुख: देऊ नका. सर्वांना सांभाळा. पुढे जैन तत्त्वज्ञानात 'स्याद्वाद' निघाला. हेही बरोबर, तेही बरोबर. त्या त्या दृष्टीने सारे बरोबरच असते. सत्याचा आग्रह नसावा. मी म्हणतो तेच खरे असा हट्ट नसावा. मला जोवर माझे खरे वाटत आहे, तोवर माझी श्रध्दा घेऊन मी जावे, परंतु मी ती कोणावर लादू नये. आपल्या देशात वैचारिक स्वातंत्र्याचा महान महिमा होता. ख्रिश्चन धर्माने सक्तीने धर्म लादला, मुसलमानांनीही; परंतु भारताने कोणावर वैचारिक सक्ती केली नाही. हा मोठेपणा आपण गमावता कामा नये.

''बुध्दे: फलमनाग्रह:॥''

आग्रही नसणे हेच बुध्दीचे फळ. सत्याची एक बाजू तुला दिसली, दुसरी दुस-याला दिसली असेल. जगात अशी सहानुभूतीची दृष्टी येईल तर जग निराळे होईल. जैन धर्माने ही दृष्टी दिली. जैन न्यायशास्त्रही फार खोल आहे. माझे एक मित्र तुरुंगात म्हणाले, ''जैनांच्या न्यायशास्त्रात सारे डायलेक्टिक (विरोधविकासाचे तत्त्वज्ञान) आहे.'' तू ऐकला आहेस हा शब्द? विरोधविकास म्हणजे विरोधातून विकास. जगाची प्रगती विरोधातून होत आली आहे. आपण काही घेतो, काही सोडतो. जुन्या-नव्यांचे संघर्ष होतात. त्यांतून नवीन समन्वय जन्माला येतो. पुढची पायरी बांधली जाते.

जैन धर्माची हिंदुस्थानभर मंदिरे आहेत. कोट्यवधी रुपयांची संपत्ती या मंदिरांतून पडून आहे. संपत्ती पडून राहणे म्हणजे मोठी हिंसा. आजूबाजूचा सारा समाज सुखी करणे म्हणजे अहिंसा. मी एकदा कोठे तरी म्हटले होते की आणखी देवळे नका बांधू. गावात आरोग्य यावे म्हणून गटारे बांधा. त्याने अधिक सेवा होईल. मानवाची उपेक्षा करून देव मिळत नसतो.  जो जैन धर्म अहिंसा शिकवतो त्या धर्मातील मंदिरांचे रक्षण करायला बंदुकवाले पाहरेकरी ठेवावे लागतात. कारण तेथील संपत्ती चोरीला जायची! देवळाला मोठमोठी कुलपे! अरे कोट्यवधी दरिद्री जनता इकडे दु:खात आहे. त्यांना राहायला घर नाही. ती कुलपे उघडा नि ती संपत्ती जनतेची हायहाय दूर करायला द्या. ते अधिक 'अहिंसामय कर्म' होईल. परंतु धर्माचा आत्मा कोणालाच नको. ओठांवर मोठाली तत्त्वे. म्हणून 'धर्म ही अफू आहे' असे कोणी म्हटले तर त्यात वावगे काय? धर्म अफू नसून अमृत असेल तर जनतेची मरणकळा दूर करायला तो तो धर्म पुढे येईल. धर्म सर्वांच्या संसाराची नीट धारणा व्हावी म्हणून धडपडेल, नुसते यांत्रिक धर्म काय चाटायचे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel